नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सोमवारी देखील दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षांनी गदारोळ घातला. यावेळी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी लोकसभेत जनविश्वास (सुधारणा) विधेयक सादर केले असून ते निवड समितीकडे पाठवण्यात आले आहे.
लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. विरोधकांच्या गदारोळात प्रश्नोत्तराच्या तासाचे कामकाज सुरू झाले आणि सुमारे १८ मिनिटांत सभापती ओम बिर्ला यांनी सभागृह दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्याची घोषणा केली. दुपारी १२ वाजता सभागृहाचे कामकाज दुसऱ्यांदा सुरू झाले तेव्हा विरोधकांच्या गदारोळात उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी लोकसभेत जनविश्वास (सुधारणा) विधेयक २०२५ सादर केले.
विधेयक सादर करताना त्यांनी सांगितले की, काही गुन्ह्यांना गुन्ह्यांच्या श्रेणीतून काढून टाकून त्यांना तर्कसंगत करण्यासाठी काही कायद्यांमध्ये सुधारणा कराव्या लागतील. यामुळे जीवन आणि व्यवसाय चांगले होतील. हे विधेयक सादर केल्यानंतर, वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी ते निवड समितीकडे पाठवण्याचा प्रस्तावही मांडला. सभागृहाने हे विधेयक निवड समितीकडे आवाजी मतदानाने पाठवण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. हे विधेयक निवड समितीकडे पाठवण्यात आले आहे. सभापती निवड समितीच्या सदस्यांची नियुक्ती करतील. निवड समितीसाठीचे नियम आणि शर्ती देखील सभापती ठरवतील. समिती पुढील सत्राच्या पहिल्या दिवशी म्हणजेच हिवाळी अधिवेशनाच्या दिवशी सभागृहाला आपला अहवाल सादर करेल.