दुसरा केजरीवाल नको!

    13-Feb-2025   
Total Views |

AAP
 
शेवटी पापाचा घडा भरला. काही लोकांना काही काळ तुम्ही फसवू शकता, परंतु सर्व लोकांना सर्व काळ फसविता येत नाही. अब्राहम लिंकन यांचे हे वाक्य कुर्‍हाडीचे पाते बनून केजरीवाल यांच्या मानेवर पडले आहे. केजरीवाल प्रवृत्ती सांगते की, मतदारराजा तू सदैव जागा राहा. भूलथापांना फसू नकोस आणि स्वतःचा नाश करून घेऊ नकोस! म्हणून आपण विचार केला पाहिजे की, एक केजरीवाल पुरे झाले, आता दुसरा केजरीवाल निर्माण होऊ द्यायचा नाही.
 
सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने १९७३ साली ‘केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य’ या खटल्याचा निकाल दिला. सर्व घटनातज्ज्ञ या निकालाचे वर्णन ‘भारतीय लोकशाही वाचविणारा निर्णय’ या शब्दांत करतात. सर्वोच्च न्यायालयाने दोन गोष्टींचे निर्णय दिले. पहिला निर्णय संसदेला मूलभूत अधिकारात आणि राज्यघटनेत सुधारणा करण्याचा अधिकार आहे, परंतु केलेली सुधारणा राज्यघटनेला धरून आहे की नाही, याची समीक्षा करण्याचा अधिकार न्यायालयाकडे असेल आणि दुसरा निर्णय दिला की, राज्यघटनेत सुधारणा करताना घटनेच्या मूलभूत चौकटीला धक्का लावता येणार नाही. ही मूलभूत चौकट कोणती, हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले नाही. भविष्यात जेव्हा घटनात्मक दावे सर्वोच्च न्यायालयाकडे येतील, तेव्हा घटनात्मक चौकटीचा निर्णय त्यांनी करावा, असा याचा अर्थ होतो.
 
सर्वोच्च न्यायालयाने ज्याप्रमाणे १९७३ साली ऐतिहासिक निर्णय दिला, तसा निर्णय दि. ८ फेब्रुवारीला दिल्लीच्या मतदारांनी दिलेला आहे. या निर्णयाचे वर्णनदेखील ‘भारतीय लोकशाहीतील घाण दूर करणारा निर्णय’ या शब्दांत करावा लागेल. निवडणुकीत एखाद्या राजकीय पक्षाचा जय किंवा पराजय होतो आणि त्याचे विश्लेषणही नंतर केले जाते. परंतु, दिल्लीतील ‘आप’ची हार आणि केजरीवाल यांचा पराभव या दोन्ही गोष्टी भारतीय लोकशाहीची चौकट अत्यंत मजबूत करणार्‍या आहेत. म्हणून जनतेच्या या निर्णयाची तुलना १९७३च्या ‘केशवानंद भारती’ खटल्याच्या निर्णयाशी करावी लागते.
 
अण्णा हजारे यांनी २०१२ साली भ्रष्टाचाराविरुद्ध दिल्लीत उपोषण केले, आंदोलन केले. त्यांच्या उपोषणाने संपूर्ण देश तेव्हा शब्दशः ढवळून निघाला. ‘अण्णा हजारे आँधी हैं, इस युग का गांधी हैं’ अशा घोषणा जनतेने उत्स्फूर्तपणे दिल्या. ज्याचा कोणताही व्यक्तिगत स्वार्थ नाही, जनहित ज्याची जीवन प्रेरणा आहे, अशी व्यक्ती भारतीय मनाला आकृष्ट करते. सर्व प्रकारचे भेद विसरून लोक त्या व्यक्तीभोवती उभे राहतात. अशा व्यक्तीला ‘गांधी’ म्हणतात. तसे २०१२ साली अण्णा हजारे देशाचे ‘गांधी’ झाले.
 
लोकमान्य टिळक म्हणत असत की, राजकारण हा साधुसंतांचा विषय नाही. पुढचे वाक्य त्यांनी काही सांगितले नाही, पण ते असे आहे की, राजकारण हा धूर्त, चाणक्य, महत्त्वाकांक्षी, संधीसाधू लोकांचा खेळ आहे. असे सर्व लोक अण्णा हजारेंभोवती गोळा झाले. संतप्रवृत्तीच्या अण्णा हजारेंना सगळीच माणसे चांगली वाटली. धर्मराजाला ज्याप्रमाणे जगात कुणीही वाईट दिसत नसे, तसे अण्णा हजारे यांचे झाले. या संधीसाधू आणि लबाड लोकांतील शिरोमणी अरविंद केजरीवाल होते. २०१२ साली त्यांचे अण्णा हजारे यांच्यासोबतचे फोटो वर्तमानपत्रात झळकत होते. पुढे आंदोलन संपले आणि वातावरणाचा लाभ घेण्यासाठी अरविंद केजरीवाल गिधाडाप्रमाणे झेपावले. त्यांनी ‘आप’ची स्थापना केली. दिल्लीची निवडणूक लढवली आणि २०१३ पासून सलग तीनदा दिल्लीचे मुख्यमंत्रिपद भूषविले.
 
चित्रपटाविषयी असे म्हटले जाते की, एखादी नटी किंवा नट एका रात्रीत लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचतो. राजकारणात दर वेळेला असे होत नाही, परंतु अरविंद केजरीवाल सर्वांत कमी वयाचे मुख्यमंत्री म्हणून एका रात्रीत देशातील पहिल्या श्रेणीचे राजनेते झाले. राजकारण करताना त्यांनी घोषणा केली की, ‘मी भ्रष्टाचार करणार नाही, सुरक्षा व्यवस्था घेणार नाही, महागड्या गाड्या वापरणार नाही, माझे उर्वरित आयुष्य जनहितासाठी समर्पित असेल, मी तज्ज्ञ लोकांना बरोबर घेऊन पक्ष चालवेल, त्यांच्याकडे जबाबदार्‍या देईन, जनहित हाच माझा श्वास असेल.’
 
