‘ऑपरेशन सिंदूर’मुळे भारत ही आशियातील सर्वश्रेष्ठ लष्करी ताकद आहे, यावर शिक्कामोर्तब झाले. भारताने आपल्या जबरदस्त लष्करी सामर्थ्याने पाकिस्तानची लंका करून टाकली. त्यामुळे मोदींच्या पोलादी नेतृत्वाचा डंका जगभर वाजत आहे. भारतासारख्या एका अण्वस्त्रसज्ज देशाने पाकिस्तानसारख्या दुसर्या अण्वस्त्रसज्ज देशावर हल्ला करून केवळ तीन दिवसांत त्याची हवाई ताकद नष्ट करण्याची अभूतपूर्व कामगिरी केली. याद्वारे पाकिस्तान आपल्या अण्वस्त्रांचे भांडवल करून करीत असलेले ‘ब्लॅकमेलिंग’ भारताने पद्धतशीरपणे संपुष्टात आणले आहे.
पहलगाममधील हत्याकांडाचा बदला घेणार्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात भारतावर झालेल्या हल्ल्याबद्दलचा संताप, शत्रूराष्ट्राला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार आणि भविष्यातील चेतावणी यांचा संगम झालेला पाहायला मिळाला. सोमवारी टीव्हीवरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणात मोदी यांची देहबोली आणि आवाजातील जरबच यासंदर्भात भारताचा आक्रोश आणि संताप किती तीव्र आहे, ते स्पष्ट करणारी होती. मोदींनी या भाषणातून केवळ देशालाच संदेश दिला असे नव्हे, तर त्यांनी पाकिस्तानसह सर्वच जगाला भारताच्या दहशतवादाविरोधी लढ्याचे धोरण काय असेल, त्याची स्पष्ट कल्पना दिली. यापुढील काळात ‘ऑपरेशन सिंदूर’च्या धोरणानुसार भारतावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जाईल, हे मोदी यांनी नि:संदिग्धपणे स्पष्ट केले. सध्या हे ‘ऑपरेशन’ भारताने केवळ स्थगित केल्याचेही त्यांनी सांगितले आणि पाकिस्तानला आपले अस्तित्व टिकवायचे असेल, तर दहशतवाद्यांचा संहार करावाच लागेल, असाही इशारा दिला.
मोदींच्या भाषणाने जागतिक दहशतवादविरोधी लढ्याचे नवे नियम अस्तित्वात आले असून, त्याच्या केंद्रस्थानी भारताची भूमिका असेल. आजवर अमेरिका असो की पाश्चिमात्य राष्ट्रे, त्यांनी दहशतवादाविरोधात केवळ तोंडदेखली भूमिका घेतली होती. सरकारपुरस्कृत दहशतवादाची झळ लागलेला भारत हा एकमेव देश असला, तरी भारताला जागतिक समुदायाकडून आजवर कोणत्याही प्रकारे मदत मिळालेली नाही. त्यामुळे यापुढे भारत आपल्याविरोधात झालेल्या दहशतवादी कृत्यांना आपल्या पद्धतीने उत्तर देईल आणि ते उत्तर कसे असेल, ते ‘ऑपरेशन सिंदूर’ने स्पष्ट केल्याचेही मोदींनी स्पष्ट केले. पाकिस्तानने आपल्याकडील अण्वस्त्रांचे भांडवल करीत त्याच्या देशातील दहशतवादी अड्डयांना संरक्षण दिले होते. पण, या कारवाईने पाकिस्तान अण्वस्त्रांच्या जोरावर करीत असलेले ‘ब्लॅकमेलिंग’ भारताने संपुष्टात आणले, हीसुद्धा फार मोठी कामगिरी म्हणावी लागेल.
भारताने तीन दशकांहून अधिक काळ पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाची झळ सोसली असून, पहलगाममधील पर्यटकांचे हत्याकांड हा त्याच्या संयमाचा बांध तोडणारा शेवटचा हल्ला ठरला. त्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर जे जबरदस्त लष्करी हल्ले चढविले, त्यामुळे पाकिस्तानचे मुलकी आणि लष्करी सत्ताकेंद्र हादरले. मात्र, त्यातून योग्य तो बोध घेण्याऐवजी पाकिस्तानने भारतावरच पलटवार केल्यावर भारताने आपली खरी लष्करी ताकद काय आहे, त्याचा ट्रेलर पाकिस्तान आणि जगापुढे सादर केला. या ट्रेलरचीच झळ इतकी लागली आहे की, अवघ्या चार दिवसांतच पाकिस्तान ‘त्राही माम्’ करीत भारताला शरण आला. भारताने आपले ध्येय अपेक्षेपेक्षा अधिकच यशस्वीरित्या साध्य झाल्याचे पाहून ‘ऑपरेशन सिंदूर’ला स्थगिती दिली. पण, पाकिस्तानवर लादलेले अन्य निर्बंध कायम ठेवले. त्यात सिंधू जलवाटप कराराचे निलंबन कायम राहणार असून, सर्व प्रकारचा व्यापार आणि माणसांची आदानप्रदान बंदच ठेवण्यात येणार आहे. भारताने आपली लष्करी ताकद सिद्ध करून सध्या पाकिस्तानला तात्पुरते जीवदान दिले. पण, त्याच्या कृतीवर यापुढे अधिक बारकाईने नजर ठेवली जाईल आणि कोणतीही कुरापत काढल्यास त्याला पुन्हा एकदा ‘ऑपरेशन सिंदूर’ला सामोरे जावे लागेल.
