मोठी बातमी! मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी अभिनेता दिनो मोरियाची चौकशी

    26-May-2025
Total Views |
 
Dino Morea
 
मुंबई : मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अभिनेता दिनो मोरियाची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात अटक केलेल्या एका आरोपीशी त्याचे संबंध असल्याचे तपासात पुढे आले असून आता याप्रकरणी त्याची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
 
मिठी नदी घोटाळ्यातील मुख्य आरोपी केतन कदम याच्यासोबत दिनो मोरियाचे अनेक फोन कॉल्सचे रेकॉर्ड आढळल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आता मिठी नदी घोटाळ्यात अभिनेता दिनो मोरियाचा काही हात आहे का? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.
 
हे वाचलंत का? -  मुंबई महापालिका क्षेत्रात सर्वाधिक पाऊस कुठे? जाणून घ्या आकडेवारी...
 
काय आहे मिठी नदी घोटाळा?
 
मुंबईतील मिठी नदीच्या स्वच्छतेचे महत्व लक्षात घेत नदीच्या एकूण १८.६४ किलोमीटर लांब पात्रातील गाळ उपसण्याचे काम मुंबई पालिका आणि एमएमआरडीएला विभागून देण्यात आले होते. परंतू, अजूनही हे काम पूर्ण झालेले नाही. याऊलट मिठी नदीतून गाळ काढण्याच्या कामात तब्बल १ हजार १०० कोटींचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे.
 
या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी एसआयटीदेखील स्थापन करण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) केलेल्या तपासात अनेक ठेकेदार, खासगी कंपन्या आणि मुंबई पालिकेतील अधिकाऱ्यांनी संगनमत करून ही रक्कम लाटल्याचे निष्पन्न झाले आहे. ‘एसआयटी’च्या अहवालानुसार, २०१३ ते २०२३ या १० वर्षांच्या कालावधीत मिठी नदीच्या साफसफाईच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर गाळ काढल्याचे दाखवून खोट्या नोंदी तयार करण्यात आल्या. या कामांसाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीचे भाडे अतिशय वाढवून दाखवण्यात आले. अनेक ठिकाणी गाळ नेण्याच्या जागांचे खोटे दस्तऐवज सादर करण्यात आले आणि त्यासाठी बनावट मालकांची नावे वापरण्यात आली. विशेष म्हणजे काही मालक मृत्यू पावले होते, तरी त्यांच्या नावाने करार दाखवण्यात आले.
 
आर्थिक गुन्हे शाखा आणि एसआयटीने आतापर्यंत सात ठिकाणी छापे टाकून १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यात तीन पालिका अधिकारी, पाच कंत्राटदार, तीन मध्यस्थ आणि दोन खासगी कंपनीच्या संचालकांचा समावेश आहे. दरम्यान, आता याप्रकरणी बॉलिवू़ड अभिनेता दिनो मोरियाचीसुद्धा चौकशी करण्यात येत आहे.