नवी दिल्ली : गुजरातच्या अहमदाबादमध्ये १२ जून रोजी झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताबाबत आंतरराष्ट्रीय माध्यमांकडून चुकीचे वार्तांकन करण्यात येत आहे. त्याविरोधात भारतीय वैमानिक महासंघाने (एफपीआय) ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ आणि ‘रॉयटर्स’ या परदेशी प्रसारमाध्यमांना कायदेशीर नोटीस बजावली असून मृत वैमानिकांना दोष देणारे वृत्तांकन थांबवून माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
एफआयपीचे अध्यक्ष कॅप्टन सी.एस. रंधावा म्हणाले की, एखाद्या अपघातानंतर चौकशी प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी निवडक आणि अप्रमाणित माहितीच्या आधारे निष्कर्ष काढणे हे अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे. वॉल स्ट्रीट जर्नल आणि रॉयटर्स या दोन्ही संस्थांनी आपल्या बातम्यांमधून मृत वैमानिकांवर थेट आरोप केले आहेत. हे केवळ चुकीचेच नाही तर त्यांची प्रतिष्ठाही धुळीस मिळवणारे आहे. त्यामुळे त्यांना कायदेशीर नोटीस बजावली असून त्यांच्याकडून त्वरित क्षमायाचना अपेक्षित आहे.
महासंघाने पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे की, जागतिक माध्यमांकडून वारंवार निवडक आणि अप्रामाणिक माहिती देत अंदाज व्यक्त केले जात आहेत. चौकशी सुरु असताना अशा प्रकारच्या निष्कर्षांमुळे केवळ जनतेमध्ये भीती पसरते आणि भारतीय विमान उद्योगाच्या सुरक्षिततेवर अनावश्यक प्रश्न उपस्थित होतात. नोटिशीत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, अंतिम अहवालाआधी कोणताही निष्कर्ष काढणे हे अप्रामाणिक ठरते. मृत वैमानिकांना दोष देणारी, त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना अपमानित करणारी कोणतीही भाषा टाळावी. चुकीच्या वृत्तांकनामुळे मृत वैमानिकांचे मनोबल खच्ची झाले असून त्यांचे कुटुंबीयही मानसिक त्रासात आहेत, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाच्या (एनटीएसबी) अध्यक्षा जेनिफर होमेंडी यांनीही पाश्चिमात्त्य माध्यमांना सुनावले. एअर इंडिया अपघाताविषयीच्या प्राथमिक अहवालावर आधारित सध्याचे काही वृत्तांकन हे अंदाजावर आधारित आहे. अशा मोठ्या अपघातांच्या चौकशीस वेळ लागतो. अंतिम अहवालाच्या आधी कोणताही निष्कर्ष काढू नये, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.