आपल्या भाषणात मोदींनी अमेरिका किंवा ट्रम्प यांचा साधा उल्लेखही केला नाही. भारताने शस्त्रबंदीची अधिकृत घोषणा करण्यापूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची घोषणा समाजमाध्यमांवरून केली. त्यात त्यांनी या शस्त्रसंधीचे श्रेय स्वत:कडे घेतले. तसेच, सोमवारच्या मोदी यांच्या राष्ट्रसंबोधनाच्या काही तास आधी पुन्हा एकदा दोन्ही देशांचे आभार मानीत पाकिस्तानशी पुन्हा व्यापार करण्याचे सूतोवाचही ट्रम्प यांनी केले. यापैकी कशाचाही उल्लेख मोदींनी केला नाही. ट्रम्प यांनी पाकिस्तान आणि भारत यांना एकाच पातळीवर आणण्याचा केलेला प्रयत्न हास्यास्पदच नव्हे, तर त्यांची भारत-पाक संघर्षविषयक राजकीय समज किती अपरिपक्व आणि उथळ आहे, ते दाखवून देतो. ज्या पाकिस्तानला आपल्यावर होत असलेला हवाई हल्ला थोपविताही आला नाही, त्याची तुलना भारतासारख्या व्यावसायिक आणि बलवान लष्करी ताकदीशी करणे मूर्खपणाचेच. मात्र, चीनच्या आहारी गेलेल्या पाकिस्तानला काही प्रमाणात आपल्याकडे वळवून घेण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून ट्रम्प यांनी पाकिस्तानचेही कौतुक केले. भारतावर कायमस्वरूपी अंकुश ठेवण्यासाठी पाकिस्तानचा वापर करण्याची अमेरिकेची ही खेळी भारत चांगलाच ओळखून आहे. पण, यापुढे भारताच्या दृष्टीने पाकिस्तान हे किरकोळ राष्ट्र राहील, हे नक्की!
अमेरिकेवर दि. 11 सप्टेंबर 2001 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने जागतिक स्तरावर दहशतवादविरोधी लढ्याची घोषणा केली होती. मात्र, तो लढा केवळ अमेरिकी हल्ल्याचा बदला घेण्यापुरता होता. कारण, दहशतवादाचे केंद्रस्थान असलेल्या पाकिस्तानवर अमेरिकेने काहीच कारवाई केली नाही. उलट त्याला त्यामुळे संजीवनीच मिळाली. अफगाणिस्तानातील तालिबानी दहशतवाद्यांशी लढण्याच्या निमित्ताने अमेरिका पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्सचे लष्करी साहित्य आणि आर्थिक मदत करीत होती. या मदतीचा विनियोग मात्र पाकिस्तानचे लष्करशहा जनरल परवेज मुशर्रफ यांनी भारतात दहशतवादी हल्ले करण्यासाठी केला. पाकिस्तानात आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी संघटनांचे अड्डे आणि प्रशिक्षण केंद्रे उघडपणे कार्यरत होती. ही गोष्ट अमेरिकेला समजत नव्हती का? तसेच, तालिबान्यांविरोधात लढण्यासाठी दिलेल्या मदतीचा वापर पाकिस्तानकडून त्या देशात होत आहे का, हेही अमेरिकेने तपासले नाही किंवा त्याकडे हेतूत: दुर्लक्ष केले. याचा एकच परिणाम झाला आणि तो म्हणजे भारतात वाढलेले दहशतवादी हल्ले. पूर्वीच्या काँग्रेस सरकारने या हल्ल्यांबद्दल पाकिस्तानवर कसलीही कठोर कारवाई केली नाही. पण, मोदी यांनी सत्तेवर येताच पाकिस्तानला जोरदार तडाखे दिले. आता ‘ऑपरेशन सिंदूर’ हा मर्मभेदी हल्ला करून पाकिस्तानच्या कथित अण्वस्त्रांचे बिंगही फोडले आहे. पाकिस्तानच नव्हे, तर अन्य शेजारी देशांनाही भारताच्या या सामर्थ्याने योग्य तो संदेश मिळाला आहे. अमेरिकेला तो समजला आहे की नाही, तेही लवकरच कळेल. मोदी यांच्या भाषणाने जागतिक दहशतवादविरोधी लढ्याचे नियमच बदलले आहेत, एवढे मात्र खरे.