पारंपारिक क्रीडा प्रकारांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध; क्रीडामंत्री मांडवीय याचे प्रतिपादन
क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी क्रीडा भारतीचे सहकार्य; राष्ट्रीय संघ निवड प्रक्रियेत पारदर्शकता आणणार
27-Dec-2025
Total Views |
अहमदाबाद : ( Dr. Mansukh Mandaviya ) क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी गेल्या दहा वर्षांमध्ये केंद्र सरकारने सातत्याने प्रयत्न केले असून त्यासाठी क्रीडा भारती संस्थेचे सहकार्य लाभले आहे येथून पुढेही त्यांचे असेच सहकार्य राहणार आहे याची मला खात्री आहे. राष्ट्रीय संघ निवड प्रक्रियेत पारदर्शकता आणली जाणार आहे असे केंद्रीय क्रीडामंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी सांगितले. भारतात होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये पारंपारिक खेळांना प्राधान्य दिले जाईल असेही त्यांनी सांगितले.
क्रीडा भारती संस्थेच्या पाचव्या अधिवेशनानिमित्त डॉ. मांडवीय यांनी उपस्थित एक हजार कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांच्या वतीने माजी आंतरराष्ट्रीय जलतरणपटू व क्रीडा भारतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भानु सचदेव यांनी त्यांच्याबरोबर संवाद साधला.
डॉ. मांडवीय यांनी पुढे सांगितले,” आपल्या देशामध्ये पाच हजार वर्षांपूर्वी मल्लविद्या, गदायुद्ध, धनुर्विद्या, अश्वांच्या शर्यती, योगासने असे अनेक पारंपारिक खेळ लोकप्रिय होते. आपल्या देशातील प्राचीन खेळांचे दैनंदिन जीवनामध्ये देखील अनन्यसाधारण महत्त्व होते. शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीच्या साठी भरपूर मदत होत असे. आपल्या देशावर झालेल्या वेगवेगळ्या आक्रमणाच्या वेळी या पारंपारिक खेळांकडे दुर्लक्ष झाले होते. त्याचा अनिष्ट परिणाम युवा वर्गावर झाला. अनेक प्राचीन क्रीडा स्पर्धांचे अन्य देशांकडून बदलते स्वरूप आपल्याकडे आल्यावर आपण ते स्वीकारले. यापुढे आपण जगाला आपल्या खेळांचे मॉडेल देऊ आणि ते स्वीकारतील अशी माझी खात्री आहे“
डॉ. मांडवीय पुढे म्हणाले,”संघटनांमधील मतभेदांमुळे नैपुण्यवान खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांपासून वंचित राहावे लागते. हे लक्षात घेऊनच आम्ही राष्ट्रीय संघ निवड प्रक्रियेत पारदर्शकता आणणार आहोत. राष्ट्रीय संघटनेमध्ये महिलांना पुरुषांइतकेच प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला जाईल तसेच त्यांच्या सुरक्षेबाबतही पुरेशी काळजी घेतली जाईल. तसेच एक खेळ एक संघटना हे तत्त्व सर्व पातळीवर राबविण्याचा प्रयत्न केला जाणार असून प्रत्येक क्रीडा संघटनेमध्ये चांगले व्यवस्थापन राहील असा प्रयत्न केला जाईल. भारतात २०३० मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाणार आहे तसेच २०३६ मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांच्या संयोजन पदासाठी भारत उत्सुक आहे. त्याविषयी डॉ. मांडवीय यांनी सांगितले,” या स्पर्धांमध्ये स्वतःच्या देशातील पारंपारिक खेळ आयोजित करण्याची यजमान देशाला संधी असते. हे लक्षात घेऊनच आम्ही आपल्या देशातील प्राचीन खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करणार आहोत.
केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षांमध्ये तंदुरुस्त भारत, खेलो इंडिया, विकसित भारत यासारख्या अनेक योजना सुरू केल्यामुळे पुन्हा खेळाविषयी सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. निरोगी भारत होण्यासाठी तसेच पर्यायाने औषध पाण्यावरील खर्च कमी होण्यासाठी क्रीडाक्षेत्रास अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने कोणता ना कोणता तरी खेळ खेळावा अशी शासनाची इच्छा आहे असेही डॉ. मांडवीय यांनी सांगितले.