ढाका(Attack on Hindus): बांगलादेशात होणाऱ्या हिंदू अत्याचाराच्या मालिकेने कळस गाठला आहे. येथील गोपाळगंज जिल्ह्यातील कोटालीपारा भागात २४ तासांत तब्बल सहा हिंदू मंदिरांमध्ये लुटमार झाली. हा प्रकार रविवार, दि. १५ जून रोजी उघड झाला. नेत्रकोना जिल्ह्यात कट्टरपंथींनी हरिदास समुदायाच्या हिंदू कुटुंबांची घरे उद्ध्वस्त केली. गोपाळगंज नेत्रकोना आणि सुनामगंज जिल्ह्यातील हिंदू जास्त या अत्याचारापासून पीडित आहे.
बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याक समाजावर अत्याचार, मंदिरे तोडफोड, महिलांचे लैंगिंक शोषण आणि धार्मिक दंगलीच्या घटना गेल्या काही वर्षांत वाढल्या आहेत. त्यातच सुनामगंज जिल्ह्यातील दुआरा पारा येथील एका स्थानिक महिलेने सांगितले, “१२ जून रोजी आमच्या गावातील एका मंदिरात लुटमार झाली होती. दुसऱ्या दिवशी आणखी चार मंदिरांमध्ये तोडफोड आणि चोरी झाली. पूजा साहित्य, पितळी आणि चांदीच्या मूर्ती लुटल्या गेल्या.”
“पितळ आणि चांदीच्या भांड्यांची पुनर्खरेदी आर्थिकदृष्ट्या अशक्य आहे. दरवेळी चोरीला गेलेले साहित्य आम्ही परत आणू शकत नाही. आम्ही सरकारकडे योग्य कारवाईची मागणी करतो,” असे ती म्हणाली. एका वृद्ध महिलेने सांगितले की, ती दररोज राधा-कृष्णाच्या चांदीच्या मूर्तीची पूजा करत होती, परंतु १३ जूनच्या सकाळी मूर्तीवरील दागिने गायब असल्याचे आढळले. मंदिरातील पितळी मूर्तीही अतिरेक्यांनी लंपास केल्या.
घर उध्वस्त, छप्परही नाही!
बांगलादेशातील नेत्रकोना जिल्ह्यातील पूर्वधला उपजिल्ह्यात, हरिदास समुदायाच्या हिंदू कुटुंबांवर मुस्लिम जमावाने लक्षित हल्ले केले. स्थानिक सूत्रांनुसार, ५ घरे जमीनदोस्त करण्यात आली आणि घरातील मौल्यवान वस्तू आणि रोकड लुटण्यात आली. कट्टरपंथी जमावाने हल्ला करण्यापूर्वी या परिसरात ‘जनाब अली मरकाजुन नूर अल इस्लामिया मदरसा’चे फलक लावले होते. पीडितांनी सांगितले की, ‘हे प्रयत्न हिंदूंना तिथून हटवण्यासाठी रचलेले होते. आता आमच्याकडे ना घर आहे ना छप्पर. आम्ही जमिनीवर झोपतो आहोत. पोलिसांनी तक्रार घेतली पण अजूनही कोणतीही कारवाई झालेली नाही,” असे एका पीडित हिंदूने सांगितले.
प्रशासनाची निष्क्रियता?
पीडित हिंदू कुटुंबे सरकारकडे न्यायाची मागणी करत आहेत. पोलिसांकडे तक्रारी दाखल झाल्यानंतरही दोषींवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. स्थानिक प्रशासनाने कारवाईचे आश्वासन दिले असले तरी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.