जनतेला असे वाटले की, अण्णा हजारेंचा हा खराखुरा शिष्य आहे, अन्य राजकीय नेत्यांप्रमाणे हा माया गोळा करण्याच्या मागे लागणार नाही. आपले हित पाहील. अशी ही भारतीय जनता एकाचवेळी अतिशय शहाणी असते आणि तेवढीच भोळी असते. या जनतेला भूलवणे तसे अवघड काम नसते. अरविंद केजरीवाल हे उच्चविद्याविभूषित आणि अतिशय बुद्धिमान असल्यामुळे विद्येचा आणि बुद्धीचा उपयोग लोकांना ठकविण्यासाठी कसा करता येईल, या विद्येतील ते ‘मास्टर’ झाले. त्यांनी मोफत पाणी, मोफत वीज, मोफत शिक्षण अशा घोषणा केल्या. भोळी जनता खूश झाली.
 
अब्राहम लिंकनचे एक वचन आहे. अब्राहम लिंकन म्हणतात, “तुम्ही सर्व लोकांना काही काळासाठी फसवू शकता आणि काही लोकांना सदैव फसवू शकता. परंतु तुम्ही सर्व लोकांना सर्व काळासाठी फसवू शकत नाही.” १८५८च्या एका भाषणातील लिंकन यांचे हे वाक्य आहे. बुद्धिमान केजरीवाल यांना हे वाक्य माहीत नसेल, असे नाही. परंतु, त्यांना असे वाटले की, ‘यह जनता हैं, इसको मैं यू ठका सकता हूँ।’
 
हा ठग नंतर मद्य घोटाळ्यात तिहार तुरुंगात गेला. कोट्यवधी रुपयाच्या त्याच्या आलिशान मुख्यमंत्री बंगल्याचे त्यातील शौचालयाचे फोटोदेखील सर्व प्रसिद्धी माध्यमात झळकले. गैरकारभाराच्या एकेक सुरस कथा बाहेर येऊ लागल्या. दिल्लीतील प्रदूषण, नळातून येणारे गढूळ पाणी, फुकट विजेचा घोटाळा, सर्व काही जनतेपुढे यायला लागले आणि भोळ्या जनतेचे शहाणपण जागृत होऊ लागले. तिने ठरवून टाकले की, आपल्या डोक्यावर राख फासणारा आणि स्वतः लोण्याचा गोळा खाणार्‍या या मुख्यमंत्र्याला घरी बसविले पाहिजे. जनतेचा हा ऐतिहासिक निर्णय दि. ८ फेब्रुवारीला जाहीर झाला.
 
अरविंद केजरीवाल आणि त्यांची ‘आप’ भारतीय लोकशाहीसाठी एक संकट आहे. हिटलर ज्याप्रमाणे अनेक विषयांत पारंगत होता, सत्ता काय असते, ती कशी संपादन करायची, लोकांना कसे झुलवायचे, लोकांना झुलविण्यासाठी कोणते विषय हाती घ्यायचे, भाषणे कशी करायची, आपली जरब कशी निर्माण करायची, या सर्व बाबतींत हिटलर हा हिटलर होता. लोकशाही मार्गानेच तो हिटलर झाला. अरविंद केजरीवाल हे बुद्धिमान असल्यामुळे आणि चांगले वक्ते असल्यामुळे आपले सहकारी, पक्ष कार्यकर्ते आणि लोकांना कसे मूर्ख बनवायचे, या कलेत ते फार पारंगत होते.
 
मुख्यमंत्री झाल्याबरोबर त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याबरोबर स्पर्धा सुरू केली. ‘देशाचा भावी पंतप्रधान मीच’ असे न बोलता त्यांनी आपली प्रतिमा रंगवायला सुरुवात केली. दिल्ली विधानसभेत त्यांचे एक भाषण झाले. भाषणाचा विषय होता, ‘चौथी पास राजा’ चौथी उत्तीर्ण राजाची कथा त्यांनी सांगितली. ‘आप’चे विधायक दात काढून हसत होते आणि आतिशीदेखील बत्तीशी काढून हसत होती. नरेंद्र मोदी चौथी उत्तीर्ण आहेत, अर्धवट आहेत, मूर्ख आहेत वगैरे वगैरे या कथेच्या माध्यामातून केजरीवालांना सांगायचे होते. देशाच्या पंतप्रधानाचा तोपर्यंत कोणत्याही विरोधी पक्षनेत्याने एवढा घोर अपमान केला नसेल.
 
शेवटी पापाचा घडा भरला. काही लोकांना काही काळ तुम्ही फसवू शकता, परंतु सर्व लोकांना सर्व काळ फसविता येत नाही. अब्राहम लिंकन यांचे हे वाक्य कुर्‍हाडीचे पाते बनून केजरीवाल यांच्या मानेवर पडले आहे. केजरीवाल प्रवृत्ती सांगते की, मतदारराजा तू सदैव जागा राहा. भूलथापांना फसू नकोस आणि स्वतःचा नाश करून घेऊ नकोस! म्हणून आपण विचार केला पाहिजे की, एक केजरीवाल पुरे झाले, आता दुसरा केजरीवाल निर्माण होऊ द्यायचा नाही. दिल्ली निकालाचा हाच संदेश आपण घेतला पाहिजे.