भारतीय नौदलाने ‘स्व’ची अभिव्यक्ती नेहमीच साध्य केली आहे. प्रथम ‘रॉयल इंडियन नेव्ही’ची ‘इंडियन नेव्ही’ झाली. नौदलाचे बोधवाक्य ‘शं नो वरुणः’ असे झाले; परंतु ‘नौदल दिवस’ मात्र २१ ऑक्टोबरच होता. दि. २१ ऑक्टोबर १८०५ या दिवशी इंग्रज नौदलाने नेपोलियनचा पराभव केला, त्याचा तो स्मरण दिवस होता. दि. ४ डिसेंबर १९७१ या दिवशी स्वतंत्र भारताच्या नौदलाने प्रचंड पराक्रम गाजवून पश्चिम समुद्र आणि पूर्व समुद्र दुमदुमवून टाकले. तेव्हापासून दि. ४ डिसेंबर हा ‘नौदल दिन’ म्हणून साजरा होतो. त्या पराक्रमांची ही गाथा...
इंग्रज साहेब पक्का धूर्त कोल्हा. आधुनिक आरमारी विद्या भारतीयांपासून त्याने कटाक्षाने दूर ठेवली होती. अगदी नाईलाज म्हणून अल्पप्रमाणात त्याने भारतीय लोकांना नौसेनेत घेतले; पण ते खलाशी म्हणून, अधिकारी म्हणून नव्हे; पण पहिल्या महायुद्धानंतर हळूहळू ‘रॉयल इंडियन नेव्ही’मध्ये भारतीयांची संख्या वाढू लागली. १९४७ साली इंग्रज साहेबाला भारत सोडून जावेच लागले. १९५० साली भारत ‘प्रजासत्ताक’ होऊन ‘रॉयल इंडियन नेव्ही’ची ‘इंडियन नेव्ही’ झाली; पण आमचा नौसेनाप्रमुख इंग्रजच. शेवटी १९५८ साली पहिला भारतीय अधिकारी नौसेनाप्रमुख बनला, त्याचे नाव अॅडमिरल रामदास कटारी.
स्वातंत्र्यानंतर लगेचच म्हणजे, ऑक्टोबर १९४७ मध्ये पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले; पण हे युद्ध मुख्यतः काश्मीरच्या भूमीवरच लढले गेले. त्यात नौसेनेच्या सहभागाचा प्रश्न आलाच नाही. नंतर डिसेंबर १९६१ मध्ये भारतीय भूदलाने गोवा पोर्तुगीज अंमलाखालून मुक्त करण्यासाठी गोव्यावर स्वारी केली. पोर्तुगाल ही एकेकाळची नाविक महासत्ता होती. आतासुद्धा पोर्तुगीज ‘अल्फान्सो डि अल्बुकर्क’ नावाच्या ‘स्लूप’ जातीच्या युद्धनौकेच्या भरवशावर गोव्याचा बचाव करण्याची स्वप्ने पाहात होते; पण आता हे १६वे शतक नव्हते. भारतीय नौदलाच्या ‘बियास’ आणि ‘बेटवा’ या दोन ‘फ्रिगेट’ जातीच्या युद्धनौकांनी ‘अल्फान्सो डि अल्बुकर्क’ला पिटून काढले. रणांगणातून पळ काढणारे ते लढाऊ जहाज बांबोळीच्या किनार्याजवळ वाळूत घुसले आणि १८०च्या कोनात कलंडून आकाशाकडे पाहात राहिले. चीत झालेल्या पहिलवानाने अस्मान बघत पडावे तसे. स्वतंत्र भारतीय नौदलाने पाहिलेली ही पहिली ‘अॅक्शन’. मात्र, ती खूपच छोटी होती.
मग, ऑक्टोबर १९६२ मध्ये चीनने भारतावर आकस्मिक आक्रमण केले. हे युद्ध हिमालयात लढले गेले. त्यामुळे तेव्हाही नौदल युद्धाचा प्रसंग उद्भवला नाही. नंतर सप्टेंबर १९६५ मध्ये पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले. दि. ७ आणि ८ सप्टेंबर १९६५ ला काही भुरटी पाकिस्तानी जहाजे भारतीय तीर्थक्षेत्र द्वारकेवर बॉम्बफेक करून पळून गेली. यावेळी भारताचे नौसेनाप्रमुख होते अॅडमिरल भास्करराव सोमण. मूळचा बेळगावचा मराठी सेनानी. आता पाकिस्तानच्या कराची बंदरावर जाऊन धडक मारायला अॅडमिरल सोमण आणि त्यांचे नाविक जवान नुसते फुरफुरत होते; पण पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींनी महत्त्वपूर्ण निर्णय दिला. या युद्धात प्रत्याक्रमण फक्त भूदल आणि वायुदलच करेल; नौदलाने पश्चिम नि पूर्व समुद्रीय प्रदेशात कडक बंदोबस्ताने राहून संरक्षण फक्त करावे, आक्रमण करू नये. नौसैनिकांचा नाईलाज झाला.
