इस्रायलविरुद्ध इराण सामना : कसोटी का ‘टी-ट्वेंटी’?

    17-Jun-2025   
Total Views |


मध्य-पूर्वेसह जागतिक चिंतेत भर घालणार्‍या इस्रायल-इराण संघर्षात अमेरिकाही उडी घेते का, याविषयी सध्या तर्कवितर्क लढवले जात आहेत. अमेरिकेने या संघर्षात इराणविरोधात इस्रायलची साथ दिल्यास हे युद्ध ‘टी ट्वेंटी’प्रमाणे वेगवान पण, छोटेखानी ठरेल, अन्यथा त्याचे रशिया-युक्रेन युद्धाप्रमाणे कसोटी सामन्यांत रूपांतर व्हायला फारसा वेळ लागणार नाही.

इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष काही नवा नाही. १९७९ साली इराणमध्ये इस्लामिक क्रांती होण्यापूर्वी दोन्ही देशांमध्ये अधिकृत नसले, तरी मैत्रीपूर्ण संबंध होते. इस्लामिक क्रांतीनंतर इराणमध्ये आलेल्या अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांच्या नेतृत्वाखालील राजवटीने अमेरिकेला ‘मोठा सैतान’, तर इस्रायलला ‘लहान सैतान’ ठरवत पृथ्वीतलावरून यहुदी राष्ट्राचे नामोनिशाण मिटवणे, हे आपले उद्दिष्ट मानले. पश्चिम आशियातील सर्वांत प्रबळ लष्करी ताकद म्हणून ओळख असलेल्या इस्रायलचे अस्तित्व पुसून टाकणे सोपे नसले, तरी गेल्या चार दशकांमध्ये इराणने इस्रायलभोवती आपल्या हस्तकांचा विळखा घातला. सीरियामध्ये सुरुवातीला हाफिज आणि त्यानंतर बशर अल असद यांची राजवट, लेबेनॉनमध्ये ‘हिजबुल्ला’, गाझा पट्टीमध्ये ‘हमास’ आणि ‘इस्लामिक जिहाद’ आणि येमेनमध्ये ‘हुती’ गटांना हाताशी धरले. त्यांना आधुनिक शस्त्रास्त्रे पुरवणे, त्यांना प्रशिक्षण देणे, त्यांना आर्थिक रसद पुरवणे आणि त्यासाठी ‘इस्लामिक रिवोल्युशनरी गाडर्स’ या आपल्या लष्करी संघटनेद्वारे जगभरात उद्योगांचे जाळे उभारणे, हा इराणच्या युद्धनीतीचा मुख्य भाग झाला. इराणचे राज्यकर्ते धर्मांध असून, स्वतः नष्ट होण्याची पर्वा न करता इस्रायल नष्ट करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे, असे मानणारे विश्लेषक आहेत; तसेच इराणची राजवट अत्यंत धूर्त असून पश्चिम आशियातील सुन्नी आणि अरबबहुल लोकांचे नेतृत्व करण्यासाठी अमेरिका आणि इस्रायलविरोधाचा केवळ एक अवजार म्हणून ते वापर करत आहेत, असे मानणारेही विश्लेषक आहेत. हे मात्र खरे आहे की, इराणने समर्थन दिलेल्या संघटनांनी घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये आजवर इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे.


