प्रत्येक देशाचा इतिहास असतो आणि तो त्यांच्या नजरेतून लिहिला जातो. मात्र, भारतीय आधुनिक इतिहासाची मांडणी आजही भारतीयांच्या दृष्टिकोनातून झालेली नाही. त्यामुळेच या इतिहासातील काही निवडक घटनांचा आणि भारतीयांच्या अज्ञानाचा लाभ भारतद्वेष्टे घेत आहेत. त्यामुळे उज्ज्वल भविष्यासाठी भारतीयांनी खर्या इतिहासात डोकावणे गरजेचे आहे.
भारतीय राष्ट्राचा विचार केल्यास आपल्या इतिहासात अशा अनेक घटना घडून गेल्या आहेत, हे लक्षात येते. ज्यांनी आपल्या राष्ट्रीय जीवनाला कलाटणी दिली आहे. परंतु, इतका प्रदीर्घ इतिहास लाभला असताना, त्यातील सर्वच घटना समाजाच्या स्मृतीत टिकून राहात नाहीत. त्यापैकी काही घटना समाजाच्या मानसिकतेवर घट्ट कोरल्या जातात आणि काही घटनांची साधी आठवणही कोणाला राहिलेली नसते. या आपल्या आठवणी अनेक प्रकारे निर्माण होत असतात. शाळेत शिकलेला इतिहास, चित्रपट, टीव्ही मालिका, पुस्तके यातून समोर येणारा इतिहास, समाजमाध्यमांवर वावरताना आदळणारे इतिहासाचे खरेखोटे पुंजके हे सर्व, आपल्या स्मृतीतील इतिहास निर्माण करण्यास हातभार लावतात. भौगोलिक विस्तारामुळे यातील काही स्मृती, अगदी स्थानिक स्वरूपाच्या राहतात आणि काहींनाच राष्ट्रीय पातळीच्या सामाजिक स्मृतींमध्ये स्थान मिळते.
इतिहास हा कोणत्याही समाजाच्या राष्ट्रभावनेचा प्रमुख आधारस्तंभ असतो आणि समाजाला जर आत्मभान जागृत ठेवायचे असेल, तर इतिहासाचा परिचय हा समाजाच्या सर्व स्तरांमध्ये आवश्यक असतो, हे आपण मागील लेखात पाहिले. त्यामुळे वैचारिक वसाहतवादापासून मुक्तीच्या लढाईत, इतिहासाचे यथार्थ आकलन महत्त्वाचे ठरते. वसाहतवादी दृष्टिकोनाहून भिन्न असा भारतीय दृष्टीने इतिहासाचा विचार करावयाचा म्हटल्यास, आपल्याला दोन गोष्टींचा विचार करावा लागेल. पहिली म्हणजे भारतीय दृष्टिकोनातून इतिहास या शाखेची व्याप्ती काय आणि तिच्या अभ्यासाची साधने कोणती? पाश्चात्य दृष्टिकोनातून पाहताना, इतिहास ही विविध पुराव्यांनी सिद्ध झालेली घटनांची एक जंत्री आहे आणि या घटनांच्या कार्यकारणभावाचे आकलन करून घेणे, हा इतिहासाचा प्रमुख उद्देश आहे. यामध्ये एकाहून अधिक साधनांच्या घटनेची पुष्टी, याला अत्यंत महत्त्व आहे. याचमुळे ज्या प्राचीन कालखंडात वेगवेगळ्या देशांचा एकमेकांशी संबंध येत नसे, त्या काळातील एकाच संस्कृतीत उल्लेख असलेल्या घटनांना इतिहासाचे स्थान नसते, तर त्यांना मिथके (ाूींह) म्हणून संबोधले जाते. भारतीय दृष्टीने इतिहास ही केवळ घटनांची जंत्री नसून, त्यातून समाजभावनेस पोषक अशा मूल्यांचा प्रसार होणे अपेक्षित आहे. त्यामुळे त्यातील सत्यतेची पुष्टी करण्यास पुरावे देत बसणे महत्त्वाचे नाही, तर त्यातून समाजाचे उद्बोधन करणे महत्त्वाचे आहे. या संकल्पनेचा आशय लक्षात घेतल्यास, रामायण आणि महाभारत यांना भारतीय संस्कृतीत इतिहास असे का म्हटले जाते हे लक्षात येईल. भारताची इतिहास संकल्पना विचारात घेतल्यास रामायण, महाभारत, विविध पुराणे हे आपले इतिहासग्रंथ ठरतात. या ग्रंथांमधून, विवेचन केलेले विषय आजही आपल्यासाठी प्रमाण म्हणून लोकव्यवहारात वापरले जातात.
