बिहारमधील ६५ लाख वगळलेल्या मतदारांची यादी जाहीर करा – सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

    14-Aug-2025   
Total Views |

नवी दिल्ली, बिहारमध्ये सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सघन पुनरिक्षणादरम्यान (एसआयआर) (वगळण्यात येणाऱ्या ६५ लाख मतदारांची यादी ऑनलाइन अपलोड करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने केंद्री. निवडणूक आयोगाला बिहारमधील एसआयआर मोहिमेनंतर प्रकाशित झालेल्या मतदार यादीतून वगळलेल्या सुमारे ६५ लाख मतदारांची जिल्हावार यादी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळारवर प्रकाशित करण्याचे निर्देश दिले. मृत्यू, स्थलांतर, दुहेरी नोंदणी इत्यादी नावे वगळण्याची कारणे स्पष्ट करावीत असेही न्यायालयाने म्हटले आहे. ही माहिती बिहारच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर देखील प्रदर्शित करावी, जेणेकरून ईपीआयसी क्रमांकांच्या आधारे कागदपत्रे शोधता येतील.

याशिवाय, न्यायालयाने निवडणूक आयोगाला एका सार्वजनिक सूचनेत हे स्पष्ट करण्याचे निर्देश दिले की, वगळलेल्या व्यक्ती अंतिम यादीत समावेशासाठी दावा सादर करताना त्यांचे आधार कार्ड देखील सादर करू शकतात. वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियाद्वारे व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी की ही यादी वेबसाइटवर प्रकाशित केली जाईल. निवडणूक आयोगाला पुढील मंगळवारपर्यंत ही पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले. खंडपीठाने या प्रकरणाची पुढील सुनावणी पुढील शुक्रवारी (२२ ऑगस्ट) ठेवली.