मुंबई - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय सहकार धोरण जाहीर केले. या राष्ट्रीय सहकार धोरणाचे सर्व स्तरातून, विशेषतः सहकार क्षेत्राकडून, महिला आणि युवा पिढीकडून स्वागत केले जात आहे. भाजपा गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांनीही या धोरणाचे स्वागत केले असून राष्ट्रीय सहकार धोरणाच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात एक नवी क्रांती घडणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रीय सहकार धोरणाची वैशिष्ट्ये सांगताना आ. दरेकर म्हणाले की, या राष्ट्रीय सहकार धोरणामुळे देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक सहकार गाव विकसित केले जाईल. दहा वर्षात सकल राष्ट्रीय उत्पन्नातील सहकार क्षेत्राचा वाटा तिपटीने वाढवला जाईल. राष्ट्रीय सहकार धोरणात पुढील २५ वर्षातील सहकारी क्षेत्राचा वाटचालीचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून देशातील प्रत्येक गावात सहकारी संस्थांची जाळी उभारली जाणार आहेत. महिला, तरुण यांना केंद्रबिंदू मानून सहकारातून त्यांना सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे. राज्यांनी राष्ट्रीय सहकार धोरणानुसार राज्याचे सहकार धोरण तयार करण्याची आवश्यकता आहे. सहकारी बँका, साखर कारखाने यांना भरीव मदतीसह सर्व राज्यात सहकाराचा समांतर विकास, शहरातील टॅक्सी चालकांच्या सहकारी संस्था स्थापन करून ही सेवा डिसेंबरपूर्वी सुरू केली जाऊन त्यातून मिळणारे सर्व लाभ टॅक्सी चालकांना मिळणार आहेत. त्यामुळे प्रवासी तसेच टॅक्सी चालकांची पिवळणूक थांबवणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
तसेच केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी केंद्रीय सहकारिता मंत्रालयाच्या माध्यमातून देशातील सहकार क्षेत्राला नवसंजीवनी देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण संकल्पना आतापर्यंत मांडल्या, त्याची अंमलबजावणी देशात सुरू आहे. राष्ट्रीय सहकार धोरणाच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात एक नवी क्रांती घडेल आणि आपण सर्वजण त्याचे साक्षीदार, लाभार्थी असू. महाराष्ट्रातील सहकारी बँका यात महत्वाची भूमिका बजावण्यासाठी सज्ज आहेत. या राष्ट्रीय सहकार धोरणाचे मनापासून स्वागत करतो, असेही दरेकर यांनी म्हटले आहे.