नवी दिल्ली, स्वांतत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरणात सात्यकी सावरकर हे नथुराम गोडसे याचे वंशज असून त्यांच्याकडून आपल्या जीवास धोका होऊ शकतो, अशा आशयाचा दावा अवघ्या २४ तासात मागे घेऊन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘डरो और भाग जाओ’ अशीच आपली भूमिका असल्याचे दाखवून दिले आहे.
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी स्वातंत्र्यवींरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी पुणे येथील खासदार – आमदार (एमपी-एमएलए) न्यायालयात त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. खटल्याचा गेल्या २४ तासातील घटनाक्रम पाहता स्वातंत्र्यवीर सावरकरांवर खोटे आरोप करणारे राहुल गांधी यांनी ‘डरो और भाग जाओ’ हा बाण अवलंबविला असल्याचे दिसते.
पुणे येथील एमपी-एमएलए न्यायालयात गुरुवारी राहुल गांधी यांचे वकील ॲड. मिलिंद पवार यांनी न्यायालयाच्या ‘रेकॉर्ड’वर माहिती यावी, म्हणून एक माहिती अर्ज दाखल केला होता. त्या अर्जात म्हटले होते की, सात्यकी सावरकर नथुराम गोडसे आणि गोपाळ गोडसे यांचे रक्ताचे वंशज आहेत. सात्यकी यांच्या आईच्या वंशाचा विचार करता सात्यकी हे त्यांचे नातू आहेत. त्याचप्रमाणे गोडसे आणि सावरकर कुटुंब हे गांधी हत्येत सहभागी असल्याचा आरोप होता. परिणामी तक्रारदाराच्या वंशातील हिंसक आणि संविधानविरोधी प्रवृत्तींचा इतिहास आणि सध्याचे राजकीय वातावरण पाहता, विनायक सावरकरांच्या विचारसरणीचे अनुयायी राहुल गांधी यांना इजा पोहोचवू शकतात, खोट्या प्रकरणात गुंतवू शकतात किंवा अन्य मार्गांनी लक्ष्य करू शकतात अशी स्पष्ट, वाजवी आणि ठोस भीती आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यातर्फे गुरूवारी हा दावा केल्यानंतर अवघ्या काही तासातच काँग्रेस पक्षातर्फे या दाव्याशी राहुल गांधी सहमत नसल्याचे सांगण्यात आले. काँग्रेसच्या समाजमाध्यम प्रमुख सुप्रिया श्रीनेत यांनी वकील मिलिंद पवार यांनी दाखल केलेल्या माहिती अर्जाविषयी राहुल गांधी हे असहमत असल्याचे सांगितले. त्यानंतर गुरुवारी मिलिंद पवार यांनी हा माहितीअर्ज मागे घेतला आहे.
माहितीअर्जात भलत्याच बाबींचा समावेशराहुल गांधी यांनी या अर्जामध्ये खटल्याशी सुतराम संबंध नसलेल्या अनेक बाबींचाही समावेश केला होता. दिल्लीत काँग्रेस पक्षातर्फे नुकतेच केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन करण्यात आले होते. त्याचाही संदर्भ राहुल गांधी यांच्यातर्फे या मानहानीच्या खटल्यात देण्यात आला. राहुल गांधी यांनी ‘मतचोरी’चा मुद्दा हाती घेतला असून त्यासाठी त्यांची सुरक्षा गरजेची आहे, असे अर्जात म्हटले होते. त्याचप्रमाणे तक्रारदाराच्या पूर्वजांच्या हिंदुत्वाच्या विचारसरणीने अनेकदा असंवैधानिक मार्गांनी राजकीय सत्ता मिळवली आहे. या विचारसरणीचे अनुयायी जात व धर्माच्या आधारावर द्वेष पसरवणे, निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करणे आणि उद्योगपतींना लाभ मिळवून देणे यासाठी ओळखले जातात. विरोधी पक्षनेते म्हणून गांधी हे आपल्या घटनात्मक अधिकारांतून अशा धोरणांच्या विरोधात उभे आहेत. त्यामुळे जातीय आधारावरील अतिरेकी, राजकीय हेतूने प्रेरित उद्योगपती, हिंदुत्व समर्थक आणि घटनात्मक शासन व्यवस्थेला धक्का देण्याची इच्छा असलेले घटक आरोपींविषयी वैरभाव बाळगत असण्याची शक्यता नाकारता येत नाही; असे सावरकर मानहानी या प्रकरणाशी दुरदूरपर्यंत संबंध नसलेले मुद्दे राहुल गांधींतर्फे मांडण्यात आले होते.
खटला लांबविण्याचा प्रयत्न - ॲड. संग्राम कोल्हटकर, तक्रारदार सात्यकी सावरकर यांचे वकील
राहुल गांधींतर्फे जाणीवपूर्वक खटल्यास वेगळे वळण देण्याचा खटला लांबविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रकरणास सनसनाटी वळण देण्यासाठीच राहुल गांधींतर्फे तसा दावा करण्यात आला होता. मात्र, न्यायालयानेही त्यांना या माहितीचा संदर्भ विचारला. त्यामुळे हा अर्ज आपल्यालाच त्रासदायक ठरू शकतो, हे लक्षात आल्यावर आपल्या वकिलास बळीचा बकरा बनवण्याचा हा प्रयत्न दिसतो.
राहुल गांधींचा दुसरा प्रयत्नही अपयशीमोठा राजकीय वारसा असलेल्या आणि सध्या लोकसभेतील विरोधी पक्षनेता असलेल्या राहुल गांधी यांना सात्यकी सावरकर या राजकारणाशी सुतराम संबंध नसलेल्या सर्वसामान्य तरुणाने कायदेशीर मार्गाने जेरीस आणल्याचे दिसते. त्यामुळेच यापूर्वीदेखील राहुल गांधी यांनी न्यायालयात ‘सात्यकी सावरकर हे त्यांच्या आईकडून नथुराम गोडसे याचे वंशज आहे ही बाब लपविली’ असा दावा करण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने राहुल गांधी यांचा तो दावा फेटाळून लावला होता. आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांना तसाच दावा स्वत:च मागे घ्यावा लागला आहे.