भारतीय नागरिक होण्यापूर्वीच सोनिया गांधी मतदार - काँग्रेसचाच मतदार घोटाळा असल्याचा भाजपचा आरोप

    14-Aug-2025   
Total Views |

नवी दिल्ली,  सोनिया गांधी या भारतीय नागरिक होण्यापूर्वीच त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले होते, असा पुरावा भाजपने बुधवारी दाखवून काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

भाजपने काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, भारतीय नागरिकत्व मिळण्यापूर्वीच त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले होते. भाजपाचा दावा आहे की ही घटना ४५ वर्षांपूर्वीची असून, १९८० ते १९८२ दरम्यान सोनिया गांधी यांचे नाव दिल्लीतील मतदार यादीत होते, तर त्यांना भारतीय नागरिकत्व १९८३ मध्ये मिळाले.

माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले की, १९४६ मध्ये इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधी या 1968 मध्ये राजीव गांधी यांच्याशी विवाह करून भारतात आल्या. त्यानंतर १९८० च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांचे नाव नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत समाविष्ट झाले. ठाकूर यांच्या मते, हा स्पष्ट नियमभंग होता, कारण भारतातील निवडणूक कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीचे नाव मतदार यादीत तेव्हाच येऊ शकते जेव्हा ती व्यक्ती भारतीय नागरिक असेल.

भाजप नेते अमित मालवीय यांनीदेखील याविषयी ‘एक्स’वर सोनिया गांधी यांचे नाव असलेली मतदार यादीचे छायाचित्र पोस्ट केले आहे. त्यांनी या घटनेला "स्पष्ट निवडणूक गैरव्यवहार" असे संबोधले. मालवीय यांच्या म्हणण्यानुसार, या यादीतील नोंद सोनिया गांधींच्या नावावरून त्या काळातील निवडणूक प्रक्रियेतील अनियमिततेचा पुरावा आहे.

भाजपाचा आरोप आहे की, विरोधानंतर 1982 मध्ये सोनिया गांधी यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले; परंतु 1983 मध्ये पुन्हा समाविष्ट करण्यात आले. भाजपने हेही नमूद केले की, हा देखील नियमभंग होता, कारण त्या वर्षी सोनिया गांधींना भारतीय नागरिकत्व एप्रिल महिन्यात मिळाले, तर मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची अंतिम तारीख 1 जानेवारी होती. त्यामुळे, त्यांच्या नावाची नोंद कायदेशीर दृष्टीने वैध नव्हती, असा भाजपाचा दावा आहे.

अनुराग ठाकूर यांनी यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘मतचोरी’च्या मुद्द्यास लक्ष्य केले. त्यांनी म्हटले की, राहुल गांधी जनतेला दिशाभूल करत आहेत, चुकीचे आकडे देत आहेत आणि भाजप तसेच निवडणूक आयोगावर निराधार आरोप लावत आहेत. ठाकूर यांनी प्रश्न उपस्थित केला की, काँग्रेसने आपल्या नेत्या सोनिया गांधींच्या मतदार नोंदणीतील अनियमिततेबाबत कधीही खुलासा का केला नाही.

रायबरेलीतही बोगस मतदार

रायबरेली लोकसभा मतदारसंघातही बोगस मतदार असून त्याकडे राहुल गांधी यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप अनुराग ठाकूर यांनी केला. ते म्हणाले, एकाच घरात ४७ बनावट मतदार आहेत. मोहम्मद कैफ खान यांचे नाव बूथ ८३, बूथ १५१ आणि बूथ २१८ वर मतदार यादीत आहे. रायबरेलीमध्ये, घर क्रमांक १८९ च्या मतदान केंद्र क्रमांक १३१ वर ४७ मतदार ओळखपत्रे नोंदणीकृत आहेत. त्यांची नावे मोहम्मद इस्लाम, मोहम्मद कासिम, सफिया इत्यादी आहेत. पश्चिम बंगालमध्येही अशीच परिस्थिती आहे, जिथे डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघातील घर क्रमांक ००११ वर अनेक मतदार नोंदणीकृत आहेत. मात्र, येथे राहुल गांधी सोयीस्करपणे शांत बसतात, असाही टोला ठाकूर यांनी यावेळी लगावला.