वनाच्या खाकीतला पक्षीनिरीक्षक

    25-Dec-2025   
Total Views |
Yogesh Shid
 
पक्षीनिरि‍क्षणाचा छंद केवळ जोपासून पक्षीमय आयुष्य जगता येत नाही, तर नियतीने पक्षीनिरीक्षणासाठी अनुकूल वातावरण निर्माण करून देणेदेखील गरजेचे असते. वन विभागात काम करणार्‍या या माणसाबाबतही असेच काहीसे घडले. नियतीनेच जणू काही या माणसाला वनसेवेच्या माध्यमातून पक्षीनिरीक्षणाचा छंद जोपासून तो फुलवण्याचा आनंद दिला. वनाच्या खाकीतला हा पक्षीनिरीक्षक आहे, योगेश शिद.
 
योगेश यांचा जन्म दि. २५ जुलै १९८३ साली शहारापूरमधील किन्हवली (झापवाडी) या दुर्गम खेड्यात झाला. घरची परिस्थिती तशी सर्वसामान्य. वडील गणपत शिद हे शिक्षक, तर आई गृहिणी. खेड्यातच जन्म झाल्यामुळे निसर्ग हा लहानपणापासून त्यांच्या पाचवीला पुजलेला होता. मात्र, खेड्यात राहूनही प्रत्येकालाच निसर्ग पाहण्याची दृष्टी मिळते असे नाही. बर्‍याच जणांना ही दृष्टी जन्मत: असते, काहींना ती अवगत करावी लागते, तर काहींना ती नसतेच. योगेश यांना ही दृष्टी जन्मत: होती बहुधा. या दृष्टीनेच त्यांना निसर्ग वाचायला शिकवला. जंगलाची रुंजी घालून दिली. जंगल आणि धरणाशेजारी फिरताना पक्षी त्यांना खुणवायचे. मात्र, ज्ञान नसल्याने त्यांची ओळख काही पटेना. परंतु, अशातही पक्ष्यांची पाठ त्यांनी काही सोडली नाही. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण शहापूरमध्ये कला शाखेतून पदवीपर्यंत झाले. शिक्षणानंतर तातडीने त्यांना वन विभागात भरती होण्यासाठी मुलाखतीसंदर्भात फोन आला. मनात जंगलाची ओढ असल्याने त्यांनी ही संधी हेरून तातडीने शहापूर वन विभागाचे कार्यालय गाठले आणि अर्ज भरून टाकला.
 
शिद यांनी अर्ज भरल्यानंतर लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, मुलाखत असे सगळे सोपस्कार पार पडले. हे टप्पे पार करून २००४ साली अखेरीस ते वन विभागात ‘वनरक्षक’ या पदावर रुजू झाले. त्यांची पहिली नियुक्ती मुरबाड तालुक्यामधील टोकावडे उत्तर वनपरिक्षेत्रातील निघाडी या भागात झाली. २००४ ते २०१८ या काळात त्यांनी टोकावडे दक्षिण, मिल्हे, पुन्हा टोकावडे उत्तर या भागात ‘वनरक्षक’ या पदावर काम केले. २०१८ साली त्यांची बदली शहापूर तालुक्यातील धसई नियतक्षेत्रामध्ये झाली. ही बदली त्यांच्या पक्षीनिरीक्षणाच्या छंदाच्या अनुषंगाने वळण देणारी ठरली. धसई नियतक्षेत्रामधील सारंगपुरी येथे काम करत असताना, त्यांनी एक छोटा कॅमेरा घेतला. पक्षीनिरीक्षणाची दृष्टी विकसित केली. तज्ज्ञांकडून टिपलेल्या पक्ष्यांची ओळख पटवण्यास सुरुवात केली आणि हळूहळू पक्षीनिरीक्षणाच्या छंदाने त्यांना वडाच्या पारंब्यांप्रमाणे स्वत:मध्ये जखडून घेतले.
 
२०२१ साली शिद यांना ‘वनपाल’ या पदावर पदोन्नती मिळाली. या पदोन्नतीनंतर ते तानसा वन्यजीव अभयारण्यातील वैतरणा वनपरिक्षेत्रात रुजू झाले. तानसा हे पक्ष्यांचे नंदनवनच असल्यामुळे पक्ष्यांचा खजिनाच त्यांच्यासाठी खुला झाला. पक्षीनिरीक्षणाच्या आवडीने जोर धरला. निरीक्षणाकरिता पूर्णवेळ देण्यास मिळाला. स्थानिक पक्षीतज्ज्ञ रोहिदास डगळे यांची त्यांना साथ मिळाली. पाणपक्ष्यांबरोबर जंगलात अधिवास करणार्‍या अनेक दुर्मीळ आणि संकटग्रस्त पक्ष्यांना ते कॅमेर्‍यात कैद करू लागले.
 
‘वनपिंगळा’ या संकटग्रस्त पक्ष्याने त्यांच्यामधील पक्षीनिरीक्षकाला खर्‍या अर्थाने जागे केले. कारण, पक्ष्यांची निरीक्षणे सखोल पद्धतीने कशी करावीत, हे त्यांना वनपिंगळ्यामुळे समजले. शिद यांनी वनपिंगळ्याच्या विणीची निरीक्षणे प्रामुख्याने नोंदवली. ही निरीक्षणे पुढीलप्रमाणे; ज्याप्रमाणे वाघांचे हद्दक्षेत्र असते, त्याचप्रमाणे वनपिंगळ्याच्या जोडीचेदेखील एक निश्चित हद्दक्षेत्र असते. त्यात ते कोणालाच घुसखोरी करायला देत नाहीत. झाडाच्या ढोलीत अंडे टाकल्यानंतर सापांप्रमाणेच खारदेखील त्यामधील अंडी खात असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. शिद यांनी तानसामधून ‘युरेशियन ससाणा’ या पक्ष्याचीही प्रथमच नोंद केली. महाराष्ट्रातील या ससण्याची ती चौथी नोंद ठरली. तानसामध्ये काम करताना त्यांना पक्ष्यांकडे अभ्यासाच्या दृष्टीने पाहण्याची संधी मिळाली. याठिकाणी काम करताना त्यांनी वण्यावरखील उत्तमरित्या नियंत्रण मिळवले.
 
सध्या शिद हे मुरबाड तालुयातील शिरवली नियतक्षेत्रामध्ये ‘वनपाल’ म्हणून काम करत आहेत. मुरबाड तालुक्यातील पक्षीविविधता कॅमेर्‍यात कैद करण्यात ते व्यस्त आहेत. या ठिकाणीदेखील त्यांनी ‘वनपिंगळा’ टिपला असून, मात्र तानसापेक्षा अत्यंत निराळ्या अधिवासात तो याठिकाणी राहत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे. शिद यांनी आतापर्यंत ३४० पक्ष्यांची छायाचित्रित नोंद केली आहे. आता त्यांना खुबीने पक्षी ओळखता येतात. गस्तीच्या वेळेत किंवा वेळ मिळेल तसा ते पक्षीनिरीक्षण करतात. मुरबाड तालुक्यातील पक्षीविविधता कॅमेर्‍यात टिपण्यासाठी ते यापुढे प्रयत्नशील राहणार आहेत. विशिष्ट दृष्टिकोनातून काम करणार्‍या अशा कर्मचार्‍यांची खर्‍या अर्थाने आज वन विभागाला गरज आहे. शिद यांना पुढील वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून खूप शुभेच्छा!
 
 

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.