'अभिव्यक्ती'च्या नावाखाली गरळ ओकायचे धंदे!

कीर्तनकारांना बाजारू म्हणणाऱ्या रवींद्र पोखरकरांविरोधात गुन्हा दाखल

    15-Feb-2025
Total Views |

Ravindra Pokharkar

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Ravindra Pokharkar on Kirtankar)
'अभिव्यक्ती'च्या नावाखाली गरळ ओकायचा प्रकार रवींद्र पोखरकर यांनी आपल्या एका व्हिडिओतून केला आहे. 'अभिव्यक्ती' या युट्यूब चॅनलवर त्यांनी दि. १० फेब्रुवारी रोजी 'सुपारीबाज, पाखंडी कीर्तनकार महाराज...' या शीर्षकाखाली एक व्हिडिओ केला, ज्यामध्ये त्यांनी अध्यात्माची आणि धर्माची आजीवन सेवा करणाऱ्या कीर्तनकारांचा अश्लाघ्य भाषेत अपमान केल्याचं दिसतंय. इतकेच नाही तर त्यांनी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष महंत गोविंद देवगिरी महाराजांचा सुद्धा 'विषारी धर्मांध विचारसरणी असलेले...' म्हणत त्यांचा अपमान केला आहे. या प्रकरणी रवींद्र पोखरकरांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २९९ अंतर्गत शिळ डायघर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचलंत का? : दिल्ली मेट्रो स्थानकात 'खारघर'सदृश परिस्थिती!

रवींद्र पोखरकर यांनी आपल्या व्हिडिओमध्ये भाजपचा उल्लेख केला आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी अशा कीर्तनकारांचा प्रचारासाठी कसा वापर केला, यावर भाष्य केलंय. हे कीर्तनकार संतांच्या विचारांना तिलांजली देणारे होते. स्वतःला विकण्यासाठी ते बाजारात बसलेच होते. त्यांनी विधानसभा निवडणुकीला धार्मिक संघटनेच्या निवडणुकीचे स्वरूप दिले. 'धर्म वाचवायचा असेल तर भाजपाशिवाय पर्याय नाही', असे आवाहन कीर्तनकारांनी केले, असे पोखरकरांचे म्हणणे आहे.

वास्तविक संतांचे मुकुटमणी असणारे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की, कीर्तनकारांनी फक्त हरिनामाचा महिमा वाढवण्याचे कार्य करून भागणार नाही तर हरिनामाचा प्रसार आणि प्रचार करताना पाखंड खंडण करणे ही महत्त्वाचे आहे. भगवंताच्या श्रद्धेविषयी अनास्था बाळगणारी मंडळी जेव्हा सश्रद्धांच्या भावनांशी खेळतात तेव्हा त्यांच्या पाखंडाचे खंडन करणे हेच भगवंताचे कार्य आहे. कीर्तनकारांनी संतांनी समाजाला जागृती आणण्यासाठी हरिनामाच्या माध्यमातून स्वदेश, स्वधर्म आणि स्वराज या विचारांचा कायम प्रसार केला. तिच परंपरा आजच्या काळातही संतांनी जपली आहे. त्यामुळे रवींद्र पोखरकरांचे विधान हे कीर्तनकारांचा अवमान करणारेच होते, अशा प्रतिक्रिया सध्या उमटत आहेत. 

 
'त्या' कीर्तनकारांवर तुकोबांच्याच भाषेत टीका...
दै. मुंबई तरुण भारतचे रवींद्र पोखरकर यांच्या संपर्क साधला असता ते म्हणाले की, तो व्हिडिओ सर्व कीर्तनकार किंवा ह.भ.प महाराजांना उद्देशून नाही. राज्यात अजूनही चांगले मार्गदर्शक कीर्तनकार आहेत. वारकरी संप्रदाय हे अध्यात्माचे क्षेत्र आहे. त्याला राजकारणाची सांगड घालण्याचा प्रयत्न काही कीर्गनकारांकडून करण्यात आला. त्या कीर्तनकारांवर तुकोबांच्याच भाषेत टीका केली आहे. अध्यात्म क्षेत्राचा बाजर मांडणाऱ्यांविरोधात ती टीका आहे.
 
‘धर्मरक्षण’ हेच कीर्तनकारांचे आद्य कर्तव्य
पूज्य संत-महंत , कीर्तनकार यांचे आद्य कर्तव्य हे ‘धर्मरक्षण’ हेच आहे. त्यासाठीच त्यांनी समाजप्रबोधन करायचे असते. महाराष्ट्रातील धर्माचार्य , कीर्तनकार यांनी ही परंपरा जोपासत समाजात जागृती निर्माण केली. त्यांनी कोणत्याही ठराविक पक्षाला मतदान करा असे आवाहन केले नाही. फक्त धर्मजागरण केले. धर्माचार्य , कीर्तनकार यांनी धर्मजागरण सोडून काय करावे याचा उपदेश हा महाभाग त्याच्या व्हिडीओतून देत सुटला होता. आज त्याच्यावर गुन्हा दाखल करुन हिंदुत्ववादी सरकार मध्ये साधु-संतांचा अपमान करणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही ; हा स्पष्ट संदेश मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी दिला आहे. यापुढे असे कृत्य करणाऱ्यांना अद्दल घडवलीच जाईल.
- आचार्य तुषार भोसले, प्रदेशाध्यक्ष, भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी
 
अशा विकृतींना अद्दल घडवणे गरजेचेच
वारकरी संप्रदाय समाजाला दिशा देण्याचं काम करत, शेकडो वर्षाची परंपरा लाभलेला संप्रदाय आहे. तो प्रत्येकासाठी वंदनीय आहे. ते आपल्या श्रद्धेचं स्थान आहे. जर त्यांचा कोणी शिवीगाळ करत अपमान करत असेल, तर अशा विकृतींना अद्दल घडवणे गरजेचे आहे. त्यामुळे कायद्याचा मार्गानेच त्यांना आज अद्दल घडवली आहे. उद्या त्यांनी पुन्हा असे व्हिडिओ केले तर पुन्हा गुन्हा दाखल होईल.
- प्रकाश गाडे, सोशल मीडिया संयोजक, भाजपा महाराष्ट्र