भारत-चीन संबंधांमध्ये सकारात्मक गती आवश्यक – परराष्ट्रमंत्री जयशंकर

    18-Aug-2025   
Total Views |

नवी दिल्ली,  भारत-चीन संबंधांत पुढील प्रगती साधायची असेल तर सीमावर्ती भागात शांतता व स्थैर्य राखणे अत्यावश्यक आहे. मतभेद वादात परिवर्तित होता कामा नयेत आणि स्पर्धा संघर्षात बदलू नये, असे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी झालेल्या बैठकीत स्पष्ट केले.

परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले की, वांग यी यांच्या भारत भेटीत द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्याची आणि जागतिक परिस्थितीवर परस्पर चर्चा करण्याची संधी मिळाली आहे. या चर्चेत आर्थिक व व्यापार विषय, यात्राधाम, लोकांमधील संपर्कवृद्धी, नदीविषयक माहितीचे आदान-प्रदान, सीमावर्ती व्यापार, कनेक्टिव्हिटी व द्विपक्षीय देवाण-घेवाण यांचा समावेश असेल.

ते पुढे म्हणाले की, सीमासंबंधी मुद्द्यांवर चीनचे परराष्ट्र मंत्री मंगळवारी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्याशी भेट घेणार आहेत. हे विशेष प्रतिनिधींमधील २४वे चर्चासत्र ठरणार आहे. आपल्या संबंधांना सकारात्मक गती मिळवून देण्याचा पाया म्हणजे सीमावर्ती भागात शांतता आणि स्थैर्य एकत्रितपणे राखण्याची क्षमता. त्यासाठी तणाव कमी करण्याची प्रक्रिया पुढे नेली जाणेही महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.

जागतिक पातळीवरील आव्हानांवर भाष्य करताना जयशंकर यांनी सांगितले की, भारत बहुपक्षीय जागतिक व्यवस्थेचा आणि बहुध्रुवीय आशियाचा समर्थक आहे. सुधारित बहुपक्षीयतेची आज गरज आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत स्थैर्य राखणे आणि वाढवणे हेदेखील अनिवार्य आहे. दहशतवादाविरोधातील लढा हीदेखील प्राधान्याची बाब आहे. त्यांनी अधोरेखित केले की, गेल्या काही वर्षांत भारत-चीन संबंध कठीण टप्प्यातून गेले असले तरी आता दोन्ही देश पुढे जाण्याची इच्छा बाळगतात. यासाठी स्पष्ट, प्रामाणिक आणि विधायक दृष्टिकोन आवश्यक आहे. यात तीन परस्पर तत्त्वे – परस्पर आदर, परस्पर संवेदनशीलता आणि परस्परहित – मार्गदर्शक ठरावीत, असे जयशंकर यांनी नमूद केले.

दोन्ही देश स्थैर्यासाठी सज्ज – वांग यी

भारत-चीन यांनी सीमावर्ती भागात शांतता टिकवली आहे आणि कैलास मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरुवात केली आहे. आम्ही हस्तक्षेप दूर करून सहकार्य वाढवले आहे आणि संबंधांतील सुधारणा व विकासाचा वेग कायम ठेवला आहे. यामुळे दोन्ही देश आपापल्या प्रगतीच्या प्रवासात एकमेकांना पाठबळ देऊ शकतील आणि आशिया व जगासाठी आवश्यक ते स्थैर्य निर्माण करू शकतील.