नागपूर जिल्हा परिषदेसाठी १४२ कोटींचा निधी मंजूर! पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या प्रयत्नांना यश
07-Feb-2025
Total Views |
नागपूर : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नांमुळे नागपूर जिल्हा परिषदेला १४२ कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमुळे जिल्ह्यातील विकास कामातील अडसर दूर झाला असल्याचे बावनकुळे म्हणाले.
अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार आणि नागपूर जिल्हा परिषदमध्ये काँग्रेसची सत्ता असताना ग्रामीण विकासासाठी आलेला ४२ कोटींचा निधी खर्च केला नाही. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर नागपूर जिल्हा परिषदेला १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. परंतू, महाविकास आघाडी सरकारच्या काळातील ४२ कोटी रुपयांचा निधी अखर्चित असल्यामुळे हा १०० कोटी रुपयांचा निधी मिळण्याबाबत तांत्रिक अडचण येत होती.
दरम्यान, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून हा अखर्चित निधी मंजूर करुन घेतला आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेला एकूण १४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जिल्हा परिषदेला मिळालेला १४२ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याच्या विकास कामासाठी खर्च करता येणार आहे. तसे या माध्यमातून नागपूर जिल्ह्यातील अनेक विकास कामे मार्गी लागणार आहेत.