नवी दिल्ली : (PM Narendra Modi) "जेन झी आणि जेन अल्फा हीच पिढी भारताला 'विकसित भारत'च्या ध्येयाकडे घेऊन जाईल", असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित 'वीर बाल दिवसा'निमित्त आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमात केले. कार्यक्रमातील उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी साहिबजाद्यांच्या शौर्य आणि बलिदानाचे स्मरण केले. तसेच भाषिक विविधता हे भारताचे सामर्थ्य बनत असल्याचे सांगितले. त्यांनी मुघल राजवटीत देशाच्या गुलामगिरीत झालेल्या अत्याचारांचाही निषेध केला. (PM Narendra Modi)
साहिबजादे भारताच्या धैर्याचे आणि शौर्याचे प्रतीक
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, "आज आपण त्या शूर साहिबजाद्यांचे स्मरण करत आहोत, जे आपल्या भारताचा अभिमान आहेत. ते भारताच्या धैर्याचे आणि शौर्याचे प्रतीक आहेत. वय आणि परिस्थितीच्या सीमा तोडणारे हे शूरवीर आहेत. ज्या राष्ट्राचा इतका गौरवशाली भूतकाळ आहे, ज्यांच्या तरुण पिढीला अशी प्रेरणा वारशाने मिळाली आहे, ती जेन-झी पिढी भारताला विकसित राष्ट्र करू शकेल, असे मोदी म्हणाले. (PM Narendra Modi)
पंतप्रधानांचा जेन-झींना खास संदेश
"माझ्या देशाची तरुण पिढी आज या कार्यक्रमात आहे. माझा या पिढीवर खूप विश्वास आहे की, तुमची जेन झी आणि जेन अल्फा हीच पिढी भारताला विकसित भारताच्या ध्येयाकडे घेऊन जाईल मला प्रामाणिकपणे वाटते की, केवळ वयाने कोणीही लहान किंवा मोठा होत नाही. प्रत्येकाचे कर्तृत्व त्याला लहान-मोठा बनवत असते. तुम्ही तुमच्या कामातून आणि कामगिरीतून महान बनता. अगदी लहान वयातही तुम्ही अशी कामे करू शकता की इतर लोक तुमच्याकडून प्रेरणा घेऊ शकतात. तुम्ही भारताचे भविष्य आहात," असा मोलाचा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी युवांना दिला.
२०३५ पर्यंत देशाला गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त करू
पंतप्रधान मोदी म्हणाले, "आपल्या भारतीय बलिदानाच्या आणि शौर्याच्या आठवणी यापुढे दडपल्या जाणार नाहीत. देशाच्या वीर आणि महानायकांना यापुढे दुर्लक्षित केले जाणार नाही. आता भारताने गुलामगिरीच्या मानसिकतेतून स्वतःला मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. २०३५ साठी मेकॉलेने रचलेल्या षड्यंत्राला २०० वर्षे पूर्ण होतील. अजून दहा वर्षे बाकी आहेत. परंतु या या १० वर्षांत आपण देशाला गुलामगिरीच्या मानसिकतेतून पूर्णपणे मुक्त करू. हा १.४ अब्ज देशवासीयांचा संकल्प असावा. जेव्हा देश गुलामगिरीच्या या मानसिकतेतून मुक्त होईल, तेव्हा तो आपल्या स्वदेशी उत्पादनांवर जितका अभिमान बाळगेल. तितकाच तो स्वावलंबी होण्याच्या दिशेने पुढे जाईल."
या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी साहिबजादांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी विविध सादरीकरणे केली. सांस्कृतिक कार्यक्रमांमधून देशाचा समृद्ध वारसा आणि शौर्यगाथा सादर करण्यात आली. वंदे मातरम या गाण्याने वातावरण देशभक्तीच्या भावनांनी भरून गेल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमात प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेते, विद्यार्थी आणि मान्यवर सहभागी झाले होते. कार्यक्रमापूर्वी पंतप्रधानांनी राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी संवाद देखील साधला.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\