कोल्ह्याची द्राक्षे

    10-Feb-2025
Total Views |
 
congress
 
 
भारतातील लोकशाहीला ‘मदर ऑफ डेमोक्रसी’ म्हणून गौरवले जाते. मात्र, सध्या काँग्रेस पक्ष जाणीवपूर्वक लोकशाही संस्थांबाबत जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करत आहे. लोकशाहीचा आत्मा असलेल्या संस्थांवर संशयाचे ढग निर्माण करणे, त्यांचा हेतुपुरस्सर अपमान करणे आणि त्यांची विश्वासार्हता धूसर करण्याचा प्रयत्न करणे, हीच काँग्रेसची नवी राजकीय नीती आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खर्गे यांनी ‘मदर ऑफ डेमोक्रसी’ला, ‘मॅनिप्युलेट डेमोक्रसी’ होऊ देणार नाही, असे विधान केले आहे. गेल्या कित्येक निवडणुका गोबेल्स नीतीचा अवलंब करत, काँग्रेसची सातत्याने एकच ओरड आहे की, ‘संस्था पक्षपाती झाल्या आहेत’, ‘न्यायालये स्वायत्त नाहीत’, ‘निवडणूक आयोग दबावाखाली काम करत आहे’ वगैरे. सतत एकच असत्य प्रचार करून, त्याला सत्याचा मुलामा देण्याचा हा नवा गांधीवाद असावा बहुदा. मात्र, सत्य हे कायमच सत्यच असते. सत्याल काँग्रेसच्या मान्यतेची गरज तेव्हाही नव्हती आणि आजही नाही आणि सत्य हेच आहे की, देशात न्यायालये असोत वा निवडणूक आयोग, सीबीआय असो वा ‘ईडी’ या सर्व संस्था, त्यांच्या अधिकारानुसारच कार्यरत आहेत. मात्र, काँग्रेसलाच डोळे झाकून घेऊन, दिवसच उजाडला नाही, अशी बोंब मारायची आहे, त्याला जग काय करेल?
 
जेव्हा एखाद्या संस्थेचा निर्णय काँग्रेसच्या हिताचा नसेल, तेव्हा ती संस्था पक्षपाती ठरते. न्यायालये काँग्रेसच्या बाजूने निकाल देत नसतील, तर ती सरकारच्या इशार्‍यावर नाचत असल्याचा आरोप केला जातो. ‘ईडी’ आणि ‘सीबीआय’ राजकीय सूडबुद्धीने प्रेरित असल्याचे सांगितले जाते. परंतु, याच संस्था काँग्रेसच्या सत्ताकाळात विरोधकांवर कारवाई करत असताना त्या स्वायत्त होत्या, असे काँग्रेसला वाटते! लोकशाही टिकते ती संस्थांवर जनतेचा विश्वास टिकून राहिल्याने. मात्र, काँग्रेस हेतुपुरस्सर जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा संभ्रम म्हणजेच लोकशाहीसाठी खरी धोक्याची घंटा आहे. जनता सत्ता देत नसल्याने, संस्था बदनाम करायच्या हीच काँग्रेसची राजकीय दिशा आहे. खरे तर, सुदृढ लोकशाहीसाठी संस्थांवर श्रद्धा ठेवणे आवश्यक आहे. काँग्रेसला स्वार्थ साधण्यातच स्वारस्य आहे. जनता मात्र सुज्ञ आहे. लोकशाहीच्या मूळ गाभ्यावरच घाव घालणार्‍या काँग्रेसच्या या प्रयत्नांना जनतेने हरियाणा, महाराष्ट्र आणि आता दिल्लीमध्ये चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे, काँग्रेसी कोल्ह्यांची द्राक्षे आंबट असल्याची ही थापेबाजी काही जनतेला रुचणार नाही हे निश्चित.
 
मगरीचे अश्रू
 
 
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी महाकुंभमधील मृत्यूंवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. तसेच अमेरिकेतील अवैध भारतीयांना भारतात पाठवताना अमेरिकेने केलेल्या वर्तनावरूनदेखील स्टॅलिन यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आजवर स्टॅलिन यांनी कायमच हिंदू संस्कृतीला सतत तुच्छ लेखले आहे. त्यांच्या घराण्यात सारेच सनातन संस्कृतीचा अपमान करत फिरत असतात, तेच आता महाकुंभाबाबत मगरीचे अश्रु ढाळत आहेत, हे हास्यास्पद आहे. स्टॅलिन यांचा मुलगा जेव्हा सनातन संस्कृतीला अद्वातद्वा बोलतो, ती नष्ट करण्याच्या धमक्या देतो, त्यावेळी स्वत:च्या मंत्रिमंडळातील उपमुख्यमंत्रिपदी बसवलेल्या आपल्या मुलाला विवेक शिकवण्याची धमक नसलेला तथाकथित नेता, आज महाकुंभमधील आयोजनावरून केंद्र सरकारला जाब विचारत आहे, हे नवलच!
 
बरं, सनातन संस्कृतीचा होत असलेला अपमान रोखण्यात अपयश आल्यानंतर, किमान देशातील संविधानिक व्यवस्थांचा तरी मान ठेवण्याची बौद्धिक प्रगल्भता दाखवणे अपेक्षित असताना, ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वत: कोरडे पाषाण’ या म्हणीचे उदाहरणच प्रस्तुत केले. देशाच्या लोकशाही व्यवस्थेतील महत्त्वाचा भाग असलेल्या राज्यपाल पदापासून, देशाच्या अभिमानाचा केंद्र असलेल्या राष्ट्रगीताचा अपमानदेखील तामिळनाडूच्या विधीमंडळात स्टॅलिन यांनी केला. अमेरिकेमुळे जे भारतीयांच्या स्वाभिमानाला ठेच लागली आहे, त्याबाबत भारतीय सरकारने अमेरिका सरकारकडे तक्रार केलीदेखील आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील नवा भारत अमेरिकेला योग्य तो संदेश देईलच. मात्र, सत्तेच्या मदात आंधळे होऊन राष्ट्रगीताचा अपमान करणार्‍या स्टॅलिनसारख्या भारतीय नेत्यांचे काय करायचे? त्यांनी केलेल्या घृणीत कृत्याची जबाबदारी स्वीकारून ते जनतेसमोर येऊन कधी माफी मागणार? हिंदू आणि देश प्रेमाचे ढोंग सध्या स्टॅलिन रचत आहेत. भारताच्या अस्मितेचा सातत्याने अपमान करणारे स्टॅलिनसारखे नेते ‘नागरिकांची काळजी वाटते’ संगत नौटंकी करतात, हीच मोठी शोकांतिका आहे! देशद्रोह, हिंदूद्वेष आणि फूट पाडण्याच्या राजकारणाच्या जोरावर सत्ता उपभोगणार्‍यांनी आता जनतेला मूर्ख समजू नये. हिंदू संस्कृती आणि भारताचा अपमान करणार्‍या प्रत्येकाला जनता पूर्ण जाणून आहे.
 
 
कौस्तुभ वीरकर