‘उदयपूर फाईल्स’ उद्या प्रदर्शित होणारच – सर्वोच्च न्यायालय ; सेन्सॉर बोर्डाकडून ४० ते ५० दृश्यांवर कात्री

    09-Jul-2025   
Total Views |

नवी दिल्ली : इस्लामी कट्टरतावाद्यांचे क्रौर्य दाखविणाऱ्या ‘उदयपूर फाईल्स’ हा चित्रपट ११ जुलै रोजीत प्रदर्शित होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्याचवेळी चित्रपटातील ४० ते ५० दृश्यांवर कात्री चालवली असल्याचे सेन्सॉर बोर्डाने स्पष्ट केले आहे.

येत्या शुक्रवारी म्हणजे ११ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित होणाऱ्या "द उदयपूर फाइल्स: कन्हैयालाल टेलर मर्डर" या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर तातडीची सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. कन्हैयालाल हत्याकांडातील एका आरोपीच्या वतीने वकिलाने केलेला उल्लेख नाकारत न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्या. जयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने चित्रपट प्रदर्शित होऊ द्या असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता उद्या हा चित्रपट ठरलेल्या दिवशीच प्रदर्शित होणार आहे.

याप्रकरणी दिल्ली उच्चय न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली होती. केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने (सीबीएफसी) न्यायालयाला प्रमाणपत्र देण्यापूर्वी ४० ते ५० कट अनिवार्य केल्याची माहिती दिल्यानंतर, दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी उदयपूर फाइल्स चित्रपटाचे निर्माते अमित जानी यांना सर्व वकिलांसाठी चित्रपटाचे आणि त्याच्या ट्रेलरचे खाजगी प्रदर्शन आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.

जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी यांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेच्या (पीआयएल) सुनावणीदरम्यान मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायाधीश अनीश दयाल यांच्या खंडपीठासमोर हे निवेदन सादर करण्यात आले.