मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Stone Pelting in Jharkhand) देशभरात एकीकडे महाशिवरात्रीनिमित्त उत्साहाचे वातावरण असताना दुसरीकडे दोन गटांत हिंसक हाणामारी झाल्याचे निदर्शनास आले आहे. सदर प्रकरण झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यातील इचक परिसरात घडल्याची माहिती आहे. पताका आणि लाऊडस्पीकर लावण्यासाठी गेलेल्या हिंदूंवर काही धर्मांधांनी दगडफेक केल्याचे सांगण्यात येत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण परिसरात सुरक्षा दल तैनात केले असून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, बुधवारी सकाळी पताका आणि लाऊडस्पीकर लावण्यावरून दोन गटांत आधी वाद झाला. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचून वाद मिटवण्याचा प्रयत्नही केला. मात्र काही धर्मांधांनी एका शाळेआडून दगडफेक करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर त्यांनी एक चारचाकी आणि दोन दुचाकीही पेटवून दिल्याचे समोर येतंय. हा सूनियोजित कट असल्याचा आरोप सध्या होतो आहे. सध्या पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी हजर आहेत.