तेरड्याचा रंग तीन दिवस

    08-Feb-2025
Total Views |
 
Indi Aghadi
 
काँग्रेसी युवराज राहुल गांधी, ठाकरे आणि पवार कंपनीने एकत्र येत, पुन्हा एकदा ‘ईव्हीएम’ तसेच महाराष्ट्रातील विधानसभा निकालावर शंका उपस्थित केली. यापूर्वी या तिघांनी वैयक्तिकपणे हेच आरोप वारंवार केले होते आणि कोणीही दखल न घेतल्याने, एकत्र येत त्यांनी ते पुन्हा एकदा त्याच आरोपांचा पाढा वाचला. पण, म्हणतात ना तेरड्याचा रंग तीन दिवस, त्याप्रमाणे मविआच्या असल्या उथळ आरोपांनाही आता जनता गांभीर्याने घेणे नाहीच!
 
दिल्ली विधानसभेचे निकाल आज जाहीर होणार असताना, शुक्रवारी काँग्रेसी नेते राहुल गांधी, ठाकरे कंपनीचे प्रवक्ते संजय राऊत आणि शरद पवारांची सुकन्या संसदरत्न सुप्रिया सुळे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत, पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला जो ऐतिहासिक असा जनादेश मिळाला, तो ठाकरे आणि पवार कंपनीसह अद्यापही काँग्रेसच्या पचनी पडलेला नाही. काँग्रेसमध्ये विजय मिळाला, तर तो केवळ गांधींमुळे आणि पराभव झाला तर तो इतरांमुळे अशी एक प्रथा रूढ असल्यामुळे, नाना पटोले यांच्यावर या पराभवाचे खापर फोडण्याचे काम रितसर पद्धतीने होत आहे. तो वेगळाच विषय. मात्र, ठाकरे आणि पवार कंपनीचे तसे नाही. या दोघांचेही दुःख एकच. दोघांच्याही हातातून त्यांच्या बापजाद्यांनी स्थापन केलेला पक्ष गेलेला आहे. तसेच राज्यातील सुज्ञ जनतेने या दोघांनाही एकत्रितपणे नाकारले आहे. मात्र, ठाकरे आणि पवार कंपनीला, आजही ते पचनी पडलेले नाही. काँग्रेसी युवराजांनी, महाराष्ट्रातील वाढलेल्या मतदारांच्या संख्येवरून निवडणूक आयोगाला लक्ष्य केले आहे. निवडणूक आयोगाने त्याची गंभीरपणे दखल घेतली असून, आयोग त्याची लेखी उत्तरे देईल असे म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची संभावना विनोदी अशीच केली असून, एकाच विनोदावर किती वेळा हसायचे, असा उपरोधिक टोलाही राहुल यांच्यासह ठाकरे आणि पवार कंपनीला लगावला आहे.
 
निवडणूक आयोगाने राज्यातील मतदारांची आकडेवारी दिलेली नाही, हा या तिघांचा आक्षेप. संपूर्ण राज्याची मतदार यादी राहुल यांच्यासह ठाकरे आणि पवार कंपनीला का हवी? हाही प्रश्न. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत राज्यात जी मतदारांची संख्या वाढली, हा त्यांचा प्रमुख आक्षेप. तथापि, निवडणूक आयोगाने त्यासाठी विशेष मोहीम राबवली होती. त्याचे यांना विस्मरण झाले आहे, असेच म्हणता येते. मुळातच, या तिघांनी पत्रकार परिषदेमध्ये जे दावे आणि आरोप केले आहेत, ते हास्यास्पद असेच असून, अतिरंजितही आहेत. या तिघांना एकत्रितपणे पत्रकार परिषद घ्यावी लागली, यातच सारे काही आले. यातील प्रत्येकाने वेगवेगळ्या ठिकाणी वैयक्तितपणे हेच आरोप, यापूर्वी विधानसभेचे निकाल जाहीर झाल्यापासून आजपर्यंत केलेले आहेत. शरद पवारांचे नातू रोहित पवार हे याच निवडणुकीत विजयी झाले आहेत, याचा त्यांना सोयीस्करपणे विसर पडलेला असू शकतो. ठाकरे आणि पवार कंपनीचे आरोप फारशा गांभीर्याने कोणीही घेतलेले नाहीत, म्हणूनच त्यांनी आज एकत्रित येत तेच आरोप पुन्हा केले आहेत. दिल्लीत केजरीवाल यांचा पराभव होण्याची शक्यता असल्याने, उद्या अराजकतावादी केजरीवालांच्या विरोधात दिल्ली विधानसभेचा निकाल गेलाच, तर ते या तिघांच्या बरोबरीने नव्याने आरोप करण्याचीच शक्यता जास्त. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेले सडेतोड प्रत्युत्तर पुरेसे बोलके असले, तरी निवडणूक आयोगाने पारदर्शकता जपण्यासाठी त्यांना लेखी आणि मुद्देसूद उत्तर देण्यात येईल, असेही सांगितले आहे.
 