आणखी सहा वर्षे उलटली. १९७१ मध्ये पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान यांच्यात भयंकर यादवी सुरू झाली. भारताला यात पडावे लागणार हे तर नक्कीच होते; फक्त केव्हा, एवढाच प्रश्न होता. भूदल, नौदल आणि वायुदल तिघांचीही जोरदार तयारी होती. वायुदलप्रमुख प्रतापचंद्र लाल, नौदलप्रमुख अॅडमिरल सरदारीलाल नंदा हे वाट पाहात होते. सरसेनापती आणि भूदलप्रमुख जनरल सॅम माणेकशा यांच्या इशार्याची. आभाळ शीगोशीग भरून आले होते.
दि. ३ डिसेंबर १९७१ या दिवशी पाकिस्तानी वायुदलाने काश्मीर आणि पंजाबमधील ११ भारतीय ठाण्यांवर एकाच वेळी बॉम्बफेक केली आणि तीनही भारतीय सैनिकी दले पाकिस्तानवर तुटून पडली. भारतीय नौसैनिकांचे हे पहिले मोठे युद्ध होते. एकाच वेळी, पश्चिमेकडे कोचीन ते कारवार-ते मुंबई-ते कराची, असा पूर्ण अरबी समुद्र आपल्या हातात ठेवायचा होता, तर पूर्वेला विशाखापट्टणम ते चित्तगाँग-ते कॉक्सबझार हा समुद्री परिसर; तसेच गरज पडल्यास पूर्व पाकिस्तानच्या गंगा, मेघना आदि नद्यांच्या मुखांमधूनही आत घुसायचे होते. शिवशिवणार्या मनगटांचे बहाद्दर भारतीय जवान ’अॅक्शन’साठी आसुसले होते.
आणि ती ’अॅक्शन’, तो थरार त्यांना लगेचच ४ डिसेंबरला मनमुराद अनुभवायला मिळाला. कराची बंदरावर हल्ला चढवायला निघालेल्या सहा जहाजांच्या भारतीय पथकाची गाठ, चार जहाजांच्या पाकिस्तानी पथकाशी कराची बंदराच्या दक्षिणेला समुद्रात सुमारे १७ नॉटिकल मैलांवर (भूमीवर सुमारे ३१ किमी) पडली. रात्रीच्या अंधारात म्हणजे, रात्री साडेदहाच्या सुमारास जबरदस्त घनचक्कर झाली आणि... आणि भारतीय नौदलाने चारही पाकिस्तानी जहाजे साफ बुडवली. भारतीय नौदलाने या युद्धात प्रथमच सोव्हिएत रशियन बनावटीच्या ‘स्टाईक्स’ या प्रक्षेपणास्त्राचा उपयोग केला. अरबी समुद्र परिसरात करण्यात आलेला ‘सरफेस-टू-सरफेस’ मिसाईलचा हा पहिला प्रयोग.
कराची बंदराची पहिली संरक्षणफळी अशाप्रकारे साफ कापून काढल्यावर, ‘आयएनएस निःपात’, ‘निर्धात’, ‘वीर’, ‘किलतान’, ‘कटचाल’ आणि ‘पोषक’ या सहा भारतीय युद्धनौकांनी ठरल्याप्रमाणे कराची बंदरावर हल्ला चढवला. तेवढ्यात आणखी काही जहाजे आडवी आली. रात्रीचे ११ वाजले होते. पुन्हा ‘स्टाईक्स’ प्रक्षेपणास्त्रांना बत्ती दिली गेली. परिणामी, ‘मुहाफिज’ ही विनाशिका आणि ‘व्हीनस चॅलेंजर’ हे दारूगोळापुरवठा जहाज समुद्रतळाशी गेली, तर ‘शाहजहाँ’ ही विनाशिका जबर जायबंदी झाली. आडवे आलेल्यांना अशारीतीने आडवे पाडल्यावर ‘आयएनएस निःपात’ने कराची बंदरातल्या केमारी इथल्या पेट्रोल टाक्यांच्या दिशेने पुन्हा दोन स्टाईक्स प्रक्षेपणास्त्रे सोडली. त्यातल्या एकाचा नेम चुकला.
