प्रज्ञा, करुणा, मैत्रीचा संगम...

    12-Jul-2025   
Total Views |

Girish Prabhune all the best and may God grant him good health and long life
 
‘पद्मश्री’ गिरीश प्रभुणे यांनी आपले अवघे आयुष्य शोषित, वंचित समाजाच्या उत्थानासाठी समर्पित केले. आज, शनिवार, दि. 12 जुलै रोजी त्यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त प्रभुणे काकांच्या समग्र कार्याचा परिचय करून देण्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे ‘समाजऋषी गिरीश प्रभुणे’ हा विशेषांक प्रसिद्ध करीत आहोत. अर्थात, गिरीश प्रभुणे यांच्या विचारकार्याचा इत्थंभूत तपशील एका विशेषांकात मांडणे अशक्यच. त्यामुळे या विशेषांकात प्रभुणे काकांचे विचारकार्य, रा. स्व. संघ समर्पित जीवन आणि त्यांच्या विचारांमुळे शून्यातून घडलेल्यांचे प्रत्यक्ष अनुभव मांडण्याचा अल्पसा प्रयत्न केला आहे. ‘पद्मश्री गिरीश प्रभुणे अमृतमहोत्सव समिती’ आणि ‘क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने आज, दि. 12 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह, पिंपरी-चिंचवड, पुणे येथे पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचा अभीष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे गिरीश प्रभुणे यांना लक्ष लक्ष शुभेच्छा आणि ईश्वर त्यांना सुस्वास्थ्य आणि दीर्घायु देवो, हीच प्रार्थना.
 
- संपादक
 
गिरीश प्रभुणे या सहा अक्षरांत सामावली आहे,
 
प्रज्ञा-करुणा अन् मैत्री
प्रज्ञेेचा प्रवाह म्हणजे गिरीश
कारुण्याचा झरा म्हणजे प्रभुणे
मैत्रीचे दोन्ही बाहु म्हणजे गिरीश प्रभुणे
 
‘भटके आणि विमुक्तांना मुख्य प्रवाहात आणले पाहिजेे!’ हे वाक्य ऐकायला चांगले आहे. पण, गिरीशने ‘मुख्य प्रवाहा’लाच भटके समूहांच्या पालावर नेले. प्रज्ञेशिवाय ते शक्य नाही. प्रज्ञावंत समस्यांवर भाषणे देत फिरत नाही, तो समस्येच्या मुळाशी जातो, समस्येच्या आक्राळ-विक्राळ स्वरुपाचे दर्शन घेतो. हे दर्शन त्यांना समस्यापूर्तीचे दर्शन घडविते. त्यातून यमगरवाडी, चिंचवड अनसरवाडा, मगर सांगवी, नेर्ले आणि इतर प्रकल्प उभे राहतात. मनात आत्यंतिक करुणा निर्माण झाल्याशिवाय अशी कामे उभी राहात नाहीत. “माझ्या देशातील एक श्वान जरी भुकेला राहिला, तरी मला मुक्ती नको,” हा विवेकानंदांचा विचार यासाठी जगावा लागतो.
 
पारधी वस्तीतील एखाद्यावर प्रहार झाल्यास त्याचे वळ गिरीशच्या पाठीवर उमटत. एकात्मता, एकरसता, समरसता कारुण्याचा झरा झाल्याशिवाय प्रकट होत नाही. दोन्ही हात पसरवून सर्व भटके बंधु-भगिनी आणि बालके यांना छातीशी धरणे म्हणजे ‘गिरीश प्रभुणे होणे’ होय. मैत्रीभावना याचे दुसरे नाव बंधुता आहे. सर्वांत मी आणि माझ्यात सर्व म्हणजे ‘मैत्री.’ अशी मैत्री कृष्णाने गोकुळात केली, भगवान बुद्धांनी सर्व समाजात केली, स्वामी विवेकानंदांनी विश्वात केली, गिरीशच्या मैत्री प्रवाहाची व्याप्ती किती? ज्याची जेवढी नजर जाईल तेवढी!
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रज्ञा, करुणा, मैत्रीचे अक्षय ऊर्जा केंद्र आहे. संघ परिसस्पर्श गिरीशला झाला आणि गिरीश संघमय झाला. ही भारतमाता आपल्या सर्वांची जननी-जन्मभूमी, आपण तिची लेकरे, एकाच मातेचे स्तनपान करणारी आपण तिचे बालक-बालिका आहोत. येथे कोण सवर्ण, कोण अवर्ण, कोण उच्च, कोण नीच, कोण स्पृश्य, कोण अस्पृश्य, सगळे अर्थहीन शब्द
‘आम्ही सर्व एक’ ही तर आमुची स्वाभाविक ललकारी रे...
 
गिरीशने ही ललकारी पुण्यातील पेठांमध्ये, मुंबईतील वस्त्यांमध्ये आणि महाराष्ट्रात सर्वत्र घुमविली. अत्यंत अवघड काम, पण ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ ही उक्ती गिरीशने सार्थ केली. राष्ट्राचे पुनरुत्थान म्हणजे राष्ट्राच्या विचार-परंपरेचे, ज्ञान परंपरेचे, कला-कौशल्य परंपरेचे पुनरुत्थान. राष्ट्राचे पुनरुत्थान म्हणजे भटके-विमुक्त समाजाचे पुनरुत्थान, दलित-मागास वर्गाचे पुनरुत्थान. फुले, शाहू, आंबेडकर, हेडगेवार, श्रीगुरूजी, सावरकर, विवेकानंद यांच्या विचारांची कालसापेक्ष मांडणी!
अशा मांडणीसाठी आणि राष्ट्रीय पुनरुत्थानासाठी जीवन वेचणारा, व्रतस्थ म्हणजे गिरीश प्रभुणे. ही वाट खडतर, काट्याकुट्यांची स्वकीयांची बोलणी खाण्याची, ‘अवहेलनेची पत्थर काटे तुडवीत आलो तिमीरातून भयाण,’ ही संघगीताची ओळ केवळ गायची नसते, तर, जगायची असते; गिरीशने ती जगून दाखविली.
 
आपण काही न करता ज्यात वाढ होते, त्याला ‘वय’ म्हणतात आणि रोज वाढणार्‍या वयात म्हणजे जीवनात जेव्हा अर्थ भरला जातो, तेव्हा त्या जीवनाचे नाव होते ‘गिरीश प्रभुणे.’ ‘गिरीश’, ‘गिरीशजी’ आणि ‘गिरीश काका’ असा हा सार्वजनिक जीवनाचा प्रवास आहे. या प्रवासाला आता पंचाहत्तरी होत आहे. हजारो उपेक्षितांचे रक्ताचे काका होणे, ही सामान्य गोष्ट नाही. उपेक्षितांना भुलवून नादी लावणे सोपं असतं, यांच्या हृदयात प्रवेश मिळवून ’काका’ बनणे कठीण!
 
गिरीशजींच्या पंचाहत्तरीचा प्रवास हा ध्येयवेड्या माणसाचा प्रवास आहे. हा प्रवास प्रज्ञा, करुणा, मैत्रीचा अखंड प्रवास.
 
हा अखंड नंदादीप जळणार, सतत जळणार...
हा असाच तेवत जगती निज प्रकाश नित देणार...
 
या संघगीताच्या ओळीतून ‘गिरीश’ नावाच्या नंदादीपाचा परिचय घडतो. या तेजस्वी आणि आल्हाददायक प्रकाशात आपणही चार पाऊले चालण्याचा संकल्प करूया.