मुंबईकरांच्या वाट्याला विकास नव्हे, ठाकरेंकडून केवळ श्रेयवाद!

Total Views |
Elections
 
मुंबई : ( Elections ) निवडणूक जाहीर होताच ठाकरे गटाचे युवानेते आमदार आदित्य ठाकरे अचानक सक्रिय झाले आहेत. मुंबईतील विविध विकासकामांचे सादरीकरण करत “मुंबईत जे काही झाले, ते आम्हीच केले” असा दावा जाहीरपणे करण्यात येत आहे. मात्र मुंबईकरांसाठी प्रश्न स्पष्ट आहे की, विकास प्रत्यक्षात दिसतो आहे की केवळ स्लाइड्स, फोटो आणि भूमिपूजनापुरताच मर्यादित आहे? मुंबईचा विकास हा घोषणांवर नव्हे, तर जमिनीवर उतरलेल्या कामांवर मोजला जातो. पण निवडणुकांच्या तोंडावर विकासकामांचे श्रेय लाटण्यासाठी सुरू असलेली राजकीय धडपड पुन्हा एकदा उघड झाली आहे.
 
कोस्टल रोड : काम कोणाचं, श्रेय कोणाचं?
 
२०१८ साली भाजपा-सेना युतीत पहिला मोठा तणाव निर्माण झाला. कोस्टल रोडसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत सर्व आवश्यक पर्यावरणीय आणि प्रशासकीय परवानग्या मिळवल्या. मात्र प्रत्यक्ष भूमिपूजनाच्या वेळी मुख्यमंत्री असूनही देवेंद्र फडणवीस यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आले.
उद्धव ठाकरे यांनी घाईघाईत भूमिपूजन करून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे भाजपमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आणि अनेक वरिष्ठ नेत्यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला. हा केवळ राजकीय वाद नव्हता, तर श्रेयासाठी सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा स्पष्ट नमुना होता.
 
राजकारणाची वेळ उलटली ती ११ मार्च २०२४ रोजी. जनतेने महायुतीला पुन्हा कौल दिला आणि वरळी ते मरीन ड्राइव्ह या कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. याच वेळी फडणवीसांनी स्पष्ट शब्दांत सांगितले,“राज्याचा मुख्यमंत्री असूनही मला या प्रकल्पाच्या भूमिपूजनाला बोलावले नव्हते.” ही खंत नव्हे, तर ठाकरेंच्या श्रेयवादी राजकारणावरचा पडदा त्यांनी हटवला.
 
हेही वाचा : Navnath Ban : नवनाथ बन यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल
 
बीडीडी चाळ : पुनर्विकास की पुन्हा श्रेयाचा खेळ?
 
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासाचे भूमिपूजन मार्च २०१७ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडले. विशेष म्हणजे त्यावेळी युतीत असतानाही उद्धव ठाकरे बाहेरगावी असल्याचे कारण देत अनुपस्थित राहिले. मात्र शिवसेनेचे सर्व प्रमुख नेते मंचावर उपस्थित होते.
 
तरीही आज आदित्य ठाकरे हे भूमिपूजनात उद्धव ठाकरे यांना डावलले गेले, असा दावा करतात. यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात पुन्हा एकदा भूमिपूजनाचा घाट घालून या प्रकल्पाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावर देवेंद्र फडणवीसांनी ठाम भूमिका घेत सांगितले होते, “बीडीडी चाळ पुनर्विकासासाठी आवश्यक परवानग्या, निधी आणि भूमिपूजन आमच्या सरकारच्या काळातच झाले आहे.”
 
चावीवाटपाला पाठ फिरवणूक : जनतेचा अपमान?
 
दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी वरळी बीडीडी चाळवासीयांच्या आयुष्यातील ऐतिहासिक क्षण आला. नव्या घरांच्या चाव्यांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाले. मात्र या कार्यक्रमाला वरळीचे स्थानिक आमदार आदित्य ठाकरे गैरहजर राहिले. विशेष म्हणजे सरकारकडून अधिकृत आमंत्रण देण्यात आले होते. भाषण यादीत नाव नसल्याचे कारण पुढे करत त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. हा प्रकार केवळ राजकीय हट्ट नव्हता, तर चाळवासीयांच्या आनंदाच्या क्षणावर टाकलेली सावली होती.
 
 हे वाचलत का? - भाजप-शिवसेनेचे जागावाटप निश्चित; भाजप १३७ तर शिवसेना ९० जागांवर लढणार
 
मुंबईकरांचा सवाल : श्रेय नको, काम हवं
 
मुंबईकरांना कोणाचेही नाराजीनाट्य पाहण्यात रस नाही. आम्हाला रस्ते हवेत, घरे हवी आहेत, सुरक्षित आणि जलद प्रवास हवा आहे. कोस्टल रोडमुळे वाहतूक सुरळीत होत असेल, बीडीडी चाळीतील रहिवाशांना सन्मानाचं घर मिळत असेल, तर श्रेय कुणाचं याला काहीच अर्थ नाही. मात्र प्रत्येक विकासकामाभोवती राजकारणाची भिंत उभी राहत असेल, तर त्याची किंमत सामान्य मुंबईकरांनाच मोजावी लागते.
 
आज सोशल मीडिया, गुगल आणि चॅटजीपीटीमुळे सर्व माहिती जनतेसमोर आहे. बीडीडी चाळींचा प्रस्ताव, पाठपुरावा आणि भूमिपूजन कोणी केले, हे सर्व स्पष्ट आहे. तरीही खोटे श्रेय घेतले जात आहे. वर्षानुवर्षे शिवसेना उबाठा गटाची याठिकाणी सत्ता असूनही वरळीचा विकास रखडला. आज जी कामे होत आहेत, ती मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील आहेत. महापालिका निवडणुकीत जनतेने काम करण्याची संधी दिल्यास वरळीतील पाणी, रस्ते आणि पायाभूत सुविधा निश्चित बदलू, असा मला विश्वास आहे.
 
- सोनाली दीपक सावंत,
वार्ड क्र. १९६, भाजप उमेदवार
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.