दि. ७ ऑटोबर २०२३ रोजी ‘हमास’ने इस्रायलची सीमा ओलांडून इस्रायलवर हल्ला केला, तेव्हा काही तासांसाठी अनेक इस्रायली आणि ज्यू लोकांच्या मनात दुसर्‍या महायुद्धादरम्यान झालेल्या ‘होलोकास्ट’च्या आठवणी जाग्या झाल्या. इस्रायलने जेव्हा ‘हमास’विरुद्ध लष्करी कारवाईला सुरुवात केली, तेव्हा आंतरराष्ट्रीय विश्लेषकांचा अंदाज होता की, हे युद्ध फार तर महिना-दोन महिने चालेल. त्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दबावापोटी किंवा मग जर या युद्धामध्ये ‘हिजबुल्ला’, ‘हुती’ आणि सीरिया उतरल्यास एवढ्या आघाड्यांवर युद्ध लढणे अशय असल्याने इस्रायल शस्त्रविराम मान्य करेल. आज पावणे दोन वर्षे झाली, तरी गाझा पट्टीतील युद्ध संपले नसले, तरी दरम्यानच्या काळात घडलेल्या नाट्यमय घडामोडींमध्ये इस्रायलने ‘हमास’चे कंबरडे मोडून गाझा पट्टी उखडून टाकली आहे. ‘हिजबुल्ला’ने या युद्धात उतरण्याचा प्रयत्न केला असता, इस्रायलने त्यांचा म्होरया हसन नसरल्लासह ‘हिजबुल्ला’चे वरिष्ठ नेतृत्व संपवले. ‘हिजबुल्ला’च्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून संदेशवहनासाठी वापरल्या जाणार्‍या पेजरमध्ये स्फोट घडवून आणून, तीन हजारांहून जास्त दहशतवाद्यांना जायबंदी केले. ‘हिजबुल्ला’ची हतबल अवस्था बघून तुर्कीए समर्थित गटांनी सीरियामधील बशर अल असदची राजवट संपवून टाकली. ‘हुतीं’कडून आजही इस्रायल आणि तांंबड्या समुद्रातील अमेरिकेच्या जहाजांवर क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले होत असले, तरी त्यामुळे होणारे नुकसान मर्यादित आहे. दरम्यानच्या काळात इस्रायलने इराणची राजधानी तेहरानमध्ये ड्रोन हल्ला करून ‘हमास’चा नेता इस्माइल हानियाला मारल्यानंतर इराणने इस्रायलविरुद्ध ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचे हल्ले केले आणि इस्रायलने ते स्वतःची हवाईहल्ले विरोधी यंत्रणा तसेच, मित्रदेशांच्या सहकार्याने यशस्वीरित्या थोपवले. असे असले तरी इस्रायल इराणवर हवाई हल्ले करेल आणि अवघ्या आठवडाभरात इराणच्या अण्वस्त्र तंत्रज्ञान विकास केंद्र, क्षेपणास्त्र निर्मिती प्रकल्प आणि तळ तसेच, तेल साठवणूक केंद्रांचे प्रचंड नुकसान करेल, अशी कोणीही कल्पना केली नव्हती. याचे कारण इस्रायल आणि इराण यांच्यातील किमान अंतर सुमारे एक हजार किमी असून, इराणची राजधानी तेहरान इस्रायलची राजधानी जेरुसलेमपासून सुमारे एक हजार, ५०० किमीवर, तर त्यांची काही अण्वस्त्र तंत्रज्ञान विकास केंद्र दोन हजार किमी अंतरावर आहेत. वाटेत सीरिया आणि इराक आहेत. गेली ४६ वर्षे इराणवर अमेरिकेचे निर्बंध असले, तरी त्यापूर्वी अमेरिकेने इराणला अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पुरवली असल्याने त्यांच्या जीवावर इराणने ‘हवाई हल्ले प्रतिबंधक यंत्रणा’ उभारली होती. दि. १३ जून २०२५ रोजी इस्रायलने धाडसी हल्ले करताना इराणची महत्त्वाची केंद्रे उद्ध्वस्त करत, इराणच्या लष्करी नेतृत्वाला तसेच, त्यांच्या वरिष्ठ अणुशास्त्रज्ञांनाही संपवले. या हल्ल्यांमध्ये इस्रायलच्या २०० हून अधिक लढाऊ विमानांनी भाग घेतला. तसेच, ‘मोसाद’च्या गुप्तहेरांनी थेट इराणमध्ये घुसून तेथून ड्रोनच्या साहाय्याने हल्ले केले.


