कल्याण : कल्याणमध्ये गाजत असलेल्या मारहाण प्रकरणात मुख्य आरोपी गोकुळ झा याचा भाऊ आणि आरोपी क्रमांक २ रणजीत फुलेश्वर झा याचा जामीन अर्ज बुधवारी न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
झा यांच्या अर्जावर वकिलांमध्ये मंगळवारी जोरदार युक्तिवाद झाला. पीडित तरुणीने न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून, आरोपी सुटल्यास आपला जीव धोक्यात येईल अशी स्पष्ट भीती व्यक्त केली होती.त्यानंतर बुधवारी, मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी निलेश वासाडे (कोर्ट क्र. 3) यांच्या न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून रणजीत झाचा जामीन अर्ज फेटाळण्याचा निर्णय घेतला.सरकारी वकील ॲड. प्रकाश सपकाळे आणि फिर्यादीचे वकील ॲड. हरीश नायर यांनी प्रभावी युक्तिवाद करत, आरोपीला जामीन दिल्यास गुन्ह्याच्या तपासात अडथळा येऊ शकतो, अशी भूमिका घेतली होती.विशेष म्हणजे, पीडितेने प्रतिज्ञापत्र सादर करत स्वतः न्यायालयात उपस्थित राहून आपली बाजू मांडली.दुसरीकडे, आरोपीच्या वकिलांनी मात्र हा निर्णय "जातीय रंग देऊन आणि राजकीय दबावाखाली घेतला गेला", असा आरोप केला असून, वरील न्यायालयात पुन्हा जामिनासाठी अर्ज करणार असल्याची माहिती दिली.