युद्ध वार्ताहर अर्नी पाईल

Total Views |

महायुद्धाच्या काळापासून ते आजतागायत ‘युद्ध पत्रकारिता’ ही सर्वस्वी आव्हानात्मकच. युद्धाचे स्वरुप बदलले तसे युद्ध पत्रकारितेनेही कूस बदलली. पण, इतिहासात काही युद्ध पत्रकार हे त्यांच्या वार्तांपत्रांमुळे अजरामर झाले. त्यापैकीच एक म्हणजे अमेरिकेचा अर्नी पाईल. उद्या दि. ३ ऑगस्ट रोजी अर्नी पाईलच्या जन्माला १२५ वर्षे होत आहेत. त्यानिमित्ताने...

अगदी काटेकोरपणे बोलायचे तर महाभारतामधला संजय हा जगातला पहिला युद्ध वार्ताहर म्हणावा लागेल. राजा धृतराष्ट्राला कुरुक्षेत्राच्या रणांगणावरची प्रत्येक घटना, प्रत्येक हालचाल तो ’लाईव्ह’ सांगत होता.

पण, ही द्वापारयुगातील घटना झाली. कलियुगातील इतिहासकाळात आशिया खंडातले आणि युरोप खंडातले राजे, सेनापती यांच्या युद्धांची वर्णने काव्ये, नाटके, ताम्रपट आणि शिलालेख यांमधून आढळतात. ही पराक्रमकाव्ये रचणारे आणि गाणारे भाट, चारण लोक किंवा नाटके लिहिणारे कवी हे स्वतः काही युद्धावर जाणारे नव्हते किंवा नसावेत. पण, युद्धावरून परतलेल्या लोकांना भेटून, त्यांच्याकडून माहिती घेऊन ते आपली काव्ये, नाटके रचत असावेत, असा तर्क करता येतो. मुसलमान बादशहांच्या पदरी तवारीखनवीस असत. ‘तवारीख’ म्हणजे ऐतिहासिक वृत्तांत. ‘तवारीख’ लिहिणारा तो ‘तवारीख-नवीस.’ मात्र, ही काव्ये, नाटके आणि तवारिखा या अतिशयोक्त, स्तुतीपर वृत्तांतांनी भरलेल्या आढळतात. त्यात वस्तुनिष्ठ वृत्तांतांपेक्षा आपला राजा, सेनापनी, बादशहा यांची अतिशयोक्त स्तुती केलेली दिसते. पण, यात आश्चर्य काही नाही. ते कवी आपल्या राजाची, आपल्या मालकाची स्तुती करणारच. आजचे ‘चाय-बिस्कुट पत्रकार’तरी काय वेगळे करतात?

असो. तर आपण आता इतिहास काळाकडून आधुनिक काळाकडे आणि त्यातल्या बातमीदारीकडे वळूया. आधुनिक काळातले पहिले छापील वृत्तपत्र सन १६०५ साली जर्मनीमध्ये स्ट्रासबर्ग येथे छापले गेले. ‘अकाऊंट ऑफ ऑल डिस्टिंग्विश्ड अॅण्ड कोमेमोरेबल न्यूज’ अशा या लांबलचक नावाच्या वृत्तपत्राचा संपादक होता जोहान कॅरोलस नावाचा इसम. हे वृत्तपत्र दैनिक नसून, साप्ताहिक होते. सहज मनात येते की, सन १६०५ साली आपल्याकडे काय चालले होते? तर त्या वर्षी अत्यंत धूर्त, पाताळयंत्री आणि कपटी असा अकबर बादशहा मेला आणि त्याचा व्यसनी, लंपट मुलगा जहांगीर गादीवर आला. इकडे महाराष्ट्रात निजामशाही राजवट चालू होती. पण, त्याच वर्षी अखिल भारतवर्षाच्या, अखिल हिंदू समाजाच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत शुभसूचक अशी एक घटना घडली. निजामशहाचे दोन सरदार मालोजी भोसले आणि लखुजी जाधव यांची मुले अनुक्रमे शहाजी भोसले-वय सुमारे ११ आणि जिजाबाई जाधव-वय सुमारे ५ यांचा विवाह झाला. समजा, आपल्याकडे यावेळी वृत्तपत्रे असती, तर त्यांनी वरील दोन घटना कशा ‘कव्हर’ केल्या असत्या?

असो. प्रत्यक्षात आपल्याकडे पहिले वृत्तपत्र सुरू व्हायला आणखी १७५ वर्षे उलटावी लागली. सन १७८० साली जेम्स ऑगस्टस हिकी या इसमाने कोलकात्यामध्ये ‘बेंगॉल गॅझेट’ हे वृत्तपत्र सुरू केले. हे भारतातले आधुनिक काळातले पहिले छापील वृत्तपत्र होय.

