मुंबई : ( Nationalist Congress Party ) मुंबई महापालिका निवडणूकांचे बिगुल वाजले असून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मुंबईत युतीसाठी दारोदार भटकंती सुरु असल्याचे दिसले. पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी शुक्रवारी, युतीकरिता मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली. परंतू, या चर्चेतून कोणताही निष्कर्ष निघाला नसल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. दुसरीकडे, शरद पवार गटातर्फे काँग्रेससोबतही चर्चा सुरु असल्याचे समजते.
मातोश्रीवरून बाहेर पडल्यानंतर माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, "मुंबई महापालिकेसंदर्भात आमची चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी आमची बरीचशी चर्चा झाली पण अजूनही आम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचलो नाहीत. मुंबईत शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेसशी आमची आघाडी व्हावी, अशी आमची धारणा होती. परंतू, ते दोन मोठे पक्ष आहेत. मुंबई त्या दोन्ही पक्षांएवढी आमची ताकद नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी चर्चा करत आहोत. विद्यमान नगरसेवकांच्या जागा आम्हाला मिळाव्या, अशी आमची मागणी असून त्यादृष्टीने चर्चेचा प्रयत्न सुरु आहे. यासोबतच ज्या शहरात शक्य आहे तिथे मविआसोबत महापालिकांच्या निवडणुका लढवण्याचा आमचा प्रयत्न आहे," असेही त्यांनी सांगितले.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र निवडणुका लढणार असल्याची चर्चा आहे. शिवाय दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार असल्याच्याही चर्चांना उधाण आले आहे. अशा परिस्थितीत जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने पक्षात नेमके चालले काय? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येतोय. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, "जिथे योग्य वाटेल तिथे अजित पवार यांच्या पक्षाशी युती व्हावी, अशी आमच्या पक्षाच्या काही कार्यकर्त्यांची भावना आहे. अजित पवार आणि आम्ही एकत्र असताना पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात आमचे अनेक नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे त्यांच्यासोबत युतीची शक्यता पडताळण्याचा प्रयत्न आमच्या पक्षातर्फे सुरु आहे," असे त्यांनी सांगितले.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....