दुसर्याने मात्र अचूक लक्ष्यवेध केला. प्रचंड स्फोट झाला आणि यात कराची बंदराचा संपूर्ण तेलसाठा जळून खाक झाला. एक प्रचंड थरारनाट्य अनुभवून, नव्हे घडवून सहाही भारतीय नौका सुखरूपपणे भारतीय सागरीसीमेकडे पसार झाल्या. अरबी समुद्रात हे घडत असताना इकडे पूर्वेकडे बंगालच्या उपसागरात याहीपेक्षा विस्मयकारक नाट्य घडत होते. भारतीय विमानवाहू नौका ‘आयएनएस विक्रांत’ ही पूर्व पाकिस्तानची ‘सागरीकोंडी’ करण्यासाठी बंगालच्या उपसागरात तैनात करण्यात आली होती. ती विशाखापट्टणम् बंदरातून बाहेर पडून चित्तगाँगकडे जात असताना वाटेतच तिला गाठून बुडवायची, अशी अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना पाकिस्तानी नौदलप्रमुख अॅडमिरल मुझफ्फर हसन यांनी आखली होती.
पाकिस्तानी पाणबुडी ‘पीएनएस गाझी’ हिला ‘विक्रांत’च्या मागावर सोडण्यात आले. भारतीय नौदलाच्या पूर्व विभागाचे प्रमुख व्हाईस अॅडमिरल नीलकंठन कृष्णन् यांनी ‘आयएनएस राजपूत’ या विनाशिकेचे कॅप्टन इंदरसिंग यांना संदेश पाठवला - गाझी चेन्नई ते विशाखापट्टणम्च्या दरम्यान कुठेतरी आहे. कॅप्टन इंदरसिंग राजपूतला घेऊन विशाखापट्टणम् बंदरातून बाहेर पडले. दि. ३ डिसेंबर १९७१, वेळ रात्री ११.४०. बंदरातून खुल्या समुद्रात पोहोचेपर्यंत मध्यरात्र झाली.
४ डिसेंबर तारीख लागली आणि टेहेळ्याने इशारा दिला की, जहाजाच्या वाटेत काहीतरी अडथळा दिसतोय. कॅप्टनने दिशा बदलत पूर्ण वेगाने जहान पुढे काढले आणि त्या अडथळ्याच्या दिशेने दोन ‘डेप्थ चार्जेस’ सोडले. प्रचंड स्फोट झाले. ते वाजवीपेक्षा इतके मोठे होते की, ‘राजपूत’ जहाजही गदगदा हादरले. इतकेच नव्हे, तर विशाखापट्टणम् बंदरपट्टीही हादरली. अकल्पितपणे ‘राजपूत’च्या त्या तोफगोळ्यांनी ‘पीएनएस गाझी’च उडवली होती. ८२ नौसैनिक, ११ अधिकारी असे एकूण ९३ लोक आणि ‘एम-के १४’ हे अत्याधुनिक ‘टॉरपेडो’ यांनी सुसज्ज अशी खतरनाक ‘गाझी पाणबुडी’ बंगालच्या उपसागराच्या तळाशी छिन्नभिन्न होऊन पडली. पूर्वेकडच्या पाकिस्तानी आरमाराचा दमच खलास झाला. ‘विक्रांत’ला असणारा धोका संपला. भारतीय नौदलाने पूर्व पाकिस्तानची व्यवस्थित सागरीकोंडी करून पाकिस्तानी सैन्याला समुद्रमार्गे मिळू शकणारी रसद तोडली.
भारतीय नौदलाच्या या भव्य यशाला किंचित गालबोट लागले ते ‘आयएनएस कुकरी’च्या जाण्याने. दि. ८ डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर पश्चिमेकडे दीवजवळच्या समुद्रात ‘कुकरी’ ही ‘फ्रिगेट’ जातीची भारतीय युद्धनौका ‘हँगोर’ या पाकिस्तानी पाणबुडीने बुडवली. १७६ सैनिक आणि १८ अधिकारी यांच्यासह कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला यांचेही बलिदान झाले. त्याकरिता कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला यांना ‘मरणोत्तर महावीरचक्र’ देण्यात आले. १९७१च्या पराक्रमगाथेला आता ५४ वर्षे झाली आहेत.