पण, आपल्याकडेच नव्हे, तर युरोप आणि अमेरिकेतही वृत्तपत्रांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि तसाच खप सुरू झाला, तो सन १८३० पासून. कारण, त्या वर्षी नवी, वेगाने छपाई करू शकणारी मुद्रण यंत्रे बाजारात आली. वृत्तपत्र उत्पादन हा एक व्यवसाय बनला. पाश्चिमात्य जगात प्रत्येक देशात, प्रत्येक शहरात नवनवीन वृत्तपत्रे निघू लागली. तोपर्यंत संपादक आणि त्याचे एखाद्-दोन साहाय्यक एवढाच कर्मचारी वर्ग पुरेसा असे. आता संपादन वेगळे, बाहेरून बातम्या पाठवणारे वेगळे, त्या बातम्यांचे व्यवस्थित वृत्तांकन करणारे वेगळे, असा कार्यविस्तार, विभागणी आपोआपच होत गेली.

लंडनचे सुप्रसिद्ध ‘द टाईम्स’ हे वृत्तपत्र मुळात १७८५ साली अन्य नावाने सुरू झाले. ते पुढे १७८८ साली ‘टाईम्स’ या नावाने निघू लागले. सन १८५० साली प्रशिया आणि डेन्मार्क यांच्यात एक युद्ध झाले. ‘लंडन टाईम्स’चा संपादक जॉन डिलेन याच्या डोक्यात आले, हे युद्ध ‘कव्हर’ करायला एखादा खास वार्ताहरच का पाठवू नये? त्याने विल्यम हॉवर्ड रसेल या २३ वर्षांच्या तरुण बातमीदाराला प्रत्यक्ष रणभूमीवर पाठवले. रसेलने पाठवलेल्या बातम्या संपादक डिलेनला आणि मग ‘टाईम्स’च्या वाचकांनाही आवडल्या. नंतर १८५४ साली क्रीमियामध्ये रशिया विरुद्ध तुर्कस्तान-फ्रान्स-इंग्लंड यांच्यात युद्ध सुरू झाले. हेच ते प्रसिद्ध ‘क्रीमियन युद्ध’. जॉन डिलेनने ते ‘कव्हर’ करायला पुन्हा रसेललाच पाठवले आणि पत्रकारितेत ‘युद्ध वार्ताहर-वॉर करस्पॉण्डन्ट’ या नव्या संकल्पनेचा जन्म झाला. ‘क्रीमियन युद्धा’ची विल्यम रसेलने पाठवलेली वार्तापत्रे फारच गाजली. त्यामुळे अर्थातच पुढे १८५७ साठी भारतात जेव्हा ‘ईस्ट इंडिया कंपनी’विरुद्ध क्रांतियुद्ध सुरू झाले, तेव्हा रसेललाच भारतात पाठवण्यात आले. त्यामुळे भारतीय नसला, तरी भारतातल्या युद्धांचे प्रत्यक्ष रणभूमीवर हजर राहून वार्तांकन कराणारा पहिला युद्ध वार्ताहर विल्यम रसेलच ठरतो.

आता आपण अमेरिकेकडे वळूया. ‘इंडियाना’ हा अमेरिकेचा एक प्रांत. तिथल्या व्हर्मिलियन नामक परगण्यात डाना या अगदी लहानशा खेड्यात एका सामान्य शेतकरी कुटुंबात अर्नेस्ट ऊर्फ अर्नी पाईल याचा जन्म झाला. त्याचे आईवडील जेमतेम आठवी शिकलेले होते. अर्नीला शेती करण्यात स्वारस्य नव्हते. त्याला सैनिक बनायचे होते नि खूप प्रवास करायचा होता. तो अमेरिकन नौदलात भरती झाला. युरोपात महायुद्ध सुरू होते. पण... पण अर्नीचे प्रशिक्षण सुरू असतानाच महायुद्ध संपले. नौदलातून बरखास्त झालेला अर्नी घरी परतला आणि पत्रकारिता शिकण्यासाठी इंडियाना विद्यापीठात दाखल झाला. इंडियाना विद्यापीठाच्या बेसबॉल संघातून जपानचा दौरा करण्याची संधी अर्नीला मिळाली. पॅसिफिक महासागरातून जपानकडे जाता-येताना हाँगकाँग, शांघाय, मनीला इत्यादी मोठी शहरे पाहण्याची संधी अर्नीला मिळाली. त्याच्या अत्यंत खुमासदार प्रवासवृत्तांत लेखनाची बीजे याच प्रवासात रूजली. पुढे ती प्रथम इंडियानामधल्या ‘डेली हेरॉल्ड’मध्ये आणि नंतर राजधानी वॉशिंग्टनमधल्या ‘द वॉशिंग्टन डेली न्यूज’ या वृत्तपत्रात रूजू झाला.

ते १९२३ साल होते. १९२५ साली अर्नीने जेराल्डिन ऊर्फ जेरी सीबोल्डस् हिच्याशी लग्न केले आणि पुढची १५ वर्षे म्हणजे १९४० पर्यंत या नवरा-बायकोने संपूर्ण अमेरिका खंड म्हणजे उत्तर अमेरिका, मध्य अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेत मोटारने नि विमानाने अफाट प्रवास केला. अंतराच्या भाषेत बोलायचे, तर त्याने विमानाने एक लाख मैल किंवा १ लाख, ६० हजार किमी प्रवास केला. या त्याच्या अफाट प्रवासाच्या वृत्तांताचा त्याचा स्तंभ आठवड्यातले सहा दिवस छापून यायचा आणि त्यावर वाचकांच्या उड्या पडायच्या.

