छांगुरच्या ७५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीची कारवाई सुरू

    24-Jul-2025   
Total Views |

नवी दिल्ली : देशभरात धर्मांतरणाचे रॅकेट चालवणाऱ्या छांगुरविरुद्ध सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई सुरू केली आहे. ईडीने छांगुरच्या सुमारे ७५ कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या मालमत्तांवर जप्तीची प्रक्रिया सुरू केली असून, यामध्ये महाराष्ट्रातील लोणावला येथील मालमत्तेचाही समावेश आहे.

काही दिवसांपूर्वी ईडीने छांगुरच्या अनेक ठिकाणी छापेमारी केली होती. या कारवाईदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील उतरौला येथे असलेल्या ‘बाबा ताजुद्दीन बुटिक’वर पहाटे ५ वाजता छापा टाकला. ही तीन मजली बुटिक छांगुर आणि त्याचा मुलगा महबूब चालवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. स्थानिकांकडून माहिती घेतल्यानंतर दुकानात कोणताही कर्मचारी नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर अधिकृत परवानगीच्या आधारे दुकानाचे कुलूप तोडून ईडीने संपूर्ण ठिकाणाची तपासणी केली. ही तपासणी सकाळी साडेसात वाजता सुरू होऊन संध्याकाळी साडेपाचपर्यंत चालली.

या छापेमारीत ईडीला अनेक महत्त्वाचे पुरावे आणि दस्तावेज हाती लागले आहेत. त्यामध्ये छांगुर आणि नसीर वाडीलाल यांच्यात २०१७ मध्ये झालेला करार (एमओयू), नीतू आणि नवीन यांच्या धर्मांतरणासंबंधीचे दस्तावेज, पनामा देशात नोंदणीकृत मेसर्स लोगोस् मरीन या कंपनीचा नवीन रोहरासोबतचा करार, तसेच नीतू व एजी कन्स्ट्रक्शन यांच्यातील बांधकाम करार यांचा समावेश आहे. याशिवाय आश्वी बुटिक छांगुरकडे सोपवण्यासाठी तयार करण्यात आलेली एनओसी, नसीर वाडीलालकडून छांगुरला दिलेली पॉवर ऑफ अटर्नी आणि शफिउल्ला, प्रदीप व राजनारायण यांच्यात २०१४ मध्ये झालेला करार यांसारखे पुरावेही मिळाले आहेत.

ईडीच्या प्राथमिक तपासात छांगुरकडून धर्मांतरणाच्या आड देश-विदेशात आर्थिक व्यवहार आणि बोगस करारांद्वारे संपत्ती जमा करण्यात आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी अधिक खोलवर सुरू असून, लवकरच संबंधित मालमत्ता अधिकृतपणे जप्त करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.