मुंबई (विशेष प्रतिनिधी) - साताऱ्यामधून मिलिपीडच्या म्हणजेच पैसा किड्याच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे (satara dahiwadi). जिल्ह्यातील कोरड्या भूप्रदेशात ही प्रजात आढळून आली आहे (satara dahiwadi). 'झिफिडिओगोनस सिनिस्पिनस' असे करण्यात आले असून पैसा किड्याच्या 'झिफिडिओगोनस' या कुळाची देखील महाराष्ट्रामधून प्रथमच नोंद करण्यात आली आहे. (satara dahiwadi)
किटक समूहातील मिलिपीड म्हणजेच पैसा किडा हा दुर्लक्षित किडा आहे. मराठीत या किड्यांना पैसा, तेलगी अळी किंवा वाणी कीड म्हटले जाते. साताऱ्यातील वी.वाय.डी संघटनेचे शुभम माने, एम.डी.अश्वती, प्रतीक बडदे आणि डाॅ. व्ही.वाय. देशपांडे यांनी जिल्ह्यातून पैसा किड्याच्या नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. यासंबंधीचे संशोधन वृत्त ‘जर्नल ऑफ थ्रेटन्ड टॅक्सा’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये प्रकाशित झाले. दहिवडी, कोरेगाव आणि फलटण या भागात ही नवीन प्रजात आढळली. शुभम माने हे २०१७ सालापासून पैसा किड्याच्या दुर्लक्षित प्रजातीवर सातत्याने अभ्यास करत आहेत. माने यांना ही प्रजात सापडल्यानंतर तिची ओळख पटविण्यासाठी त्यांनी रशियातील तज्त्र डाॅ. सर्गेई यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या मार्गदर्शनानंतर ही प्रजात नवीन असण्यावर शिक्कामोर्तब झाले. तसेच केरळच्या शास्त्रज्ञ अश्वती माथीलाकथ यांनी या प्रजातीच्या अचूक ओळखीसाठी आवश्यक असलेल्या गुणवैशिष्ट्यांसंदर्भात मार्गदर्शन केले.
'झिफिडिओगोनस सिनिस्पिनस' या नावामध्ये 'झिफिडिओगोनस' हे पैसा किड्याचे कुळ असून 'सिनिस्पिनस' या लॅटिन भाषेतील शब्दाचा अर्थ होतो काट्याचा अभाव असलेला. 'झिफिडिओगोनस' या कुळातील सर्व तीन प्रजाती या केवळ दक्षिण भारतात त्यातही तामिळनाडूमध्ये आढळतात. त्यामुळे महाराष्ट्रातील या कुळाची झालेली ही पहिलीच नोंद असून या कुळाच्या भौगोलिक विस्तारात मोठी भर पडली आहे. संशोधकांनी हे संशोधन कोणत्याही बाह्य निधीशिवाय स्वखर्चाने केले आहे. या शोधामुळे साताऱ्याच्या कोरड्या भागातील जैवविविधता अधोरेखित झाली आहे.
प्रजातीविषयी
या नव्या प्रजातीचा रंग काळा असून त्यावरती भगव्या छटा आहेत. शरीर सुमारे २८ मीमी लांबीचे आणि २० खंडात विभागलेले आहे. पाय आणि अँटेना काळसर असून टोकास पिवळसर छटा आहे. या प्रजातीचा अधिवास प्रामुख्याने जमिनीवर सडलेल्या लाकडाखाली, पानगळीत किंवा बिळांमध्ये असतो. पावसाळ्यात आणि उन्हाळात ही जात सक्रिय असते. ओलसर पण उष्ण जमिनीच्या जंगलात तिची संख्या तुलनेत जास्त आढळते. या जातीचे नमुने संशोधकांनी मे, २०२४ ते जुलै २०२४ या कालावधीत गोळा केले असून ते 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'मध्ये संग्रहित करण्यात आले आहेत.