जगात केवळ 700च्या संख्येत राहिलेल्या नष्टप्राय श्रेणीतील तणमोर पक्ष्याचा रत्नागिरीतून उलगडा करणार्या अॅड. प्रसाद दत्तात्रय गोखले यांच्याविषयी...
हा माणूस पक्ष्यांचा याचिकाकर्ता. त्यांच्या दिवसाची सुरुवात होते, कुठल्यातरी पक्ष्याच्या शोधात आणि शेवट होतो, न्यायालयाच्या आवारात. पेशाने वकील, मात्र पक्षीमय आयुष्य जगणारा हा माणूस! या माणसाने रत्नागिरीतून अनेक दुर्मीळ पक्ष्यांची नोंद केली. रत्नागिरीचे पक्षीवैभव आपल्या कॅमेर्यात टिपण्यासाठी रानवाटा तुडवणारा हा माणूस म्हणजे, अॅड. प्रसाद गोखले.
अॅड. गोखले यांचा जन्म दि. 16 ऑक्टोबर 1982 रोजी रत्नागिरीत झाला. गोखले कुटुंब तसे सर्वसामान्य मध्यमवर्गीय. वडील दत्तात्रय गोखले यांचा छोटासा व्यवसाय, तर आई गृहिणी. अॅड. गोखले यांचा जन्म रत्नागिरी शहर परिसरातील असला, तरी त्याकाळी रत्नागिरी शहर परिसरात आतासारखा गजबजाट नव्हता. गोखले यांचे शिक्षण रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात पार पडले.
याठिकाणी त्यांनी आपले ‘बीए-एलएलबी’चे शिक्षण पूर्ण केले. कॅमेर्याच्या छंदामुळे त्यांना निसर्ग ज्ञात झाला आणि निसर्गामुळे पक्षी. मग काय, अॅड. गोखले यांच्याकरिता रत्नागिरी तालुक्यामधील सडे, खाड्या, किनारे आणि देवराया छायाचित्रणाच्या सरावशाळा बनल्या. या सर्व परिसंस्थांच्या ‘लॅण्डस्केप’ छायाचित्रणाला सुरुवात करून गोखले यांनी छायाचित्रणाचा श्रीगणेशा केला. सोबतच 2009 साली रत्नागिरी जिल्हा न्यायालयात वकिलीलादेखील सुरुवात केली. वकिली सांभाळून सुटीच्या दिवसांत छायाचित्रण सुरू होते. रत्नागिरीच्या निसर्गातल्या अनेक छटा कॅमेर्यात कैद होत्या. मात्र, आता कुतूहल निर्माण झाले होते, निसर्गातील सूक्ष्म घटकांना टिपण्याचे. छायाचित्रणाच्या वेडापायी निसर्गात फिरल्यामुळे वन्यजीवांविषयी कुतूहल निर्माण झाले होते. हेच कुतूहल शमवण्यासाठी मग अॅड. गोखले यांच्या छायाचित्रणाचा ओढा वन्यजीव छायाचित्रणाकडे वळला.
वन्यजीवांमधील सहजपणे दिसणारा घटक कोणता, तर तो पक्षी. चपळ, आकर्षक आणि छायाचित्रणाकरिता उत्तम लगबी असणार्या पक्ष्यांच्या छायाचित्रणापासून सुरुवात झाली. त्यासाठी कधी सडे पालथे घालणे, कधी किनार्यावरची वाळू तुटवणे, तर कधी देवरायांमधील अनवट रानवाटांवर सफर सुरू झाली. पक्षी कॅमेर्यात तर टिपू लागले. मात्र, टिपलेला पक्षी कोणता, याचा काही अंदाज येईना. मग रत्नागिरीतील वन्यजीवप्रेमींनी एकत्र येऊन ‘लेन्स आर्ट रत्नागिरी’ या नावाने छायाचित्रकारांचा गट तयार केला. या गटामार्फत रत्नागिरीच्या जैवविविधतेचे वैभव कॅमेर्यात कैद करण्याची सफर सुरू झाली. याची माहिती मिळाल्यावर 2017 साली अॅड. गोखलेदेखील या सफरीत सामील झाले. ‘लेन्स आर्ट रत्नागिरी’मध्ये सहभागी झाल्यावर खर्या अर्थाने गोखले यांना वन्यजीवांचे छायाचित्रण उमगले. गटासोबत वन्यजीव छायाचित्रणाचे दौरे सुरू झाले. या दौर्यांमध्येच पक्षी कसे ओळखावे, याची माहिती मिळाली. पक्ष्यांविषयीच्या पुस्तकांची माहिती मिळाली.
