वॉशिंग्टन : इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला आहे. इस्रायलने केवळ इराणच्या अणू ठिकाणांवर हल्ले केले नाहीत, तर नऊ शास्त्रज्ञांनाही ठार केले आहे, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, "इराणवर झालेल्या ताज्या इस्रायली हल्ल्यांमध्ये अमेरिकेची काहीही भूमिका नव्हती. पण, इराणने अमेरिकेवर हल्ला केला, तर आमचे लष्कर संपूर्ण ताकदीने त्याच्यावर तुटून पडेल. ही कारवाई अशी असेल, जिचा विचार इराणने कधीच केला नसेल.” अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही पोस्ट शेअर केली.
इस्रायल आणि इराण यांनी गुरुवारी रात्री उशिरापासूनच एकमेकांवर ड्रोनहल्ले सुरू केले आहेत. इस्रायलने दावा केला आहे की, "जर इराण अण्वस्त्र बनविण्यात यशस्वी झाला, तर तो याचा उपयोग इस्रायलला नष्ट करण्यासाठी करेल.” ट्रम्पने लिहिले, "आज रात्री इराणवर झालेल्या हल्ल्याशी अमेरिकेचा काहीही संबंध नाही. पण, जर इराणने कोणत्याही स्वरुपात अमेरिकेवर हल्ला केला, तर अमेरिका संपूर्ण लष्करी शक्तीने त्याच्यावर हल्ला करेल. इराणने अशी कारवाई पूर्वी कधीही पाहिलेली नाही.” तसेच त्यांनी हा दावादेखील केला की, "ते इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेला सैन्यसंघर्ष संपवू शकतात.”
अमेरिकेशी बोलण्यात काही अर्थ नाही : इराण
इराणने अमेरिकेसोबतच्या अणुचर्चा निरर्थक घोषित केल्या आहेत. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले की, "इस्रायली हल्ल्यांना अमेरिकेचा पाठिंबा होता. या हल्ल्यांमुळे अमेरिकेसोबत चर्चा करण्याच्या शयता पूर्णपणे संपल्या आहेत.
भारतीय नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना इराण आणि इस्त्रायल या देशांतील संघर्षामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भारताने अलर्ट होत तेथील आपल्या नागरिकांसाठी महत्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. इराणमधील सध्याची परिस्थिती पाहता भारतीय नागरिक आणि इराणमधील भारतीय वंशाच्या व्यक्तींना सतर्क राहणे, सर्व अनावश्यक हालचाली टाळणे आणि दूतावासाच्या सोशल मीडिया अकाउंट्सचे अनुसरण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.