राज्यात पुन्हा भूकंप? उबाठा आणि मविआचे १० ते १२ आमदार टप्प्याटप्प्याने शिंदेंचे नेतृत्व स्विकारणार!
मंत्री उदय सामंत यांचा दावा
07-Feb-2025
Total Views |
मुंबई : उबाठा गटाचे आणि मविआचे १० ते १२ आमदार टप्प्याटप्प्याने शिंदेंचे नेतृत्व स्विकारणार, असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. शुक्रवार, ७ फेब्रुवारी रोजी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.
ऑपरेशन टायगरबद्दल बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, "एखादे मिशन राबवायचे असल्यास ते सांगून राबवले जात नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केले त्यासाठी मिशन राबवण्याची आवश्यकता नाही. बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे नेणारी शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली चालते, हे काही लोकांना कळून चुकले आहे. त्यामुळे अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत. येत्या ९० दिवसांत उबाठा गटाचे आणि महाविकास आघाडीचे १० ते १२ आमदार टप्प्याटप्प्याने एकनाथ शिंदेंचे नेतृत्व स्विकारणार आहेत. एकनाथ शिंदेंचे नेतृत्व हे उबाठापेक्षा चांगले, संवेदनशील आणि भावनाप्रधान आहे, हे लोकप्रतिनिधींना पटले आहे. त्यामुळे अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत," असे ते म्हणाले.
दरम्यान, उबाठा गटाच्या खासदारांनी पत्रकार परिषद घेत आम्ही उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच आमच्याबद्दल विनाकारण अपवा पसरवण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.