डॅा.बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांचे फोटो हटवल्याच्या आपच्या आरोपांचे भाजपकडून खंडन!

    25-Feb-2025
Total Views |

bjp
 
नवी दिल्ली : ( Delhi )राजधानी दिल्लीमध्ये आठव्या विधानसभेच्या अधिवेशनाला सोमवार दि. २४ फेब्रवारी रोजी सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. या गोंधळानंतर विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांनी विरोधी पक्षनेत्या आतिशी यांच्यासह आम आदमी पक्षाच्या आमदारांना संपूर्ण दिवसासाठी निलंबित केले आहे. या आमदारांना बाहेर काढण्यासाठी विधानसभा अध्यक्ष गुप्ता यांनी मार्शला बोलावून बाहेर काढायला लावले. यानंतर आता सोशल मीडियावर "AAP MLAS" ट्रेंड होत आहे.
 
विरोधी पक्षनेत्या आतिशी आणि आम आदमी पक्षाच्या आमदारांनी भाजपच्या सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत आरोप केला की, दिल्लीत भाजप सत्तेत येताच मुख्यमंत्री कार्यालयातून डॅा. बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांचे फोटो काढून टाकण्यात आले. भाजपची मानसिकता शीख आणि दलितविरोधी असल्याचा आरोप आतिशी यांनी केला. त्यानंतर ताबडतोब भाजपनेही या आरोपाचे खंडन करत स्पष्टीकरण दिले आहे.
 
भाजपकडून प्रत्युत्तर
 
आतिशीच्या आरोपांनंतर सुमारे २ तासांनी दिल्ली भाजपने मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या कार्यालयाचा एक नवीन फोटो समाजमाध्यमांवर पोस्ट केला. ज्यामध्ये रेखा गुप्ता यांच्या आसनामागील भिंतीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महात्मा गांधी यांचे फोटो दिसत आहेत. त्याचबरोबर जवळच्या भिंतीवर डॅा. बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांचे फोटो लावल्याचे दिसत आहेत. फोटो काढले नसून फक्त फोटोंची जागा बदलण्यात आली आहे, असे भाजपकडून स्पष्टीकरण देण्यात आले.