ती पुस्तक चाळून पक्ष्यांविषयी माहिती गोळा करण्यास सुरुवात झाली. अधिवासानुसार पक्ष्यांची विविधता कशी बदलते, कोणत्या अधिवासात कोणते पक्षी सापडतात, याची जाण झाली. मग अधिवासानुसार पक्षी छायाचित्रणाला सुरुवात झाली. किनार्यावर गेल्यावर स्थलांतरित पाणपक्षी, सड्यावर गेल्यावर शिकारी पक्षी, देवराईत गेल्यावर निशाचर पक्षी टिपण्याची मालिका सुरू झाली.
अॅड. गोखले यांनी घराशेजारी असणार्या चंपक मैदानात जाऊन नियमित पक्षीनिरीक्षणास सुरुवात केली. चंपक मैदान म्हणजे गवताने व्यापलेले मोकळे पठार. स्थानिक पक्ष्यांसह अनेक प्रवासी स्थलांतरित पक्ष्यांसाठी हा हक्काचा अधिवास. या अधिवासामध्ये ‘लेन्स आर्ट रत्नागिरी’च्या निमित्ताने गोखले यांनी छायाचित्रणास सुरुवात केली आणि याद्वारे महाराष्ट्रात व जिल्ह्यासाठी दुर्मीळ असणार्या पक्षी प्रजातींची नोंद केली. यामधीलच एक पक्षी म्हणजे ‘सोशेबल लॅपविंग.’ ‘सोशेबल लॅपविंग’ (ीेलळरलश्रश श्ररिुळपस) हा नष्टप्राय श्रेणीतील टिटवीच्या प्रजातीमधील एक पक्षी. हा स्थलांतरित पक्षी कझाकिस्तान, किर्गिझस्तान आणि ताजिकिस्तान या देशांमध्ये वास्तव्य करतो आणि हिवाळ्यात भारतातील गुजरात आणि राजस्थानमधील भागात स्थलांतर करतो. या पक्ष्याची महाराष्ट्रामधील नोंद अमरावती जिल्ह्यातून होती.
मात्र, गोखले यांनी हा पक्षी चंपक मैदानावर टिपल्याने या पक्ष्याची रत्नागिरी जिल्ह्यातील पहिलीच नोंद झाली. नुकतीच गोखले यांनी रत्नागिरीच्या सड्यावरून जगात केवळ 700च्या संख्येत राहिलेल्या तणमोर या नष्टप्राय श्रेणीतील पक्ष्याची नोंद केली. ‘क्रॅब प्लोवर’, ‘ग्रेट थीक-नी’, ‘चेसनट बेलिड सॅण्डग्रोव्ह’ या रत्नागिरीसाठी दुर्मीळ असणार्या पक्षी प्रजातींसह 250हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती त्यांनी आपल्या कॅमेर्यात टिपल्या आहेत. भविष्यात रत्नागिरीतील पक्ष्यांच्या अधिवास कायद्याची मदत घेऊन कशा पद्धतीने संवर्धित करू शकतो, यावर काम करण्याचा गोखले यांचा मानस आहे. त्यांच्या पुढील पक्षीमय वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!