नवी दिल्ली : पाकिस्तानच्या कुरघोड्या, चीनची दहशतवादी देश असलेल्या पाकिस्तानला फूस, तुर्कीची पाकिस्तानशी वाढलेली जवळीक आणि भारताविरोधात या तिन्ही देशांची उघड झालेली आघाडी लक्षात घेतला केंद्र सरकारचे संरक्षण बजेट वाढविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर प्रामुख्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. संरक्षण क्षेत्रासाठीचा एकूण निधी ७ लाख कोटींच्या घरात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. २०२५-२६च्या अर्थसंकल्पात संरक्षण खात्यासाठी ६.८१ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. ही तरतूद मागील वर्षीच्या बजेटच्या तुलनेत ९.२ टक्क्यांनी जास्त आहे.
पुढील अर्थसंकल्प संसदेतील हिवाळी अधिवेशनात मांडला जाणार आहे. यात शस्त्रास्त्रे, क्षेपणास्त्रे, दारुगोळा खरेदी आणि संशोधनासाठी निधी वापरला जाणार आहे. २०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संरक्षण क्षेत्राला विशेष प्राधान्य दिले जात आहे. २०१४-१५ मध्ये संरक्षण मंत्रालयाला २.२९ लाख कोटींची तरतूद करण्यात आली होती. २०१४-१५पासून संरक्षण मंत्रालयाला दिलेला हा सर्वाधिक निधी आहे. एकूण अर्थसंकल्पापैकी १३ टक्के निधी हा संरक्षण क्षेत्राला वर्ग केला जाणार आहे.
सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचे वातावरण आहे. २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवले. यात पाक व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना संपवण्यात आले. ऑपरेशन सिंदूरमुळे भारतीय लष्कराची ताकद संपूर्ण जगासमोर आली. आधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. हे वाढलेले बजेट भारताच्या संरक्षण विभागाला आणखी बळकट करेल.
ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरलेली शस्त्रास्त्र
भारतीय लष्कर आता आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज होत आहे. कामिकाझे ड्रोन ही स्वयंचलित ड्रोन शस्त्रे आहेत, जी लक्ष दिसताच जाऊन संपवते. SCALP ही ५०० किमी पल्ल्याची क्रूझ मिसाईल आहे. राफेल विमानातून सोडली जाते व शत्रूच्या संरक्षित तळांवर अचूक हल्ला करते. आकाश हे स्वदेशी क्षेपणास्र आहे. साधारण ३० किमी अंतरावरील लक्ष्यांना अचूक नष्ट करू शकते.
L-70 ही अँटी-एअरक्राफ्ट तोफ कमी उंचीवरून येणाऱ्या हवाई हल्ल्यांना रोखण्यासाठी वापरली जाते. ZSU-23-4 शिल्का ही रशियन बनावटीची स्वयंचलित तोफ आहे. ती देखील कमी उंचीवरील हवाई लक्ष्यांवर अचूक हल्ला करू शकते. या सर्व शस्त्रास्त्रांमुळे भारतीय लष्कराची क्षमता वाढली असून, भारतीय सैन्य युद्धतंत्रासाठी सुसज्ज आहे.