"'वंदे मातरम्'चे दोन तुकडे केले नसते तर देशाची फाळणी झाली नसती ... ", अमित शाह यांचा काँग्रेसवर घणाघात

    09-Dec-2025   
Total Views |

Vande Mataram

मुंबई : (Vande Mataram)
वंदे मातरम् या गीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्ताने मागील दोन दिवसांपासून संसदेमध्ये या गीतावर चर्चा सुरू आहे. पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत या चर्चेची सुरुवात करताना देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत नेहरु आणि काँग्रेसवर टीका केली होती. त्यानंतर विरोधी पक्षातील सदस्यांनीही वंदे मातरम वरून केंद्र सरकारला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, काल राज्यसभेत 'वंदे मातरम' या गीतावर राज्यसभेमध्ये चर्चा झाली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चर्चेला सुरुवात करताना प्रियंका गांधींसह विरोधी पक्षातील इतर नेत्यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

पंडित नेहरुंवर शाह यांचं टीकास्त्र

अमित शाह यांनी वंदे मातरम गीतामधील काही कडवी गाळण्याच्या निर्णयावरुन पंडीत नेहरूंवर टीका केली. ते म्हणाले की, "जर त्या काळात या राष्ट्रीय गीताला लांगूलचालनाच्या नावाखाली दोन तुकड्यात विभागले नसते तर देशाची फाळणी झाली नसती. १९३७ ला पंडीत नेहरूंनी हे गीत दोन कडव्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला आणि तिथून देशात लांगूलचालनाला सुरुवात झाली", असा आरोप गृहमंत्र्यांनी केला.


'वंदे मातरम्' हे बंगालपुरते मर्यादित राहिले नाही

पश्चिम बंगालच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सरकारने वंदे मातरमवर संसदीय चर्चा करण्याचा प्रस्ताव ठेवला, या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या आरोपाला उत्तर देताना शाह म्हणाले की, "हे गीत केवळ बंगालपुरते मर्यादित नाही. या महान गीताचा संबंध पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या निवडणुकीशी जोडून काही लोक या गीताचं महत्त्व कमी करु पाहात आहेत. वंदे मातरमचे निर्माते बंकिम बाबू यांचा जन्म बंगालमध्ये झाला हे खरे आहे, परंतु वंदे मातरम हे बंगाल किंवा भारतापुरते मर्यादित राहिले नाही. त्याचा राजकारणाशी संबंध जोडणे हे दुर्दैवी आहे."

अमित शाह म्हणाले की, "आज वंदे मातरमवर चर्चा करण्याची आवश्यकता का आहे? असा प्रश्न काही सदस्यांनी उपस्थित केला आहे. मात्र देशाच्या आत्म्याशी संबंधित या घोषणेची प्रासंगिकता आधीही होती. आजही आहे आणि येणाऱ्या काळातही कायम राहणार आहे", असे अमित शाह यांनी ठणकावून सांगितले.
.

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\