रेडिओ काॅलर 'चंदा'ची हालचाल कशी टिपतो ?

    08-Dec-2025   
Total Views |
sahyadri chanda tigress


ताडोबामधून सह्याद्रीत स्थानांतरित करण्यात आलेली चंदा वाघीण नवा प्रदेश पिंजून काढण्यात व्यस्त आहे (sahyadri chanda tigress). ‘ऑपरेशन तारा’अंतर्गत या वाघिणीला सह्याद्रीत आणण्यात आले असले, तरी वनविभागाने तिची ‘चंदा’ हीच ओळख अबाधित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे (sahyadri chanda tigress). सध्या तिची प्रत्येक हालचाल टिपण्यात येथील वनकर्मचारी जीवाचे रान करत आहेत (sahyadri chanda tigress). एक फौजफाटाच तिच्यामागे तैनात आहे. चंदाचा पूर्वतिहास आणि तिच्या सद्य परिस्थितीवर प्रकाश टाकणारे हे वार्तांकन...(sahyadri chanda tigress)


गेल्या आठवड्यात दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या ‘वाईल्डलाईफ रिपोर्टिंग डिव्हिजन’चा चमू चंदाच्या हालचालींवर नजर ठेवणार्‍या चमूसोबत सह्याद्रीच्या निबीड जंगलात भटकून आला. चंदाला नैसर्गिक अधिवासात मुक्त केल्यापासून तिचा वावर हा प्रामुख्याने रात्रीच्या वेळेस अधिक आहे. सकाळी गवताळ कुरणामधील झुडुपांच्या आसर्‍याला आराम करायचा आणि रात्रीच्या वेळी नवा परिसर पालथा घालायचा, असा तिचा दिनक्रम. रात्रीच्या वेळी ती साधारण दहा ते १५ किमीचा परिसर पालथा घालते. या सगळ्या हालचालींची नोंद करण्यासाठी एक चमू तिच्या मागे आपले अस्तित्व न दर्शवता वावरत असतो. चंदाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ‘चांदोली राष्ट्रीय उद्याना’च्या प्रत्येक वनपरिक्षेत्रात एक चमू तयार करण्यात आला आहे. ती ज्या वनपरिक्षेत्रात असेल, त्या वनपरिक्षेत्रातील चमू तिच्या हालचालींचे बारकाईने निरीक्षण करून ते टिपून घेतो. या चमूमध्ये वनपाल, वनरक्षक, बीट मदतनीस आणि ‘भारतीय वन्यजीव संस्थान’चे (डब्लूआयआय) संशोधक यांचा समावेश आहे. सध्या चंदा आंबा वनपरिक्षेत्रात असल्यामुळे तिच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काम आंबा वनपरिक्षेत्रातील चमू करत आहे.
 
चंदाच्या गळ्यात लावलेल्या रेडिओ कॉलरच्या माध्यमातून मिळणार्‍या संकेतांवरून नेमलेला चमू तिच्या हालचालींचे बारकाईने निरीक्षण करतो. ती निरीक्षणे टिपून घेतो. रेडिओ कॉलरच्या माध्यमातून दोन प्रकारचे संकेत मिळतात. एक म्हणजे ‘जीपीएस’ संकेत आणि दुसरे म्हणजे ‘उच्च कंपन क्षमता’ (व्हीएचएफ) असणारे संकेत. हे संकेत ‘भारतीय वन्यजीव संस्थान’ आणि ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’तील वरिष्ठ अधिकारी यांना प्राप्त होतात. ‘रेडिओ कॉलर’ हा ‘इस्रो’च्या ‘सरल’ या उपग्रहाशी जोडलेला असून तो कार्यान्वित राहण्यासाठी त्याला एक बॅटरी जोडण्यात आलेली आहे. उपग्रहाच्या माध्यमातून दर अर्ध्ङ्मा तासाने ‘जीपीएस’ संकेत हे ‘डब्लूआयआय’च्या शास्त्रज्ञांना प्राप्त होतात. बॅटरी कार्यान्वित राहण्याची क्षमता ही संकेत प्राप्त करण्याच्या कालावधीवर अवलंबून आहे. थोडक्यात सद्यस्थितीत चंदाच्या ठावठिकाण्याचे संकेत हे अर्ध्ङ्मा तासांनी प्राप्त होत असल्याने दर अर्ध्ङ्मा तासाने बॅटरी कार्यान्वित होते आणि संकेत पाठवून पुन्हा बंद होते. हाच कालावधी जर एक तास केला, तर बॅटरी कार्यान्वित होण्याचा कालावधी कमी होईल आणि ती अधिक दिवस कार्यान्वित राहण्याची क्षमता वाढेल. सद्य परिस्थितीत चंदा नव्या क्षेत्रात असल्याने तिच्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्यासाठी संकेत दर अर्ध्ङ्मा तासाने प्राप्त होतील, असे नियोजन करण्यात आले आहे.
 