‘आयएनएस माहे’
‘इंडियन नेव्हल शिप’ किंवा ‘भारतीय नौदल पोत’ (जहाज) ‘माहे’ नुकतेच म्हणजे दि. २४ नोव्हेंबर २०२५ रोजी नौदलाच्या ताफ्यात सामील झाले. तांत्रिक शब्दांमध्ये सांगायचे तर ‘माहे’ जहाज ’एएसडब्ल्यू. - एसडब्ल्यूसी’ आहे. म्हणजे ’अॅन्टि-सबमरीन वॉरफेअर - शॅलो वॉटर क्राफ्ट’ अशी याची वैशिष्ट्ये आहेत. अत्याधुनिक अशा या पाणबुडी विरोधक युद्धनौकेच्या ’क्रेस्ट’वर म्हणजे मस्तकावरच्या तुर्यावर असणारे चिन्ह फार महत्त्वपूर्ण आहे. भारतीय नौदलाने ’स्व’ची अभिव्यक्ती नेहमीच कशी साध्य केली आहे, याचे हे ताजे उदाहरण आहे.
केरळच्या कुन्नूर आणि कोळिकोड (भ्रष्ट उच्चार कालिकत) या बंदरांच्या साधारण मध्यावर ’मय्याळी’ नावाची नदी पश्चिम समुद्राला मिळते. ‘फ्रेंच ईस्ट इंडिया’ कंपनीचा अधिकारी बर्ट्रांड फ्रांझ्वा माहे डि ल बुर्डोना याला ही जागा आपली व्यापारी वखार बांधण्यासाठी पसंत पडली. स्थानिक राजा वळुन्नावर याच्याकडून त्याने ती मिळवली. ही घटना सन १७२१ सालची. पुढे त्या फ्रेंच वसाहतीला ‘माहे’ हेच नाव पडले. नंतरच्या काळात माहे बंदर कधी इंग्रजांकडे, कधी मराठ्यांकडे, कधी म्हैसूरच्या हैदर अलीकडे असे होत पुन्हा फ्रेंचांकडे आले, अखेर १९५४ साली जेव्हा फ्रेंचांनी पूर्व किनार्यावरची पाँडिचेरी ही वसाहत भारतीय प्रजासत्ताकाकडे सोपवली, तेव्हाच माहे बंदरदेखील मुक्त झाले.
हा सगळा राजकीय प्रवास दाखवणारी तीन शिडाची जहाजे या तुर्याच्या वरच्या भागात आहेत, तर मध्यावर समुद्राच्या लाटांमधून बाहेर आलेले ‘उरुमी’ हे हत्यार आहे. ‘कलारीपयाट्टू’ ही केरळची पारंपरिक युद्धकला आहे. ‘कलारी’ म्हणजे रणांगण आणि ‘पयाट्टू’ म्हणजे युद्धकला. कुणी म्हणतात की, ‘कलारीपयाट्टू’ कलेचा निर्माता भगवान परशुराम आहे, तर कुणी म्हणतात भगवान अय्यप्पा आहे. साधारण १२व्या किंवा १३व्या शतकापासून ‘कलारीपयाट्टू’ची परंपरा चालू आहे, हे निश्चित. या युद्धकलेत वापरल्या जाणार्या विविध हत्यारांमधले एक हत्यार आहे ‘उरुमी’ म्हणजे मराठीतला ‘दांडपट्टा’. दांडपट्ट्याचे पोलादी पाते दुधारी आणि अतिशय लवचीक असते. तो कंबरपट्ट्याप्रमाणे गुंडाळून ठेवला जातो. दांडपट्ट्याचे हात करीत स्वतःभोवती फिरणारा पट्टेकरी आजूबाजूच्या १० ने १५ फुटांच्या पट्ट्यात येणार्या शत्रूचे तुकडे करू शकतो. अतिशय जलदगतीने फिरणार्या पट्ट्याकडे पाहताना एकापेक्षा अधिक पाती फिरत आहेत, असे भासते.
भारतीय नौदलाने अत्याधुनिक जहाजाच्या मस्तक तुर्यावरच्या चिन्हावर या सगळ्या ऐतिहासिक परंपरा चित्रबद्ध करून ‘स्व’ची अभिव्यक्ती केली आहे.