पौराणिक कालखंडातून थोडे पुढे आल्यानंतर मात्र, आपल्या इतिहासाचे संदर्भ अन्य संस्कृतींच्या उल्लेखातूनही येतात. या काळातील भारतीय इतिहास अनेक चढउतारांनी भरलेला आहे. या कालखंडाविषयी भारतीय दृष्टीने इतिहासाचा विचार करताना पाहायची दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या समाजास प्रेरक ठरतील, अशा कोणत्या ऐतिहासिक घटनांचे आपल्याला सामूहिक स्मरण ठेवायचे आहे याचा विचार. या प्रश्नाकडे पाहण्याचे विविध मार्ग आपल्याला अनेक विचारवंत सुचवतात. त्यातील सावरकरांनी मांडलेला सिद्धांत म्हणजे, राष्ट्राच्या राजकीय आणि सामरिक विजयांचे जे प्रसंग आहेत त्यांचे स्मरण. या महत्त्वाच्या घटनांचे वर्णन सावरकर त्यांच्या ‘सहा सोनेरी पाने’ या ग्रंथात करतात. आजच्या विज्ञानयुगात आपल्या इतिहासातील थोर वैज्ञानिकांचे आणि त्यांच्या शोधांचा इतिहासही समाजास प्रेरणादायी आहेत. आपल्या इतिहासात कला व वाङमय यांचाही सखोल विचार झाला आहे. प्राचीन नाटके व नाटककार, अभिजात संगीत व नृत्याची परंपरा आणि त्यांचे लोककलांच्या माध्यमातून झालेले समाजाभिमुख रुपांतर हा तर केवळ इतिहास नाही, तर आपल्या समाजात इतिहासाची जाणीव प्रसृत होण्याची महत्त्वाची माध्यमेसुद्धा आहेत. त्यामुळे इतिहासाच्या सामूहिक स्मृती निर्माण होण्यासाठी त्या निर्मितीच्या माध्यमांची जाण, हे सुद्धा एक महत्त्वाचे अंग या प्रक्रियेत आहे. भारतीय संस्कृतीची जगात ओळख, ही आपल्या तत्त्वज्ञानातील वैविध्यातून आणि सहस्रो वर्षे चालत आलेल्या दार्शनिक ऋषिपरंपरेतून आहे. या परंपरेचे ज्ञान हा तर एकप्रकारे केवळ सामाजिक स्मृतींचाच नाही, तर सामाजिक आत्मबोधाचा महत्त्वाचा गाभा आहे.
