नरेंद्राचार्य महाराजांबद्दलचं वक्तव्य वडेट्टीवारांना भोवलं! मंत्री मंगल प्रभात लोढांच्या उपस्थितीत तक्रार दाखल
24-Feb-2025
Total Views |
मुंबई : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्याविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याच्या विरोधात राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ नरेंद्राचार्य महाराजांचे अनुयायी रस्त्यावर उतरले आहेत.
दरम्यान, सोमवार, २४ फेब्रुवारी रोजी मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत अनुयायांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून तक्रार दिली. तसेच वडेट्टीवारांनी जाहीर माफी मागण्याची मागणीही अनुयायांकडून करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, "आमच्या सर्वांचे आराध्य जगद्गुरू नरेंद्राचार्य महारांज यांच्याबद्दल विजय वडेट्टीवार यांनी केलेले विधान अयोग्य आणि निंदनीय आहे. परंतू, ही काही नवीन गोष्ट नाही. विजय वडेट्टीवार आणि त्यांचे सहकारी गरज पडेल तेव्हा मुस्लीम तुष्टीकरणासाठी हिंदू धर्म, हिंदू देवता आणि गुरुंना टार्गेट करतात. यावेळीसुद्धा त्यांनी नरेंद्राचार्य महाराजांसारख्या मोठ्या व्यक्तीबद्दल अपशब्द काढले असून ते कुणीही सहन करणार नाही. विजय वडेट्टीवार यांनी याबाबत माफी मागावी. नरेंद्राचार्य महाराजांनी हिंदू धर्मासाठी आणि समाजासाठी मोठे कार्य केले असून कदाचित विजय वडेट्टीवार यांना याबाबत माहिती नसेल," असे ते म्हणाले.