१९३९ साली दुसरे महायुद्ध झाल्यावर ते ‘कव्हर’ करायला अर्नी लंडनला पोहोचला. जुलै १९४० ते ऑक्टोबर १९४० असे पावणेचार महिने जर्मन वायुदलाने ब्रिटनवर बेसुमार बॉम्बवर्षाव करून ब्रिटनला युद्धातून असे उखडून काढण्याचा निकराचा प्रयत्न केला. यालाच ‘बॅटल ऑफ ब्रिटन’ असे म्हणतात. नेमका त्यावेळी अर्नी लंडनमध्ये होता. कोणत्याही वार्ताहरासाठी ही पर्वणीच होती. अर्नी पाईलची युद्ध वार्तापत्रे जवळपास प्रत्येक अमेरिकन माणूस वाचत असे. राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट यांची पत्नी एलेनॉर रूझवेल्ट हीसुद्धा ‘मास डे’ नावाचा एक वृत्तपत्रीय स्तंभ लिहीत असे. त्यात ती अर्नी पाईलच्या वार्तापत्रांचा आवर्जून उल्लेख करीत असे.

साहजिकच १९४२ मधल्या उत्तर आफ्रिकेतल्या जर्मन जनरल रोमेलविरुद्धच्या दोस्त राष्ट्रांच्या मोहिमेच्या वार्तांकनासाठी अर्नीलाच पाठवण्यात आले. अर्नीची वार्तापत्रे आणि त्याचे सर्वांशी खेळीमेळीने वागणे, यामुळे अगदी सामान्य रायफलमनपासून ते जनरल ओमार ब्र्रॅडली, जनरल आयसेनहॉवर अशा सर्वोच्च सेनापतींपर्यंत संपूर्ण अमेरिकन सैन्यात अर्नी सगळ्यांचा लाडका झाला. त्याला सर्वत्र मुक्त द्वार असे. जून १९४४ मध्ये दोस्त सैन्याने फ्रान्समध्ये नॉर्मंडी या समुद्रकिनार्यावर प्रचंड सैन्य उतरवून फ्रान्स जर्मनांच्या ताब्यातून मुक्त करायला सुरुवात केली. अर्नी पाईलने या प्रसंगावर लिहिलेले वार्तापत्र युद्ध वार्तांकनाचा एक आदर्श नमुना मानले जाते. लोकांनी ते पुनःपुन्हा वाचले.

१९४५ साली अमेरिकेने जपानी आरमाराविरुद्ध जबरदस्त प्रतिचढाई सुरू केली. दुसर्या महायुद्धातली ही सर्वांत भीषण आरमारी लढाई मानली जाते. ‘बॅटल ऑफ ओकिनावा’ म्हणून ती प्रसिद्ध आहे. ती ‘कव्हर’ अर्थात अर्नी पाईल होताच. पण, ही पाईलची शेवटची कामगिरी ठरली. अमेरिकन नौदलाने ‘ले शिमा’ नावाचे बेट जिंकले. ते बघायला लेफ्टनंट कर्नल जोसेफ कूलीज याच्यासह अर्नी पाईल बेटावर उतरून हिंडत असताना लपून बसलेल्या एका जपानी सैनिकाने मशीनगन चालवली आणि अर्नी पाईल ठार झाला. अमेरिकन नौदलाने संपूर्ण सैनिकी इतमामाने त्याचे दफन केले. नुकत्याच राष्ट्राध्यक्षपदी आलेल्या हॅरी ट्रूमनसकट संपूर्ण अमेरिकेने त्याला श्रद्धांजली वाहिली. या वेळेपर्यंत त्याच्या लेखनाची वाचकप्रियता एवढी वाढली होती की, त्याचा सिंडीकेटेड स्तंभ अमेरिकेतली ४०० दैनिके आणि ३०० साप्ताहिके छापत होती. त्याच्या निवडक लेखांचे पाच संग्रह प्रसिद्ध झाले असून आजही ते लोकप्रिय आहेत.

त्या संग्रहांची नावे अशी - ‘अर्नी पाईल इन इंग्लंड’ (प्रकाशन वर्ष १९४१), ‘हिअर इज युअर वॉर’ (प्रकाशन वर्ष १९४३), ‘ब्रेव्ह मेन’ (प्रकाशन वर्ष १९४४), ‘होम कन्ट्री’ (प्रकाशन वर्ष १९४७), ‘लास्ट चॅप्टर’(प्रकाशन वर्ष १९४९) यावरून लक्षात येईल की, त्याची शेवटची दोन पुस्तके त्याच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाली.

अवघे ४५ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या अर्नी पाईलचा जन्म दि. ३ ऑगस्ट १९०० या दिवशी झाला होता. म्हणजे आता त्याच्या जन्माला १२५ वर्षे होत आहेत.

शेतकर्यांची मुले अशीसुद्धा असतात. सगळीच काही अंगणात वांग्याची शेती करून राजकारणात जात नाहीत.

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.