डेहराडून : (Operation Kalnemi) उत्तराखंडमध्ये ‘ऑपरेशन कालनेमी’ या राज्यव्यापी मोहिमेत मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये राबवलेल्या या विशेष मोहिमेद्वारे एकूण ५११ जणांना अटक करण्यात आली असून त्यात १९ बांगलादेशी घुसखोरांचा समावेश आहे. त्यांपैकी १० जणांना परत बांगलादेशामध्ये पाठवण्यात आले आहे. उरलेल्या ९ जणांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया चालू आहे.
धर्म आणि श्रद्धेच्या नावाखाली साधूचा वेश करून ढोंगीपणा आणि फसवणूक करणाऱ्यांविरोधात ही कारवाई चालू करण्यात आली आहे. सरकारने एका प्रेस रिलीजमध्ये संपूर्ण माहिती शेअर केली आहे.उत्तराखंड सरकारच्या निवेदनानुसार, जुलै २०२५ मध्ये ऑपरेशन कलानेमी मोहिमेला सुरुवात झाली. याअंतर्गत, हरिद्वार, डेहराडून आणि उधम सिंह नगर जिल्ह्यांमध्ये ४,८०० हून अधिक लोकांची पडताळणी करण्यात आली, त्यापैकी ५११ जणांना निवासस्थानाची माहिती आणि पूर्ण ओळखपत्रे नसल्याने अटक करण्यात आली.
श्रद्धेच्या आडून पाखंडी कृत्ये सहन केली जाणार नाहीत - मुख्यमंत्री धामी
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले की, "या मोहिमेचा संबंध कोणत्याही विशिष्ट समाजाशी नाही. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था टिकवणे, तसेच देवभूमी उत्तराखंडची प्रतिष्ठा सुरक्षित ठेवणे हा या मोहिमेचा हेतू आहे. राज्यात श्रद्धा आणि विश्वास यांचा पूर्ण आदर केला जाईल; मात्र त्या आडून होणारे गुन्हे, पाखंडी कृत्ये अन् फसवणूक कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. अधिकार्यांना ही मोहीम कठोर आणि निष्पक्ष पद्धतीने राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
काय आहे ऑपरेशन कलानेमी ?
उत्तराखंडमध्ये, 'ऑपरेशन कलानेमी' ही उत्तराखंड सरकारची एक विशेष मोहीम आहे, ज्याचा उद्देश संत आणि ऋषी असल्याचे भासवून लोकांना फसवणाऱ्या बनावट बाबा आणि ढोंगी लोकांना उघड करणे आणि त्यांना शिक्षा करणे आहे. रामायणातील कलानेमी (रावणाच्या सांगण्यावरून हनुमानाला दिशाभूल करणारा राक्षस) सारख्या लोकांना फसवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत, अनेक बनावट बाबांवर कारवाई करण्यात आली आहे आणि उत्तराखंडच्या पवित्र भूमीवर कोणत्याही प्रकारची फसवणूक आणि ढोंगीपणा थांबवण्याचा संदेश देण्यात आला आहे.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\