
दापोली तालुयातील वन्यजीव संवर्धनाच्या कामात तळमळीने काम करणार्या तुषार श्रीधर महाडिक या तरुणाविषयी...दापोली तालुयातील वन्यजीवांसाठी झटणारा हा तरुण. प्रसंगी वन्यजीवांवर होणार्या अन्यायाबाबत आवाज उठवणारा. दापोलीतील वन्यजीवप्रेमींनी स्थापन केलेल्या संस्थेच्या माध्यमातून वन्यजीव बचाव, सर्प जनजागृती या क्षेत्रात हा तरुण काम कार्यरत आहे. दापोली तालुयातील वन्यजीवांसाठी खस्ता खाणारा हा माणूस म्हणजे तुषार महाडिक.
महाडिक यांचा जन्म दि. १० फेब्रुवारी रोजी १९९३ रोजी दापोलीत झाला. त्यांच्या घरची पार्श्वभूमी ही सैन्य दलाची. त्यांचे वडील हे सैन्यदलात होते आणि त्यांचे बंधूदेखील सैन्यदलात कार्यरत आहेत. तुषार यांचे बालपण दापोलीत गेले. लहानपणी त्यांना गुरांचा आणि घरातल्या पाळीव प्राण्यांचा लळा लागला. शालेय जीवनात जंगलात फिरणे, तिथे जाऊन पक्षीनिरीक्षण सुरू झाले. यातून अजाणतेपणी निसर्गप्रेमाची आवड रुजली. आठवी इयत्तेत असताना त्यांना जाळ्यात साप अडकलेला दिसला. मग, तळमळ सुरू झाली ती त्या सापाला वाचवण्याची. साप विषारी आहे की बिनविषारी, याची काही कल्पना नाही. तो कसा पकडावा याची जाण नाही. पण, जाळ्यात तडफडणार्या सापाला पाहून मनात होणारी घालमेल काही थांबेना. म्हणून मग धीर धरुन सापावर कापड टाकून त्याला जाळ्यातून बाहेर काढून, त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे काम महाडिक यांनी केले. त्यातून मग वन्यजीव संरक्षणासाठी आवश्यक असणारा धीटपणा अंगीभूत झाला आणि त्यातूनच पुढे वन्यजीव बचावाचा प्रवास सुरू झाला.
तुषार यांनी कला शाखेतून इतिहास या विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षणादरम्यानच त्यांनी दापोली आणि आसपासच्या परिसरात सर्पमित्र म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यासाठी प्रीतम साठविलकर, मिलिंद गोरिवले यांसारख्या समविचारी लोकांची त्यांना मदत मिळाली. सर्पबचावाचे साहित्य नसताना देखील त्यांनी हे काम सुरू केले. सर्पबचावाचे काम करत असताना त्यांना प्रकर्षाने जाणवले की, ग्रामीण भागांमधील लोकांमध्ये सापांविषयी अज्ञान आहे. याच अज्ञानापोटी हे लोक सापांचा जीव घेतात. त्यामुळे तुषार यांनी समविचारी लोकांसोबत गावागावात जाऊन सर्पजनजागृतीचे काम करण्यास सुरूवात केली. गावातील प्रौढ लोकांना समजावणे यांच्यासाठी कठीण जात होते. कारण, प्रौढांमध्ये सापांविषयी अनेक गैरसमज होते. त्यामुळे प्रौढांच्या जागृतीसाठी त्यांनी मोर्चा वळवला. तसेच तुषार आणि त्यांच्या सहकार्यांनी शाळांमध्ये जाऊन जनजागृती करण्यास सुरुवात केली. सण, उत्सव, वाडीच्या सार्वजनिक पूजा अशा कार्यक्रमांना घेरुन सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यानंतर पार मध्यरात्रीदेखील त्यांनी जनजागृतीचे कार्यक्रम राबविले. सर्पदंश झाल्यावर व्यक्ती हा सर्वप्रथम सरकारी इस्पितळात जातो. त्यामुळे सरकारी इस्पितळात जाऊन त्याठिकाणी सापांची ओळख याविषयी शिबिरे घेतली. यामाध्यमातून दापोली आणि आसपासच्या परिसरात सर्पजनजागृतीची एक लाट निर्माण झाली आणि गेल्या पाच वर्षांमध्ये या भागातून सर्पदंशामुळे मृत्युमुखी पडलेल्या एकाही व्यक्तीची घटना घडलेली नाही.
दापोलीतील या सर्पबचाव किंवा वन्यजीव बचावाचा कामाला काही संघटनात्मक स्वरुप नव्हते. म्हणून सर्पमित्र प्रीतम साठविलकर यांनी सगळ्यांना एकत्रित करुन त्याला संघटनात्मक स्वरुप दिले. या माध्यमातून गेल्या पाच वर्षांपासून दापोली आणि आसपासच्या परिसरात तुषार आणि त्यांचे सहकारी वन्यजीव बचावाचे काम करत आहेत. कामाची व्याप्ती वाढवून मगर, बिबट यांसारख्या प्राण्यांच्या बचावाच्या कामाला देखील त्यांनी सुरुवात केली. वन विभागाच्या मार्गदर्शनानुसार, गेल्यावर्षी त्यांनी ‘वाईल्ड अॅनिमल रेस्यू अॅण्ड रिसर्च’ ही संस्था नोंदणीकृत केली. तुषार हे या संस्थेचे सचिव असून मिलिंद गोरिवले हे अध्यक्ष आणि मनोत बाईत हे उपाध्यक्ष आहेत. या संस्थेच्या माध्यमातून जखमी, आजारी किंवा संकटात सापडलेल्या वन्य प्राण्यांचे त्वरित बचाव.
मानवी वस्तीमध्ये शिरलेल्या वन्य प्राण्यांचे सुरक्षित स्थानांतरण, स्थानिक प्रशासनासोबत समन्वयाने आपत्कालीन प्रतिसाद सेवा, ही काम केली जातात. तसेच जैवविविधतेचे दस्ताऐवजीकरण व नोंदवही तयार करणे, मानव-वन्यजीव संघर्षावर उपाययोजना शोधणे, विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना डेटा उपलब्ध करून देणे अशी शास्त्रीय पद्धतीचे कामे देखील केली जातात. वनस्पती आणि जैवविविधता पुनरुत्थान प्रकल्पाच्या माध्यमातून गोरिवले यांच्या जागेवर खासगी जंगल उभारण्याचे कामदेखील सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे, वन्यजीवांमुळे होणार्या शेतपिक नुकसानीवरील उपाययोजनांसाठी संस्थेकडून काम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. वनविभाग, वन्यजीवतज्ज्ञ, शैक्षणिक संस्था आणि स्थानिक समुदायांबरोबर यांच्यासोबत संस्था भागीदारीमध्ये काम करत आहेत.
संस्थेच्या निर्मितीमुळे तुषार यांच्या कामाला एक बांधणी मिळाली. दापोली कृषी विद्यापीठामधील आपली नोकरी सांभाळून तुषार हे काम करत आहेत. येणार्या काळात शिकारीवर अंकुश लावण्यासाठी तुषार संस्थेच्या माध्यमातून काम करणार आहेत. त्यांना पुढील वाटचालीकरिता दै. मुंबई तरुण भारतकडून शुभेच्छा!