अमित शाहांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यादरम्यान काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी पंतप्रधानांच्या भेटीला!

    31-Dec-2025   
Total Views |

Adhir Chowdhury

नवी दिल्ली : (Congress leader Adhir Chowdhury meets PM Narendra Modi)
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पश्चिम बंगाल दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि पश्चिम बंगाल युनिटचे माजी अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी मंगळवारी ३० डिसेंबरला दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.
 
या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले की, ही एक नियमित बैठक होती. मात्र, या बैठकीत त्यांनी पश्चिम बंगालमधील कामगारांवर होणाऱ्या अत्याचारांचा मुद्दा पंतप्रधानांसमोर मांडला. या विषयावर पंतप्रधान मोदी यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, चौधरी यांनी बंगाली भाषिक लोकांवरील हल्ल्यांचा मुद्दाही उपस्थित केला. विशेषतः भाजपशासित राज्यांमध्ये बंगाली भाषिकांवर होत असलेल्या कथित हल्ल्यांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. अशा घटनांमुळे राज्यात जातीय तणाव आणि हिंसाचार वाढू शकतो, असा इशारा देत पंतप्रधानांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली.
 
पुढील काही महिन्यांत पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून, त्यादृष्टीने ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, बहरामपूर मतदारसंघातून पाच वेळा खासदार राहिलेले अधीर रंजन चौधरी यांना अलीकडील निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे नेते आणि माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते.या भेटीमुळे बंगालच्या राजकारणात नव्या चर्चा सुरू झाल्या असून, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय अर्थ काढले जात आहेत.
 
 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\