भगव्यास दहशतवादी ठरवण्याचा गांधी कुटुंबाचा कट – भाजपचा हल्लाबोल

    01-Aug-2025   
Total Views |

नवी दिल्ली : मालेगाव स्फोट प्रकरणावरून काँग्रेसवर भाजपने जोरदार हल्ला चढवला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक (रा.स्व.संघ) डॉ. मोहनजी भागवत यांना अटक करण्यासाठी दबाव आणला गेला होता, असा धक्कादायक खुलासा महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) मधील निवृत्त अधिकारी महबूब मुजावर यांनी केला. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना भाजपचे खासदार व प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसवर व गांधी कुटुंबावर थेट आरोप केले.

खासदार संबित पात्रा म्हणाले, मालेगाव स्फोट प्रकरणात दोन मोठ्या राजकीय घडामोडी समोर आल्या आहेत. पहिली म्हणजे एटीएस अधिकारी महबूब मुजावर यांचा गौप्यस्फोट. हे प्रकरण तपासणाऱ्या समितीचे ते एक महत्त्वाचे सदस्य होते. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि सरकारमधील वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर 'भगवा दहशतवाद' ही संकल्पना पुढे रेटण्याचा आणि रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांना अटक करण्याचा दबाव आणला."

पात्रा पुढे म्हणाले, महबूब मुजावर यांनी सांगितले की मोहन भागवत यांचे नाव ना आरोपपत्रात होते, ना चौकशीत. तरीही त्यांच्यावर अटक करण्यासाठी दबाव आणला गेला. मात्र त्यांनी भारतीय संविधानाचा आधार घेत हा आदेश पाळण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांच्यावर खोटे आरोप लावले गेले, बदनामी करण्यात आली आणि पदोन्नती थांबवण्यात आली. नंतर न्यायालयाने त्यांना निर्दोष ठरवले.

पात्रा यांनी काँग्रेसवर सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप केला. ही सर्व कारवाई गांधी कुटुंबाच्या आदेशावरून करण्यात आली होती. यामागे एक विशिष्ट राजकीय अजेंडा होता – भगव्या विचारसरणीला दहशतवादाशी जोडण्याचा प्रयत्न, असे ते म्हणाले.