इस्रायलने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन रायसिंग लायन’ची तीन प्रमुख उद्दिष्टे आहेत. इराणच्या अण्वस्त्र निर्माण करू पाहणार्‍या लष्करी नेतृत्व आणि वैज्ञानिकांना संपवणे, तसेच तेथील अण्वस्त्र तंत्रज्ञान विकास प्रकल्पांवर हल्ले करणे. इराणकडील दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा साठा नष्ट करणे आणि इराणची शासनव्यवस्था खिळखिळी करून तेथील जनतेला उठाव करण्यासाठी सुयोग्य परिस्थिती निर्माण करणे. १९७९ साली इस्लामिक क्रांती होण्यापूर्वी हजारो वर्षे हाती तलवार घेतलेला सिंह आणि त्यापाठी उगवणारा सूर्य हे इराणच्या संस्कृतीचे प्रतीक होते. या सिंहाला इराणच्या झेंड्यावरही स्थान होते. युद्धाच्या पहिल्या दिवशी इस्रायलने इराणची ‘हवाई हल्ले प्रतिबंधक यंत्रणा’ उद्ध्वस्त केली. इराणने प्रतिहल्ला करताना इस्रायलविरुद्ध एकाच वेळेस १००हून अधिक दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा मारा केला. इस्रायलने यातील ९५ टक्के क्षेपणास्त्रे हवेतल्या हवेत नष्ट केली असली, तरी जमिनीवर आदळलेल्या क्षेपणास्त्रांनी तेल अविव, ‘रिशॉन लिझिऑन’, रोहोवोतमधील ‘वाईझमन इन्स्टिट्यूट’ तसेच हैफा बंदराजवळ इमारतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. यातील प्रत्येक क्षेपणास्त्र एक हजार टन स्फोटके वाहून नेते हे लक्षात घेता, इस्रायलमध्ये झालेली जीवितहानी अत्यंत मर्यादित आहे. इस्रायलच्या प्रत्येक नवीन इमारतीत बॉम्ब संरक्षक कक्ष असल्यामुळे इराणने क्षेपणास्त्रे डागल्यानंतर पुढील दहा मिनिटांत नागरिकांना या कक्षांमध्ये जायला सांगण्यात येते.





इस्रायलने आपल्या कारवाईच्या पुढील टप्प्यात राजधानी तेहरानमधील तेलसाठ्यांवर, तसेच सरकारी दूरचित्रवाणी केंद्रावर हल्ले केले. आता इस्रायलने तेहरानच्या आकाशावर आपले प्रभुत्व असल्याचे घोषित करून तेहरानच्या जनतेला स्वतःच्या सुरक्षेसाठी शहर सोडून बाहेर पडायला सांगितले आहे. विश्लेषकांचे असे मत आहे की, इस्रायलने इराणच्या आण्विक केंद्रांचे नुकसान केले असले, तरी ही केंद्रे जमिनीखाली खोलवर असल्यामुळे ती उद्ध्वस्त करायची असेल, तर अमेरिकेला या युद्धात उतरावे लागेल. अमेरिका आणि इराणच्या इस्लामिक राजवटीतील ४५ वर्षांचे वैर लक्षात घेता, ट्रम्प यांनी युद्धात उतरावे असा त्यांच्याच पक्षातून दबाव आहे. इस्रायलचे असे गणित आहे की, इराणकडे जास्तीत जास्त दोन आठवडे क्षेपणास्त्रांचा मारा करण्याची क्षमता आहे. तोवर कळ काढली, तर इराणमधील इस्लामिक राजवट अमेरिकेच्या अटींवर वाटाघाटींना तयार होईल किंवा मग आखाती अरब देशांमधील अमेरिकेच्या तळांवर हल्ला करून या युद्धाचे प्रादेशिक युद्धामध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न करेल. असे झाल्यास अमेरिका आणि मित्रराष्ट्रे या युद्धामध्ये उतरल्यामुळे इस्रायलचा भार हलका होईल. डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘जी७’ परिषद संपण्यापूर्वीच तेथून प्रयाण केल्याने, तसेच अमेरिकेच्या आग्नेय आशियात तैनात केलेल्या नौदलाचा काही भाग आता आखाताकडे मार्गस्थ झाल्याने अमेरिका या युद्धामध्ये उतरणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेच्या दबावापुढे इराण झुकल्यास हे युद्ध ‘टी ट्वेंटी’प्रमाणे वेगवान पण, छोटेखानी ठरेल, अन्यथा त्याचे रशिया-युक्रेन युद्धाप्रमाणे कसोटी सामन्यांत रूपांतर होईल.

अनय जोगळेकर

आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणाचे अभ्यासक असून राजकीय घडामोडींचे विश्लेषक आणि विशेष प्रकल्पाधिकारी म्हणून ते गेली १२ वर्षं कार्यरत आहेत. वाणिज्य शाखेतील पद्व्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली आहे. एकात्मिक जलव्यवस्थापन या विषयात ते मुंबई विद्यापीठातून पीएचडी करत आहेत.  इंटरनेट, तंत्रज्ञान, समाज माध्यमं आणि जागतिकीकरण हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. संगणकीय मराठी आणि भारतीय भाषांमध्ये माहिती तंत्रज्ञान सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी काम केले असून सध्या राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळात ते अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. मुक्त स्तंभलेखक म्हणून ते गेली ८ वर्षं विविध वर्तमानपत्र तसेच ब्लॉगच्या माध्यमातून लिहित आहेत.