९ वाजताच्या भोंग्याला सुसंवाद शिकवायला हवा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
24-Feb-2025
Total Views |
नागपूर : सर्वांनी मिळून नऊ वाजताच्या भोंग्याला सुसंवाद शिकवायला हवा, असा खोचक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांचे नाव न घेता लगावला. सोमवार, २४ फेब्रुवारी रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "राज्यात कोणीही कोणाशी सुसंवाद करत असेल तर मी त्याचे स्वागत करेन. राज्यात कोणातही विसंवाद असू नये. सुसंवाद असला पाहिजे यात कोणाचेही दुमत असू शकत नाही. त्यामुळे सर्वांनी सुसंवाद करावा. त्याचप्रमाणे आपण सर्वांनी मिळून नऊ वाजताच्या भोंग्याला सुसंवाद कसा असावा, हे शिकवल्यास राज्यातील संवादाची परिस्थिती सुधारेल," असा टोला त्यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले की, "प्रत्येकाने साहित्य संमेलनात बोलताना काही मर्यादा ठेवल्या पाहिजे. विशेषत: साहित्यिकांना वारंवार वाटतं की, राजकारणी आमच्या स्टेजवर येऊ नयेत, किंवा तशाप्रकारचे त्यांचे वक्तव्य असतात. त्यामुळे त्यांनीदेखील पार्टी लाईनवरच्या कमेंट करणे योग्य नाही. त्यांनीदेखील मर्यादा पाळायला हवी," असेही ते म्हणाले.
पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचाच
"माणिकराव कोकाटे यांना कदाचित हे माहिती नसेल की, पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांनाच आहे. मंत्री त्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवतात आणि मुख्यमंत्री त्यावर अंतिम निर्णय घेतात. मी कॅबिनेटमध्येच स्पष्टपणे सांगितले होते की, तुम्हाला पाहिजे ती नावे पाठवा. पण त्या नावांमध्ये ज्यांची नावे चुकीच्या कामांमध्ये समाविष्ट आहेत, त्यांना मी मान्यता देणार नाही. आतापर्यंत माझ्याकडे १२५ च्या जवळपास नावे आली असून त्यातील १०९ नावांना मी मान्यता दिली. उर्वरीत नावांना मी परवानगी दिली नाही. कारण त्यांच्यावर कुठलातरी आरोप आहे किंवा त्यांची चौकशी सुरु आहे. त्यामुळे कुणीही नाराज झाले तरी अशा नावांना मी मान्यता देणार नाही," असे मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले.
९० लाख शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी वाटप
"महाराष्ट्रातील ९० लाख शेतकऱ्यांना आज किसान सन्मान निधीचा हप्ता मिळाला आहे. आज तीन लाख कोटींपेक्षाही जास्त निधी शेतकऱ्यांच्या खात्यात असून हा एक जगातील डीबीटीचा रेकॉर्ड आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले.