देशात चार नवीन सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी

    12-Aug-2025   
Total Views |

नवी दिल्ली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत सेमीकंडक्टर अभियानाअंतर्गत आणखी चार सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यापूर्वी मंजूर झालेले सहा प्रकल्प अंमलबजावणीच्या विविध टप्प्यात आहेत.

भारतातील सेमीकंडक्टर परिसंस्था वेगवान होत आहे, आज मंजूर केलेले चार प्रस्ताव सिकसेम, कॉन्टिनेंटल डिव्हाइस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (सीडीआयएल), थ्रीडी ग्लास सोल्युशन्स इंक. आणि ॲडव्हान्स्ड सिस्टम इन पॅकेज (एआसआयपी) टेक्नॉलॉजीज यांचे आहेत. सिकसेम आणि थ्रीडी ग्लासची स्थापना ओडिशामध्ये, सीडीआयएल पंजाबमध्ये आणि एएसआयपीची स्थापना आंध्र प्रदेशात होणार आहे.

या चार मंजूर प्रस्तावांमुळे सुमारे ४,६०० कोटी रुपयांच्या एकत्रित गुंतवणुकीसह सेमीकंडक्टर उत्पादन सुविधा निर्माण होतील. तसेच २,०३४ कुशल व्यावसायिकांसाठी एकत्रित रोजगार निर्माण होऊन इलेक्ट्रॉनिक उत्पादन परिसंस्थेला चालना मिळेल, यामुळे अनेक अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होतील. आजच्या या आणखी चार मंजुरींसह, आयएसएम अंतर्गत एकूण मंजूर प्रकल्पांची संख्या १० वर पोहोचली आहे ज्यात ६ राज्यांमध्ये सुमारे १.६० लाख कोटी रुपयांची एकत्रित गुंतवणूक आहे. टेलिकॉम, ऑटोमोटिव्ह, डेटा सेंटर्स, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स आणि इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्समध्ये सेमीकंडक्टर्सची वाढती मागणी लक्षात घेता, हे चार नवीन मंजूर सेमीकंडक्टर प्रकल्प आत्मनिर्भर भारत घडवण्यात महत्त्वपूर्ण योगदान देतील.

प्रस्तावित उत्पादनांचा वापर क्षेपणास्त्रे, संरक्षण उपकरणे, इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही), रेल्वे, फास्ट चार्जर्स, डेटा सेंटर रॅक, ग्राहक उपकरणे, उच्च-कार्यक्षमता संगणन, कृत्रिम बुद्धिमत्ता, आरएफ आणि ऑटोमोटिव्ह, फोटोनिक्स आणि को -पॅकेज्ड ऑप्टिक्स, मोबाइल फोन, सेट-टॉप बॉक्स, ऑटोमोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उत्पादनांमध्ये केला जाईल.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने अरुणाचल प्रदेशातील शि योमी जिल्ह्यात ८१४६.२१ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह टाटो-II जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकामाला मान्यता दिली. प्रकल्प पूर्ण करण्याचा अंदाजे कालावधी ७२ महिने आहे. ७०० मेगावॅट (४ x १७५ मेगावॅट) स्थापित क्षमतेचा हा प्रकल्प २७३८.०६ दशलक्ष युनिट ऊर्जा निर्माण करेल. प्रकल्पातून निर्माण होणारी वीज अरुणाचल प्रदेशातील वीजपुरवठा सुधारण्यास आणि राष्ट्रीय ग्रिड (भारतातील विविध वीज प्रकल्प आणि उपकेंद्रांना जोडणारी उच्च व्होल्टेज विद्युत ऊर्जा प्रसारण प्रणाली) संतुलित करण्यास देखील मदत करेल.

लखनौ मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या टप्पा-1बी ला मंजुरी


केंद्रीय मंत्रिमंडळाने उत्तर प्रदेशातील लखनौ मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या टप्पा-1बी ला मंजुरी दिली आहे. या टप्प्यात ११.१६५ किमी लांबीचा मार्ग असून (७ भुयारी व ५ उन्नत स्थानके) अश्या एकूण १२ स्थानकांचा समावेश आहे. टप्पा-1बी कार्यान्वित झाल्यानंतर लखनौ शहरात ३४ किमी लांबीचे सक्रिय मेट्रो रेल्वेचे जाळे उपलब्ध होणार आहे.