वन्यजीवांचा खाकीतला रक्षक

    12-Jun-2025   
Total Views |
 
Dhananjay Gutte
 
अंगावर परिधान करणारी खाकी ही वनविभागाची नसली, तरी पोलीस दलाची खाकी परिधान करून निसर्गसेवेचे कर्तव्य बजावणारे पोलीस हवालदार धनंजय छगन गुट्टे यांच्याविषयी...
 
हा माणूस पोलीस दलाची खाकी परिधान करत असला, तरी त्याचे मन रमते ते निसर्गात. वन्यजीव छायाचित्रण आणि वन्यजीव बचावाच्या माध्यमातून हा माणूस लातूरमध्ये वन्यजीव संवर्धन आणि जनजागृतीचे काम करतो. छायाचित्रणाच्या कौशल्याच्या बळावर लातूरची जैवविविधता जगासमोर उलगडणारा हा माणूस म्हणजे धनंजय गुट्टे.
 
गुट्टे यांचा जन्म दि. 1 जानेवारी 1983 साली बीड जिल्ह्यातील परळीमधील गुट्टेवाडी येथे सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. निसर्गात रमणार्‍या अनेकांना निसर्गप्रेमाची आवड ही बालवयातच निर्माण झालेली असते. तसेच काहीसे गुट्टे यांचे झाले. त्यामुळे त्या लहानवयातच निसर्गभ्रमंती सुरू झाली. महाविद्यालयीन शिक्षणासाठी अंबेजोगाई गाठले. तेथील स्वामी रामानंद तिर्थ महाविद्यालयातून कला शाखेतील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. या शिक्षणादरम्यान त्यांची कॅमेर्‍यासोबत गट्टी जमली.
 
कॅमेर्‍यासोबतची ही जवळीक खरं तर निसर्गामुळे निर्माण झाली, तीदेखील छायाचित्रांच्या अपरिहार्य मागणीमुळे.
गुट्टे यांनी अंबेजोगाईत महाविद्यालयीन शिक्षणादरम्यानच वन्यजीव प्रबोधनाविषयी काम करण्यास सुरुवात केली. आसपासच्या गावांमध्ये सापांविषयी अनेक समजुती होत्या. या समजुतींना दूर करण्यासाठी गुट्टे गावोगावी जाऊन जनजागृतीपर सादरीकरण करायचे. यावेळी वृक्ष आणि पक्ष्यांविषयीदेखील माहिती द्यायचे. मात्र, त्यावेळी सादरीकरणामध्ये आवश्यक असणार्‍या वन्यजीवांच्या छायाचित्रांची वानवा असे. त्यामुळे स्वतःकडेच असणार्‍या छोट्या कॅमेर्‍याच्या माध्यमातून त्यांनी वन्यजीव छायाचित्रणाला सुरुवात केली. या माध्यमातून काढलेली छायाचित्रे सादरीकरणामध्ये वापरू लागले. सापांविषयी प्रबोधन करण्याबरोबरच सर्पबचावाच्या कामालाही सुरुवात केली.
 
गुट्टे यांना महाविद्यालयीन वयात शिक्षकी पेशाविषयी आवड निर्माण झाली होती. मात्र, चित्रपट आणि सैन्यदलामुळे देशसेवेसंबंधीच्या नोकरीकडेही त्यांचा कल होता. गुट्टे यांनी देशासेवा निवडली आणि पोलीस दलात भरती होण्याचा निर्णय घेतला. भरतीचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाला. मात्र, हार न मानता प्रयत्न सुरू ठेवले. स्पर्धा परीक्षांमध्येदेखील नशीब आजमावले. मात्र, नशिबाने त्यांना देशसेवेसाठीच निवडले होते. दुसर्‍या प्रयत्नामध्ये ते पोलीस दलात भरती झाले. जुलै 2006 साली ते नांदेड येथे ‘पोलीस हवालदार’ म्हणून रुजू झाले. त्याठिकाणी पाच वर्षे काम केल्यानंतर त्यांची बदली 2011 साली लातूर येथे झाली. सध्या ते लातूर येथील अंगुलीमुद्रा विभागात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. तेथेही त्यांनी त्यांच्या टीमसोबत उत्कृष्ट कार्य केले असून महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला आहे. नोकरीच्या ठिकाणीदेखील गुट्टे यांनी आपल्या निसर्गप्रेमाची आवड जोपासली. लातूर जिल्ह्याची जैवविविधता नोंदविण्याचे, तिथली वन्यजीव संपदा कॅमेर्‍यात टिपण्याचे आणि वन्यजीव बचावाचे काम ते अव्याहतपणे करीत आहेत. तसेच लातूर जिल्ह्यातील वन्यजीवांचे उत्तम छायाचित्रणही ते करतात. पक्ष्यांची छायाचित्रे टिपून त्यांच्या नोंदी घेतात. या नोंदी ‘ई-बर्ड’सारख्या व्यासपीठावर नोंदवून जिल्ह्याच्या पक्षी वैभवाचे दस्ताऐवजीकरण करतात. गुट्टे यांनी लातूर जिल्ह्यातील आजवर 300 पक्ष्यांच्या नोंदी केल्या आहेत.
 
स्थलांतरित ‘क्रेन’ पक्षी हे धान्य खात असल्याने शेतकर्‍यांच्या मनात त्यांच्याविषयी निर्माण झालेल्या नकारात्मक भावनेला बदलण्यासाठीदेखील ते प्रयत्नशील आहेत. वन्यजीव बचावाचे कामदेखील ते पोलीस दलातील आपली नोकरी सांभाळून करतात. खवले मांजरासारख्या दुर्मीळ वन्यजीवाचा बचावदेखील त्यांनी लातूर जिल्ह्यातून केला. याशिवाय वन्यजीव गुन्हे संबंधातील प्रकरणेदेखील ते खुबीने हाताळतात. जिल्ह्यातील शाळांमध्ये वन्यजीव जनजागृती, बीजसंकलन, सीडबॅल तयार करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजनही ते करतात. जिल्ह्याची जैवविविधता अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी समाजमाध्यमांचा आधार घेऊन आकर्षक छायाचित्रणांसह संबंधित वन्यजीवाची सखोल माहिती गुट्टे प्रसिद्ध करतात. गुट्टे यांच्या सामाजिक आणि पोलीस खात्यातील उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक पुरस्कारांनी त्यांना यथोचित सन्मानितही करण्यात आले आहे.
 
 
छायाचित्रणाच्या या आवडीला गुट्टे यांनी केवळ वन्यजीवांपर्यंत मर्यादित ठेवलेले नाही, तर पोलीस दलातील आपल्या नियमित कार्यासाठीदेखील ते छायाचित्रणाच्या कौशल्याचा वापर करतात. पोलीस दलाच्या ‘क्राईम सीन फोटोग्राफी’ स्पर्धेचे ते राष्ट्रीय स्तरावरील विजेते आहेत. ‘क्राईम सीन’वरचे छायाचित्रण कसे करावे, याचे तीन महिन्यांचे प्रशिक्षण त्यांनी ‘सीआयडी’कडून मिळवले आहे. याशिवाय परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्यातील ‘पोलीस फोटोग्राफी’ स्पर्धेतही त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. आजही ते विद्यार्थी आणि गावांमध्ये जाऊन वन्यजीव जनजागृतीचे काम करीत आहेत. अंगावर परिधान करणारी खाकी ही वनविभागाची नसली, तरी वन्यजीवांसाठी झटून काम करणार्‍या गुट्टे यांना पुढील वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.