महापालिका निवडणुकीसाठी मुंबईत १९० नवीन मतदान केंद्रे; एकही केंद्र अतिसंवेदनशील नाही

    27-Dec-2025
Total Views |
BMC Elections
 
मुंबई : ( BMC Elections ) मुंबई आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत सहज पोहोचता यावे यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मतदारांच्या अधिक जवळ मतदान केंद्र असावीत, यासाठी विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत १९० अधिक मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. दाट लोकवस्ती असतानाही मुंबईत एकही मतदान केंद्र अतिसंवेदनशील नसल्याची माहिती मनपाने दिली आहे.
 
मनपा अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी सांगितले की २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान मुंबईत एकूण १०,११० मतदान केंद्रे होती. येत्या महापालिका निवडणुकीसाठी ही संख्या वाढवून १०,३०० करण्यात आली असून यामुळे १९० नवीन मतदान केंद्रांची भर पडणार आहे. मतदानाचा टक्का वाढवण्याच्या उद्देशाने खासगी सोसायट्यांमध्ये अधिक मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. शहरातील सुमारे ७०० खासगी सोसायट्यांमध्ये नागरिकांच्या घरांच्या जवळ मतदान केंद्रे स्थापन केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
हेही वाचा : जेन-झींच्या प्रतिभेवर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास; म्हणाले, "हीच पिढी भारताला..."
 
मुंबईत एकही मतदान केंद्र अतिसंवेदनशील नसल्याचे स्पष्ट करताना अश्विनी जोशी म्हणाल्या की काही मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून वर्गीकृत करण्यात आली आहेत. ज्या ठिकाणी १० पेक्षा अधिक मतदान बूथ असतात, तेथे मतदारांची संख्या जास्त असल्याने गर्दी होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा ठिकाणांचा संवेदनशील यादीत समावेश करण्यात आला आहे.