निवडणूक आयोगाने यापूर्वी वारंवार याबाबत स्पष्टीकरण दिले आहेच. ‘व्हीव्हीपॅट’ची आकडेवारी जाहीर करत, महाराष्ट्रातील एकाही विधानसभा मतदारसंघात कोणताही गैरव्यवहार झालेला नाही, असे ठणकावून सांगितले आहे. मात्र, हे तिन्ही पक्ष पराभवाच्या धक्क्यातून अद्यापही सावरलेले नाहीत, हेच वास्तव. त्यामुळेच, ते वारंवार साप म्हणून भुई धोपटताना दिसून येत आहेत. मात्र, आयोगावर आरोप करत ते महाराष्ट्राने महायुतीला जो स्पष्ट जनादेश दिला, त्याचाच अनादर ते करत आहेत. प्रत्येक गोष्टीचे राजकारण करण्याची अनिष्ट प्रथा, याच तिघांनी महाराष्ट्रात रूढ केली आहे, दुर्दैवाने त्याच प्रथेला ते पुढे नेत आहेत. ठाकरे आणि पवार कंपनी ही महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे. त्यांचे संसदेतील लोकप्रतिनिधी हाताच्या बोटावर मोजता येतील, इतकेच. त्यामानाने, राहुल गांधी यांची काँग्रेस, किमान देशभरात जनादेश मिळवून आहे. असे असतानाही, राहुल यांना संजय राऊत आणि सुप्रिया सुळे या दोघांच्या बरोबरीने पत्रकार परिषद घ्यावी लागली, यातून त्यांची घसरलेली पत दिसून येते. या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे का उपस्थित नव्हते? लोकसभा निवडणुकीत मविआला, तसेच ‘इंडी’ आघाडीला जे अनपेक्षित यश मिळाले, ते ‘व्होट जिहाद’मुळेच. ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक हैं तो सेफ हैं’, हा संदेश भाजपने योग्य पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचवत विधानसभेत मतांचे विभाजन होऊ दिले नाही, हेच महायुतीच्या विजयाचे रहस्य. मात्र, लोकसभेतील विजय हे आपलेच कर्तृत्व आहे, या भ्रमात ठाकरे आणि कंपनी राहिली. म्हणूनच, लोकसभेत घवघवीत यश मिळालेले असतानाही, विधानसभेत मतदारांनी आम्हांला का नाकारले? असा प्रश्न त्यांना पडला.
 
दिल्ली विधानसभेतही फारसे काही वेगळे घडणार नाही. तेथेही राहुल यांची काँग्रेस सपाटून मार खाणार आहे. तेव्हाही ‘ईव्हीएम’वर खापर फोडायचा मार्ग त्यांनी, आजच आखून ठेवला आहे. उद्धव ठाकरे यांचे आमदार, खासदार फुटणार अशा चर्चा दिवसभर सर्वच माध्यमांवर रंगलेल्या असताना, ही पत्रकार परिषद घेऊन विषयप्रवाह बदलण्याचा अपयशी प्रयत्नच ठाकरे आणि पवार कंपनीने केला, असे मात्र म्हणावे लागेल. तसेच पुन्हा एकदा निवडणूक आयोगाबद्दल ‘फेक नॅरेटिव्ह’ सेट करण्याचे पाप त्यांनी केले आहे. निवडणुकीत विजय मिळाला की, भाजपला जनतेने नाकारले आणि भाजप विजयी झाली की, ‘ईव्हीएम’च्या मदतीने निवडणुका जिंकल्या, असाच अपप्रचार गेली दहा वर्षे चालला आहे. ‘ईव्हीएम’वर दोषारोपण करताना, असे करून मतदारांचा अवमान आपण करतो आहोत याचेही भान त्यांना नाही. असेही काँग्रेसला जनतेच्या सुखदुःखाविषयी काहीही भावना नाहीतच. मात्र, जनतेने मविआला झिडकारले आहे, नाकारले आहे, त्यांच्या अकार्यक्षमतेचा अव्हेर केला आहे. हेच खरे असून, ते कदापीही बदलणार नाही, हेच अंतिम सत्य.