भारताचा इतिहास उपरोल्लेखित विविध आयामांतून पाहिल्यास, आपण ढोबळमानाने त्याचे तीन भाग करू. पहिला म्हणजे ‘पौराणिक कालखंड’ ज्याची नेमकी सुरुवात कधी झाली, हे आज ज्ञात नाही. वेदांच्या रचनाकाळापासून किंवा त्याही पूर्वीपासून ते साधारण बुद्धकाळापर्यंत, हा काळ धरता येईल. या काळातील घटनांची कालनिश्चिती नाही. महाभारत युद्ध साधारण इ.स.पू. ३० हजार वर्षे धरले जाते. म्हणजे हा न्यूनाधिक तीन ते पाच हजार वर्षांचा कालखंड आहे. मात्र, हा इतिहास केवळ भारतीय स्रोतातून उपलब्ध असल्याने, तो आधीच भारतीय दृष्टिकोनातून चाळला जाऊन आपल्यासमोर आहे. या कालखंडाचे पुरातत्त्वीय संशोधनातून काही पुरावे सापडतात का? प्राचीन ग्रंथांमधील खगोलशास्त्रीय उल्लेखांचा आधार घेऊन काही कालनिश्चिती करता येते का? असे संशोधन सुरूच असते. परंतु, सामान्य भारतीयाच्या दृष्टीने या इतिहासाचा नेमका काळ महत्त्वाचा नाही, तर त्या घटनांची शिकवण महत्त्वाची आहे. त्यामुळेच ‘जय’ नावाच्या व्यासांनी सांगितलेल्या आठ हजार श्लोकांच्या ग्रंथाचे, एक लक्ष श्लोकी महाभारत होते. याच काळात सिंधू-सरस्वती खोर्यातील, ‘हडप्पा संस्कृती’चे अवशेष मिळतात. अनेक वर्षे आर्य आक्रमणाचा बिनबुडाचा सिद्धांत सतत शिकून ही कोणतीतरी परकीय संस्कृती होती, असा समज आपणच करून घेतला होता. पण, आता सिंधूलिपी ही संस्कृत भाषेचीच लिपी होती आणि या संस्कृतीचे सापडलेले शिलालेख हे वेदकालीन संस्कृत भाषेत आहेत असा शोध लागल्यामुळे, आपल्या इतिहासाच्या आकलनाला अधिक बळकटी मिळते आहे.
दुसरा प्राचीन इतिहासाचा कालखंड, ज्यात आपण बुद्धकाळापासून सिंधवरील इस्लामी आक्रमणाचा काळ धरू शकतो. हा साधारण दीड ते दोन हजार वर्षांचा काळ आहे. या काळाने बौद्ध व जैन मतांसारख्या वैदिकांहून भिन्न मतांचा उदय पाहिला आणि त्यानंतर शंकरचार्यांचा अद्वैतवेदांत आणि अन्य वेदांती मते यांचाही प्रसार पाहिला. याच काळात भारतीय खगोलविज्ञान हे वेदांग ज्योतिषापासून, सिद्धांत ज्योतिषापर्यंत उत्क्रांत झाले. आर्यभट्ट आणि ब्रह्मगुप्त यांसारखे ज्योतिर्विद आणि गणिती या कालखंडात झाले. याच काळातील भारतीय रसायनशास्त्राच्या प्रगतीची साक्ष, दिल्लीचा लोहस्तंभ देत आहे. या कालखंडात उत्तरेत मौर्य, शुंग, गुप्त अशी प्रमुख राजघराणी होऊन गेली. भारताने या काळात प्रथम अन्य राष्ट्रांच्या आक्रमणाचा अनुभव घेतला. ग्रीक सम्राट अलेक्झांडर याची जगप्रसिद्ध स्वारी याच काळात भारतात रोखली गेली. त्यानंतर २००-३०० वर्षे भारताच्या वायव्येस स्थापलेल्या बॅक्ट्रियन ग्रीक राजांनी, भारत जिंकून घेण्याचा असफल प्रयत्न केला. त्यांच्या मागून मध्य आशियातील शक-कुशाण आणि हूण टोळ्यांनी, भारतावर वेळोवेळी आक्रमणे केली. त्यापैकी काहींची राज्ये भारताच्या काही भागात स्थापित झाली. पण, विविध प्रांतांतील भारतीय राजांनी सतत युध्यमान राहून, या सर्व परकीय राज्यसत्तांचा पराभव करीत, भारताचे स्वातंत्र्य पुनर्स्थापित केले. ही आक्रमणे आणि यानंतरची आक्रमणे यातील प्रमुख भेद म्हणजे, लूट आणि राज्यस्थापन एवढेच या आक्रमणांचे उद्देश होते. ग्रीकांचा अपवाद करता, इतर टोळ्या सांस्कृतिकदृष्ट्या विशेष पुढारलेल्या नव्हत्या. त्यामुळे राजकीय पराभवानंतर हे लोक एकप्रकारे भारतीय समाजात मिसळून गेल्यासारखे झाले. उत्तरेत अशा प्रकारे परचक्राचे यशस्वी दमन करताना, दक्षिण दिशेला पल्लव, चोल इत्यादी राजे आग्नेय आशियात व्यापारी आणि सांस्कृतिक प्रसार करत, भारताच्या प्रभावाचा विस्तार करत होते. नवनवीन मंदिरे बांधून, स्थापत्य शास्त्रासारख्या विषयात आश्चर्ये घडवत होते.