चंदाच्या हालचालींवर लक्ष ठेवणारी टीम ही प्रामुख्याने ‘व्हीएचएफ’द्वारे मिळणार्‍या संकेतावर तिच्या हालचालींचे निरीक्षण करते. ‘व्हीएचएफ’ संकेत प्राप्त करणारा एक अ‍ॅन्टेना असतो, जो रेडिओ कॉलरमधून निघणार्‍या उच्च कंपन क्षमतांच्या ध्वनिलहरींना टिपतो. याचे कार्यक्षेत्र तीन किमीपर्यंत पसरलेले असते. चंदावर लक्ष ठेवणारा चमू ‘डब्लूडब्लूआय’च्या शास्त्रज्ञांनी पुरवलेल्या ‘जीपीएस’ लोकेशनचा आधार घेतो, चंदा असलेल्या परिसरात पोहोचतो आणि सुरक्षित अंतर राखून ‘व्हीएचएफ’ संकेताच्या मदतीने तिच्या हालचाली टिपून घेतो. हे सगळे काम वनकर्मचारीच करत असून ‘डब्लूआयआय’चे संशोधक केवळ त्यांना मार्गदर्शन आणि तांत्रिक साहाय्य पुरवतात. ही सगळी माहिती संकलित केली जाते, जेणेकरून चंदाच्या हालचालींचा आणि तिच्या हद्दक्षेत्राचा बारकाईने अभ्यास करता येईल. सध्या चंदा खुशालीत असून तिने शिकारदेखील केली आहे. शिवाय काल ङ्किळालेल्ङ्मा ङ्काहितीनुसार, तिच्यापासून साधारण नऊ किमी अंतरावर ‘सेनापती’ हा वाघ आणि २५ किमी अंतरावर ‘सुभेदार’ हा वाघ आहे. यामधील कोण्या एका वाघाबरोबर तिची जोडी जमल्यास सह्याद्रीत व्याघ्र स्थानांतरणाचा हेतू सुफळ होईल.
 
आनुवंशिक विविधता महत्त्वाची
सद्य परिस्थितीत ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’मध्ये नर वाघ स्थायिक आहेत. या भूप्रदेशात पूर्वापारपासून वाघांचा अधिवास राहिलेला आहे. मात्र, मधल्या काळात काही अनियंत्रित कारणास्तव या भूप्रदेशातील वाघांच्या अधिवासात घट झाली. त्यामुळे इथल्या वाघांच्या अधिवासाला वाढवण्याकरिता किंवा त्याला पुन्हा पुनरुज्जीवित करण्यासाठी आपण व्याघ्र स्थानांतरणाचा प्रकल्प राबवत आहोत. नैसर्गिक परिसंस्थेत वाघ हा अधिवासाची निगडित असणारा प्राणी आहे. म्हणजेच तो स्थलांतर करतो, मूळ संख्या असलेल्या अधिवासामधून अनुरुप असणार्‍या अधिवासामध्ये जातो. तिथे स्थायिक होतो आणि नवीन हद्दक्षेत्र तयार करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, सलग वनक्षेत्र नसेल तर नैसर्गिक परिसंस्थेत या संपूर्ण क्रियेची गती मंदावते. अशा परिस्थितीत मानवालाच प्रयत्न करून या क्रियेची गती वाढवावी लागते. व्याघ्र स्थानांतरण हा याच क्रियेचा एक भाग आहे. नवेगाव-नागझिरामध्ये व्याघ्र स्थानांतरण केल्यानंतर सह्याद्रीत होणारा व्याघ्र स्थानांतरणाचा हा राज्यातील दुसरा प्रयोग आहे. यापूर्वी आपण ताडाबोमधून ओडिशामध्येही वाघांचे स्थानांतरण केले आहे. ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’त होणारे व्याघ्र स्थानांतरण हे प्राथमिक स्तरावरचे आहे. जिथे आपण स्थायिक असलेल्या नर वाघांसाठी ताडोबाच्या आधिवासामधून मादी आणून वाघांची संख्या वाढवण्यासाठीचे प्रयत्न करण्याबरोबरच येथील आनुवंशिक विविधतादेखील वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आनुवंशिक विविधता हा नेहमी दुर्लक्षित केला जाणारा विषय असून ते एक मोठे नैसर्गिक संसाधन आहे. कारण, प्रजातींमधील आनुवंशिक विविधतेमुळे त्या प्राण्याचा आरोग्याचा पोत चांगला राहतो - डॉ. जितेंद्र रामगावकर, मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव (पश्चिम)
 

स्थानिकांचा विकास
व्याघ्र स्थानांतरण हे वन्यजीव संवर्धनाबरोबरच स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने देखील महत्त्वाचे आहे. या प्रकल्पाअंती वाघांची संख्या वाढल्यास ताडोबासारखेच पर्यटन हे चांदोली राष्ट्रीय उद्यानात तयार होईल. स्थानिकांचा विकास, होम स्टेचा विकास, नेचर गाईड तयार व्हावेत यासाठी वन विभाग प्रयत्न करत आहे. सद्या याठिकाणी येणार्‍या पर्यटकांना वाघांची पदचिन्ह आणि त्यांचे आवाज ऐकू येत आहेत. लवकरच त्याचे दर्शन देखील घडेल. - तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प
कॉलर सुरक्षित
चंदाच्या गळ्यात लावलेले ’रेडिओ कॉलर’ हे ९८० ग्रॅम वजनाचे आहे. सर्वसामान्यपणे कॉलरचे वजन हे वाघाच्या वजनाच्या ०.८ टक्के असल्याने वजनाच्या अनुषंगाने त्यांना त्रास होत नाही. कॉलर लावण्यापूर्वी तांत्रिक व शास्त्रीय दृष्टीने मानेचे मोजमाप, डोक्याचे मोजमाप व कॉलरचे मोजमाप अचूक घेतले जाते. लावताना कॉलर पट्टा आणि त्वचेमध्ये सुरक्षित अंतर ठेवले जाते. कॉलर काढताना ’टायमर ड्रॅाप ऑफ’ ही पद्धत वापरुन बटनाच्या एका क्लिकवर कॉलर वाघाच्या गळ्यातून पाडला जातो.
- आकाश पाटील, संशोधक, डब्लूआयआय

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.