भिगवणच्या पाणथळीवर दुर्मीळ संकटग्रस्त पक्ष्याचे दर्शन; चंबळ खोऱ्यातील पक्षी पुण्यात

    21-Jul-2025   
Total Views |

मुंबई :  संकटग्रस्त पक्ष्यांच्या यादीत नोंद असणाऱ्या 'इंडियन स्किमर' (indian skimmer Bhigwan) म्हणजेच 'पाणचिरा' या पक्ष्याचे दर्शन पुण्यातील भिगवण पाणथळ परिसरात घडत आहे. गेल्या दोन दिवसांपासून दोन पक्ष्यांचे वास्तव्य भिगवण परिसरात असून वन्यजीव छायाचित्रकारांची पाऊले या पक्ष्याला कॅमेर्यात टिपण्यासाठी वळत आहेत (indian skimmer Bhigwan). महाराष्ट्रात पाणचिरा पक्ष्याच्या फार कमी नोंदी असून अधिवास नष्टतेमुळे या पक्ष्याला संकटग्रस्त पक्ष्यांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. (indian skimmer Bhigwan)

उज्जनीच्या पाणलोट क्षेत्राचा भाग असलेला भिगवणचा परिसर म्हणजे पक्ष्यांचे नंदनवन. सध्या हिवाळी स्थलांतरित पक्ष्यांचा मेळा याठिकाणी भरला नसला तरी, पाणचिरा या संकटग्रस्त पक्ष्याचे दर्शन याठिकाणी घडत आहे. येथील स्थानिक पक्षीनिरीक्षक व दै. 'मुंबई तरुण भारत'च्या 'स्पिसीज अॅण्ड हॅबीटॅट्स वाॅरियर्स अवाॅर्ड'चे विजेते संदीप नगरे यांना रविवार दि. २० जुलै रोजी या पक्ष्याचे दर्शन घडले. गेल्या दोन दिवसांपासून दोन पक्षी पाणलोट क्षेत्रात दिसत असल्याची माहिती नगरे यांनी दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना दिली. यापूर्वी साधारण आठ आणि तीन वर्षांपूर्वी या पक्ष्यांचे दर्शन याठिकाणी झाल्याचे त्यांनी सांगितले. भिगवणमध्ये दिसत असलेल्या या पक्ष्यापैकी एक पक्षी हा निमवयस्क आहे. त्यांनी स्थलांतराला सुरूवात केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

'पाणचिरा' हा पक्ष्याच्या वीण वसाहती या प्रामुख्याने मध्य प्रदेशातील चंबल नदीचे खोरे आणि ओडिशामध्ये आहेत. अगदी तामिळनाडूमधूनही त्यांच्या नोंदी असल्या तरी, त्या एक किंवा दोन पक्ष्यांचा आहेत. त्यामुळे या पक्ष्याच्या हिवाळी स्थलांतराचा विस्तार मोठा असला तरी, संख्येने एक दोन पक्षी स्थलांतरित झालेले दिसतात. त्यामुळे त्यांच्या क्वचितच नोंदी होतात. मुंबईनजीकच्या उरण येथील पांजे पाणथळ क्षेत्रामध्ये दोन 'पाणचिरा' पक्षी दिसल्याच्या नोंदी आहेत. पालघरच्या किनाऱ्यावरुन देखील या पक्ष्याच्या नोंदी असून नाशिकमधील नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य, अमरावती आणि यवतमाळ येथील पाणथळ प्रदेशातही हा पक्षी दिसल्याच्या मोजक्या नोंदी आहेत.

'पाणचिरा' विषयी

'पाणचिरा' पक्षी चंबल नदी आणि ओडिशामधील काही भागात वाळूच्या बेटांवर आपली घरटी तयार करतात. साधारण फेब्रुवारीपासून ते या वीण वसाहतीमधील ठिकाणी परतायला सुरुवात करतात. ओडिशामध्ये एप्रिल महिन्यात त्यांची वीण आढळते. आॅगस्टमध्ये ते वीण वसाहती सोडून हिवाळी स्थलांतर करण्यास सुरुवात करतात. चंबल येथे टॅग करण्यात आलेले 'पाणचिरा' पक्षी हे गुजरातचा किनारा, उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथील गंगेच्या खोऱ्यात आणि आंध्रप्रदेशातील काही ठिकाणी आढळून आले आहेत. जल प्रदूषण आणि वाळू उपसा हे त्यांच्या वीण वसाहतीला असलेले धोके आहेत. यामुळे त्यांची संख्या घटली असून 'आययूसीएन'च्या लाल यादीत त्याला 'संकटग्रस्त' श्रेणीत स्थान देण्यात आले आहे.

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.