इसवी सन ७००च्या आसपास, अरबी मुसलमान टोळ्यांनी केलेल्या सिंध प्रांतावरील आक्रमणापासून भारतीय इतिहासाचा मध्य कालखंड सुरू होतो. या काळात भारताने एका भिन्न प्रकारच्या आक्रमणाला तोंड दिले आहे ते म्हणजे, सांस्कृतिक आक्रमण. यापूर्वी झालेली आक्रमणे, सांस्कृतिक आणि धर्ममताच्या श्रेष्ठत्वाचे दावे करणारी नव्हती. विशेषतः जित समाजाचे बळजबरीने मतांतर करावे, एतद्देशीय हिंदू समाजाच्या देवळांची विटंबना करावी, हिंदूंना पूज्य म्हणून गोहत्या करावी, थोडक्यात म्हणजे समाजाची सतत मानखंडना होत राहील, असे वर्तन शस्त्रबळाच्या जोरावर सतत करत राहावे, या प्रकारचे आक्रमण हिंदूंनी याआधी अनुभवले नव्हते. आमचे धर्ममत आणि ईश्वरप्राप्तीचा आमच्या प्रेषिताने सांगितलेला मार्ग हे एकमेव सत्य असल्याच्या समजुतीतून, मुसलमानी आणि ख्रिश्चन या दोन्ही अब्राहमिक पंथांच्या राजवटींनी सर्व जगभरातील मूळ संस्कृतींच्या उच्छेदाचे प्रयत्न केले. यामध्ये जबरदस्ती धर्मांतरणाबरोबरच धर्मांतरित न झालेल्या समाजाचे आर्थिक व सामाजिक शोषण करून, संपूर्ण समाजात आर्थिक विपन्नता पसरवली गेली. त्यामुळे इसवी सनाच्या पहिल्या सहस्रकातील संपन्न असे भारतीय राष्ट्र, त्यापुढील सहस्र वर्षांत विपन्नतेच्या दशेस येऊन पोहोचले. या कालखंडात भारतीय समाजाने, राजकीय स्वातंत्र्याचे प्रयत्न केले नाहीत असे नाही. किंबहुना मुसलमानी राजवटी आणि ब्रिटिश राज यांच्यामध्ये, अठराव्या शतकात मराठा सम्राज्याचाही कालखंड येतो, जेव्हा आपल्याला राजकीय स्वातंत्र्य प्राप्त झालेले होते. परंतु, अब्राहमिक पंथांच्या मतांतरणातून वैचारिक गुलाम बनवण्याच्या प्रक्रियेचे यथार्थ ज्ञान न झाल्याने, या लोकांना पुन्हा भारतीय संस्कृतीच्या मूळ प्रवाहात आणण्याचे प्रयत्न कधी झालेच नाहीत. आजही आपले प्रभावक्षेत्र वाढवण्यासाठी विविध गटांकडून इतिहासाचा वापर कसा होतो, त्याची भारतीय समाजास पुरेशी जाणीव झालेली नाही.
समाजात आत्मभान आणि आत्मगौरव यांचे जागरण होण्यासाठी, भारतीय दृष्टिकोनातून भारतीय इतिहासाची मांडणी होणे आवश्यक आहे. इतिहास आणि त्याविषयीचा प्रचलित अर्थापेक्षा पृथक असा भारतीय दृष्टिकोन, या दोन्हीचा अभिमान धरून त्याआधारे समाजाच्या मानसिकतेची वाटचाल हीच सांस्कृतिक दास्यातून मुक्ततेची पहिली पायरी असेल.
डॉ. हर्षल भडकमकर
(लेखकाने मुंबईतील टीआयएफआर येथून खगोलशास्त्रात ‘पीएच.डी’ प्राप्त केली आहे. सध्या एका खासगी वित्तसंस्थेत नोकरी करत असून, ‘प्रज्ञा प्रवाह’ या संस्थेचे कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत.)