Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्काराने' सन्मानित

    27-Dec-2025   
Total Views |
Devendra Fadnavis
 
अमरावती : (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भारताचे पहिले कृषिमंत्री, शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीद्वारे 'डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती पुरस्कार २०२५' देऊन सन्मानित करण्यात आले.
 
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, मंत्री डॉ. अशोक उईके, राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर, पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या पुरस्कारामध्ये मिळालेले ५ लाख रुपये मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) या शिक्षण संस्थेला समर्पित केले.
 
हेही वाचा :  Navnath Ban : गावकीपुढे भावकी चालत नाही ; नवनाथ बन यांची टीका
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, "डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार देण्यासाठी माझी निवड केल्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. देशविदेशात अनेक पुरस्कार घेण्याचा योग आला. पण मी त्या सगळ्या पुरस्कारांपेक्षा भाऊसाहेब पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार अधिक मोलाचा पुरस्कार मानतो. हा पुरस्कार लोकमहर्षींच्या नावाने आहे आणि तो प्रदान करण्यासाठी डॉ. विजय भटकर यांच्यासारखे विज्ञानमहर्षी आहेत, हा दुग्धशर्करायोग आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी इतिहासाच्या पानावर केलेले कार्य हे केवळ एका पीढीपुरते मर्यादित नसून पिढ्यानपिढ्या समाजाचे कल्याण होईल, असे आहे. त्यांना विदेशात शिक्षण घेण्याची संधी आली असताना त्यांच्याकडे पैसे नव्हते. पण त्यांनी शिष्यवृत्ती मिळवली आणि बॅरिस्टर झाले. त्याचवेळी त्यांनी संस्कृतमध्ये पीएचडी केली." (Devendra Fadnavis)
 
केवळ भाषणातून नव्हे कृतीतून कुप्रथांचा विरोध
 
"मानवतेला नाकारणाऱ्या विचारांना नाकारण्याचे काम भाऊसाहेब यांनी सुरु केले. तसेच चुकीच्या रुढी-परंपरांना आव्हान देत त्याविरुद्ध ठामपणे उभे राहिले. त्यांनी आंदोलन करून अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळवून दिला. केवळ भाषणातून नाही तर कृतीतून आणि व्यक्तिगत जीवनातूनही कुप्रथांचा विरोध करत बंड पुकारले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना त्यांनी प्रतिपादित केले," असेही ते म्हणाले. (Devendra Fadnavis)
 
हेही वाचा :  Amol Kolhe Meets Ajit Pawar : अमोल कोल्हे यांनी घेतली अजित पवारांची भेट
 
पंजाबराव देशमुख यांनी दाखवलेल्या शाश्वत मार्गाने चालण्याचा प्रयत्न
 
"शेती आणि शेतकरी हा त्यांच्या विचारांचा कणा होता. शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी पहिल्यांदा सावकारी कर्जाच्या विरोधातील कायदा करणारे पंजाबराव देशमुख होते. त्यामुळे शेतकऱ्याच्या जीवनात नवीन प्रकाश आणण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्यामुळे अमरावती साक्षरता विभागात पहिल्या क्रमांकावर होता. राष्ट्रनिर्मितीमध्ये योगदान देणाऱ्यांपैकी एक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहू शकतो. या पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात परिवर्तन करण्यासाठी मी जे मिशन हाती घेतले ते पूर्ण करण्याकरिता मला स्फुर्ती मिळेल. नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना, हजारों कोटी रुपये खर्च करून हवामान-प्रतिरोधक शेती, मूल्यवर्धित शेती या दोन गोष्टींवर मोठ्या प्रमाणात काम सुरु केले आहे. शेती शाश्वत व्हावी, कृषी क्षेत्रात यांत्रिकी आणि एआय यावे, हा आपला प्रयत्न आहे. पुढच्या काळात एआय हे शेतीक्षेत्रात परिणामकारक बदल घडवणार आहे. नैसर्गिक शेतीचे मिशन आपण हाती घेतले आहे. २०२६ पर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला दिवसा मोफत वीज देणार आहोत. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी दाखवलेल्या शाश्वत मार्गाने चालण्याचा आमचा प्रयत्न आहे," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.
 
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....