जम्मू – काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन महादेव’ सुरू, तीन दहशतवाद्यांचा खात्मा - पहलगाम हल्ला करणारा एक दहशतवादी ठार

    28-Jul-2025   
Total Views |

नवी दिल्ली, भारतीय लष्कर आणि जम्मू – काश्मीर पोलिसांच्या संयुक्त ‘ऑपरेशन महादेव’मध्ये सोमवारी तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यामध्ये पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्याचाही समावेश असल्याचे समजते. दरम्यान, ‘ऑपरेशन महादेव’ सुरूच असल्याचे सुरक्षा दलांनी सांगितले आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगरच्या दाचिगम राष्ट्रीय उद्यानाजवळील हरवन भागात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले, असे भारतीय लष्कराने सोमवारी सांगितले. दहशतवादविरोधी ‘ऑपरेशन महादेव’ लिडवासच्या भागात सुरू आहे, असे भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने सांगितले आहे.

चकमकीमध्ये पाकर लष्करप्रमुख असीम मुनीर यांचा पाठिंबा असलेल्या टीआरएफ – लष्कर ए तोयबाचा दहशतवादी मुसा सुलेमान ठार झाला आहे. पहलगाम हल्ल्यामध्ये सुलेमानची प्रमुख भूमिका होती.

जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगरमधील दाचिगम राष्ट्रीय उद्यानाजवळ 'ऑपरेशन महादेव' मध्ये मारल्या गेलेल्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे आणि त्यासाठी थोडा वेळ लागेल, असे पोलिस महानिरीक्षक विधी कुमार बिरदी यांनी सांगितले आहे. दरम्यान, आज सकाळी (मंगळवारी) भारतीय लष्कर आणि जम्मू – काश्मीर पोलिसांची संयुक्त पत्रकारपरिषद होणार आहे.