क्रीडा भारतीच्या अखिल भारतीय अधिवेशनाचे शानदार सोहळ्याने प्रारंभ

देशातील एक हजार प्रतिनिधी सहभागी

    27-Dec-2025
Total Views |
Commonwealth Games
 
अहमदाबाद : ( Commonwealth Games ) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे पुन्हा संयोजनपद मिळणे हीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अकरा वर्षांमध्ये भारताने केलेल्या प्रगतीची पावती आहे. आता ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांचेही संयोजनपद आम्हाला मिळेल असे गुजरातचे मुख्यमंत्री पटेल यांनी शुक्रवारी क्रीडा भारतीच्या अखिल भारतीय अधिवेशनाच्या उद्घाटना दरम्यान सांगितले.
 
क्रीडा भारतीच्या पाचव्या अखिल भारतीय अधिवेशनाचे उद्घाटन गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्ष व माजी ऑलिंपिकपटू गोपाळ सैनी, क्रीडा भारतीचे महामंत्री राजजी चौधरी, कार्याध्यक्ष चैतन्य कश्यप, क्रीडा भारतीचे उपाध्यक्ष व ऑलिंपिक कांस्यपदक विजेते कुस्तीगीर योगेश्वर दत्त, क्रीडा भारतीचे प्रांत अध्यक्ष विवेक पटेल, कर्णावती महानगर अध्यक्ष आनंद पटेल यावेळी उपस्थित होते.
 
भूपेंद्र पटेल यांनी सांगितले की, सन २०३० मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन अहमदाबाद कर्णावती येथे होणार आहे. आमच्यासाठी ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. या स्पर्धेच्या तयारीस आम्ही यापूर्वीच प्रारंभ केला होता. ही स्पर्धा यशस्वीरित्या आयोजित करून आम्हाला २०३६ च्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांचेही संयोजनपद मिळवायचे आहे.
 
आपल्या देशात प्राचीन काळापासूनच क्रीडा संस्कृती कार्यरत आहे. महाभारत व रामायण काळामध्ये धनुर्विद्या, मल्लविद्या, गदायुद्ध, अश्वशर्यती, योगासने इत्यादी खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या जात होत्या. वेगवेगळ्या वेदांमध्येही क्रीडा संस्कृतीचे महत्त्व सांगण्यात आले आहे. हे लक्षात घेऊनच पंतप्रधान मोदी यांनी तंदुरुस्त भारत, खेलो इंडिया यासारख्या योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळेच गेल्या दोन ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना नेत्रदीपक यश मिळाले आहे.
 
हेही वाचा : जेन-झींच्या प्रतिभेवर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास; म्हणाले, "हीच पिढी भारताला..."
 
व्यसनमुक्त युवा वर्ग निर्माण करण्यासाठी क्रीडा भारती कटीबद्ध असून त्या दृष्टीने आम्ही ५५० हून अधिक जिल्ह्यांमध्ये क्रीडा प्रचार व प्रसार केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्येही क्रीडाविषयक जागृती निर्माण झाली आहे असे सांगून राज चौधरी म्हणाले की,” क्रीडा क्षेत्रातील उत्तेजकाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन आम्ही उत्तेजकमुक्त क्रीडा क्षेत्र करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. राष्ट्रीय निवड प्रक्रियेमध्ये अनेक वेळा भ्रष्टाचार दिसून येत असून नैपुण्यवान खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांपासून वंचित राहावे लागते. राष्ट्रीय संघ निवड प्रक्रियेत पारदर्शकता कशी येईल यासाठी क्रीडा भारती प्रयत्न करणार आहे.
विवेक पटेल यांनी प्रास्ताविक केले. तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात भारतामधील जवळ जवळ एक हजार कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.